सर्वसमावेशक प्रगती आणि स्त्री उद्योजिकांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2018
Total Views |

 

 

 
 
भारतीय स्त्री उद्योजकतेचे चित्र आज तेवढे आशादायी नसले तरी शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आज स्त्रियांचे आत्मभान जागृत झाले आहे. घरबसल्या होणारा एखादा उद्योग असो किंवा एखाद्या मोठ्या उद्योगातील वाटाघाटीची मीटिंग असो, स्त्रिया केवळ स्त्री म्हणून नाही तर एक सकारात्मक योगदान देणारी व्यक्ती म्हणून आज कार्यरत आहेत. आजची तरुण पिढी, ज्यांच्या घरातील स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलणार्‍या होत्या किंवा आहेत, त्या तरुण पिढीचा स्त्री उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप निकोप आहे. हा पुढचा प्रवास स्त्री उद्योजिकेसाठी थोडा खडतर असला तरी मुक्काम अप्राप्य नाही.


प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात ‘प्रकृती’ आणि ‘पुरुष’ या दोन संकल्पना मांडल्या आहेत. प्रकृती म्हणजे सृजनशीलता आणि पुरुष म्हणजे आत्मा, चेतना. दोन्ही संकल्पनांचे महत्त्व आणि अर्थविवेचन पूर्वीपासून केले गेले आहे. एक मात्र नक्की की, प्रकृती आणि पुरुष या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्याचे अस्तित्व एकरूप आहे. या संकल्पनेचे रूप अर्धनारीनटेश्वर, शिवपार्वती किंवा यिंगयांग असेही वार्णिले आहे. जड तत्त्व आणि मूलतत्त्व असाही अर्थ या संकल्पनेतून काढला जातो. परस्परपूरक आणि तरीही स्वत:चे वेगळेपण जपणार्‍या या संकल्पना जर एकत्र आल्या तर जगाचा कारभार चालतो, असे म्हणता येईल.

 

पण, याचा आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात काय संदर्भ? माणसाच्या जगात प्रामुख्याने दोन गट आहेत, एक स्त्रीलिंगी गटात व पुल्लिंगी गटात मुख्य फरक आहे तो नवीन जीव जन्माला घालण्याच्या क्षमतेचा! हा एक महत्त्वाचा फरक निसर्गाचे, जीवसृष्टीचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून झालेला आहे, असे मानायला हरकत नाही. परंतु, केवळ जैवशास्त्रीय फरक असल्याने येणार्‍या काही अपरिहार्य मर्यादांचा दुरुपयोग स्त्रियांचे स्थान समाजात दुय्यम करण्यास केला गेला. जे पूर्वी झाले ते झाले. आता तर यावर विचारपूर्वक मार्ग काढायला हवाच.

 

(स्त्रियांचे) सबलीकरण : एक परवलीचा शब्द

सद्‍गुरू श्री जग्गी वासुदेव याचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हॉट्स अ‍ॅपवर कुणीतरी पाठवला. विषय जिव्हाळ्याचा होता म्हणून व्हिडिओ बघितला. सद्‍गुरू त्यांच्या ‘Mystic style’ मध्ये खूप सखोल विचार अगदी सोपे करून मांडतात. व्हिडिओ ‘स्त्रियांचे सबलीकरण’ कसे व्हावे याविषयी होता. सद्‍गुरूंनी हा विषय केवळ स्त्रियांच्या अथवा पुरुषांच्या दृष्टिकोनातून न बघता, स्त्री सबलीकरणाकडे केवळ आर्थिक बाजूने न बघता, माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघा, असे म्हटले. निर्णयप्रक्रियेपासून ते प्रत्यक्ष कृती आणि फलनिष्पत्तीपर्यंत स्त्रियांचा सक्रिय सहभाग समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात व्हावा, अशी आदर्श परिस्थिती येणे म्हणजे समाज खर्‍या अर्थाने प्रगत होईल, असे म्हणायला हरकत नाही.

 

आजही भारतात आणि जगात अनेक देशांत निर्णयस्वातंत्र्य स्त्रियांना नाही. यात स्त्रियांच्या स्वत:च्या मनोभूमिकेचाही वाटा खचितच मोठा असेल, पण जे एखादा मुलगा अथवा पुरुष सहजपणे करू शकतो ते करण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना नाही. अलीकडेच सौदी अरेबियात स्त्रियांना वाहन चालविण्याची परवानगी मिळाली, हे झाले एक उदाहरण, तर दुसरीकडे अजूनही रात्रपाळीचे काम स्त्रिया निर्धास्तपणे करू शकत नाहीत. सुरक्षा हा मुद्दा आहेच व कुटुंबीयाची परवानगी अथवा सामाजिक दडपण हेही असतेच.

 

कृषिप्रधान भारत देशात पुरुषांच्या बरोबरीने किंवा कधीतरी कांकणभर अधिकच श्रम, स्त्रिया शेतात आणि घरात करत असतात. शेतात काम करणारी किंवा मजुरी करणारी स्त्री असो अथवा नोकरी करणारी स्त्री असो, चूल आणि मूल तिचीच जबाबदारी असते. त्यामुळे स्त्रियांना रोजच ‘डबल-ड्युटी’ असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शहरी स्त्रीकडे घरातील काही जबाबदार्‍या पैशाच्या मोबदल्यात करून घेण्याची सोय असते, परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा जेमतेम कमाई असताना सारे काही स्त्रीलाच करावे लागते. अशावेळी मग स्त्रियांनी केवळ घरातील जबाबदारी घेणेच पसंत केले तर ते कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी कितपत शहाणपणाचे ठरेल? एकाच्या कमाईत जर कुटुंबाचे व्यवस्थित भागत असेल तर प्रश्नच मिटला, पण आजच्या महागाईच्या जमान्यात दिवसाला एक डॉलर (६८ रुपये) कमवून चौकोनी कुटुंबाचे पोट भरणे शक्य आहे का? ज्या कुटुंबातील पुरुषाची कमाई कुटुंबाला व्यवस्थित सुखी ठेऊ शकेल (‘रोटी, कपडा, मकान’ देऊ शकेल) अशी आहे, त्या कुटुंबातील स्त्रीला मग अर्थार्जनाची चिंता नाही, असे साहजिकच वाटेल. पण एक व्यक्ती म्हणून स्वत:त असलेल्या कौशल्यांचा वापर करून स्वप्रगती साधणे, हा एक महत्त्वाचा पैलू आहे, ज्याचा विचार सहसा स्त्रियांच्या बाबतीत तेवढ्या प्रमाणावर आजही होत नाही.

 

भारतीय स्त्री उद्योजिकांसमोरील आव्हानं

Mastercard index of women entrepeneure (MIWS) २०१८ नुसार स्थानिक उपलब्ध संधीचा, व्यवसाय उभारणीसाठी उपयोग करून घेण्यात भारतीय स्त्रियांचा जगातील ५७ देशांच्या क्रमवारीत ५२ वा क्रमांक आहे. जगातील ७९ टक्केकाम करणार्‍या महिला या ५७ देशांत आहेत, म्हणून हे ५७ देश निवडले आहेत. भारताखालोखाल फक्त इराण, सौदी अरेबिया, अल्जेरिया, इजिप्त आणि बांगलादेश आहेत. ही परिस्थिती भारतीय स्त्री उद्योजिकांसाठी उत्साहवर्धक नक्कीच नाही. काही मुख्य कारणे ज्यामुळे उद्योगक्षेत्रात स्त्रियांचा सहभाग कमी आहेत, ती बघू.

 

सर्वात महत्त्वाचे कारण, स्त्रियांच्या बाबतीतील पूर्वग्रह. उद्योग म्हटला की, जोखीम आली, निर्णयक्षमता आली. असे मानणे की, स्त्रिया जोखमीचे काम करू शकत नाहीत, शारीरिक कष्टाचे काम करू शकत नाहीत, हे सपशेल चूक आहे. शेतात काम करणार्‍या स्त्रिया, मजुरी करणार्‍या स्त्रिया, एवढेच काय तर अनेक घरांमधून धुणीभांडी, झाडू-फरशी करणार्‍या स्त्रिया काय कमी शारीरिक कष्ट करतात? जोखीम किंवा शारीरिक कष्ट हे केवळ उदाहरण म्हणून येथे घेतले. स्त्रियांच्या बाबतीतले समाजातील, कुटुंबातील आणि त्याच्या स्वत:च्या मनातील अनेक पूर्वग्रह स्त्रियांना आडकाठी ठरतात. या पूर्वग्रहांवर खुल्या संवादातून आणि प्रत्यक्ष कृतीतूनच मात करता येते. सामाजात पोषक वातावरण तयार होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे की, स्त्रियांनी या पूर्वग्रहांचा गडद पडदा स्वत: बाजूला सारणे.

 

दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे क्षेत्राचे ज्ञान आणि आर्थिक पाठबळ. ज्या क्षेत्रात उद्योग सुरू करायचा, त्याचे केवळ ज्ञान असून उपयोग नाही तर उद्योग उभारणीसाठी लागणारी आर्थिक मदत स्त्रियांपर्यंत सहज पोहोचत नाही, पण आज हे चित्र बरेच आशादायी होते आहे, सरकारतर्फे स्त्रियांसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आल्या आहेत. त्या योजनांची माहिती काढून त्याचा उद्योगउभारणी तसेच वाढीसाठी स्त्रियांनी उपयोग करून घ्यायला हवा. तसेच ज्या क्षेत्रात काम करायचे त्याची सुरुवातीलाच सर्व माहिती असेल असे होणार नाही, तर पाण्यात उडी मारली की सुरुवातीला हातपाय मारत हळूहळू पोहता येतं, तसा उद्योग टप्प्याटप्याने मोठा करता येतो. क्षेत्राचे ज्ञान हा मुद्दा दोन्ही गटांना, स्त्री व पुरुष उद्योजकांना लागू आहे.

 

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तो स्त्री उद्योजकतेला पोषक वातावरण असल्याचा. कुटुंब, समाज (त्यात ग्राहकाचाही समावेश आहे) स्त्री उद्योजिकांना उत्तेजना, पाठिंबा, आधार देतो की शंकेच्या नजरेने बघतो, हे एका स्त्री उद्योजिकेच्या प्रगतीचे कारण ठरू शकते. जिथे उत्तेजना आहे, आधार आहे तिथे उद्योगामुळे येणारे ताणतणाव सहन करायला स्त्रियांना जड जात नाही, परंतु कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती विपरीत असताना, उद्योग उभा करणे आणि टिकवून ठेवणे सोपे नाही.

 

अजूनी चालतेची वाट

 स्त्री सबलीकरणाला केवळ आर्थिक तराजूत न तोलता, स्त्री सबलीकरण म्हणजे या जगातील निम्म्या लोकसंख्येची प्रगती असा विचार सर्वसमावेशक ठरेल. म्हणतात ना, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ या सुभाषिताचा शब्द्श: अर्थ न घेता आपण असे म्हणू की ‘जिथे स्त्रियांना समान दर्जा असतो तिथे सुख आणि समृद्धी नांदते.’

 

-ऋता पंडित

@@AUTHORINFO_V1@@