अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज - चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नागपूर :  राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
पाटील यावेळी म्हणाले, आज मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात 66 ठिकाणी पाणी साचले होते. अशा ठिकाणी 152 पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलेला आहे. 15 बस मार्ग बदलून इतरत्र वळविण्यात आले. वसई येथे राजावली, तिवरी, सातीवली व मिठागर परिसरात पाणी साठल्याने अंदाजे 300 लोकांना पाण्याचा वेढा पडला होता. तेथील नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्याप्रमाणे विरार व नालासोपारा येथे बडोदा एक्सप्रेस व शताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रूळावर पाणी साचल्याने उभ्या आहेत. या रेल्वेतील प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक प्रशासनामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे 700 प्रवाशांना रेल्वेमधून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांची स्थानिक वाहतूक करण्याची वसई-विरार महानगरपालिका, राज्य परिवहन मंडळ व खासगी बसेसमार्फत सोय करण्यात आली आहे. वसई येथे मिठागर परिसर व रेल्वेतील अडकलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक प्रशासनामार्फत खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.
राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर, सातारा, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलै या कालावधीत त्या त्या जिल्ह्यातील सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित नाशिक (64.5 टक्के) धुळे (95.1 टक्के), नंदूरबार (66.6 टक्के), जळगाव (78.6 टक्के) पुणे, कोल्हापूर (70.9 टक्के), औरंगाबाद (69.2 टक्के), जालना (78.1 टक्के) बीड (86.5 टक्के), उस्मानाबाद (98.4 टक्के) (78.1 टक्के ), बुलढाणा (62.5 टक्के), गोंदीया (91.3 टक्के), सोलापूर(61.3 टक्के) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्याचा आज अखेर पाऊस 390.4 मि.मि. एवढी नोंद झाली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@