समर्थकार्यास सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |



उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील रामेश्‍वरपर्यंत आणि पूर्वेकडील जगन्नाथपुरीपासून ते द्वारकापर्यंत सारा उभा-आडवा हिंदुस्थान त्यांनी पायी फिरुन न्याहाळला होता. फक्‍त महाराष्ट्र नाही, तर ही सारी ‘भरतभूमी’आपलीच आहे,असे रामदासांना वाटत होते. सार्‍या हिंदुस्थानातील हिंदूंचे होत असलेले हाल त्यांनी पाहिले होते. हिंदू मंदिरांची तोडफोड त्यांनी पाहिली होती.

 

 
आपल्या तीर्थाटन काळात रामदासस्वामींनी हिंदुस्थानातील हिंदूंची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विपन्नावस्था पाहिली. रामदासांसारख्या विलक्षण बुद्धीच्या माणसाने ते निरीक्षण अंतर्मनात साठवून ठेवले. हे तीर्थाटन रामदासांनी काही विशिष्ट हेतू मनात ठेवून केले असेल, पण ते इतिहासाला ज्ञात नाही. त्या काळात त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या असतील, त्यांच्याशी चर्चा केल्या असतील, पण त्यांची नोंद कुठे आढळत नाही. अर्थात, त्या भेटी व चर्चा गुप्तपणे झाल्या असतील, हेही तितकेच खरे आहे. या बारा वर्षांच्या तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी नाशिक येथील मुक्‍कामी त्यांनी तपाचरण केले होते. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. ज्ञान संपादन केले होते. अलौकिक बुद्धिमत्ता, तपश्‍चर्येचे तेज आणि नि:स्पृहता या गुणांमुळे लोकांना आकर्षित करण्याची कला त्यांना प्राप्त झाली होती. एवढेच नव्हे, तर लोकं त्यांना आपोआप वश होत होते. मुस्लीम सत्तेकडून होणारे अत्याचार अनेकांकडून ऐकले होते. मुळात संत असलेल्या या महात्म्याचे विचार, तीर्थाटन करतानाच्या काळात हे चित्र पाहून आणि ऐकून बदलले. स्वामी निवृत्तीवादी मोक्ष कल्पनेकडून प्रपंच विज्ञानाकडे वळले. उत्तरेकडे असताना मुघल बादशाहाची अफाट संपत्ती त्यांनी पाहिली होती. तसेच त्या सम्राटाच्या लहरी स्वभावाबद्दल ऐकले असावे. बादशाहच्या संपत्तीची इंग्रजांनी त्या काळी केलेली किंमत 30 कोटी पौंड होती. रुपयांच्या भाषेत बोलायचे, तर ती जवळपास सहा अब्ज रुपये इतकी होती. हे राजे विलासात राहत होते. प्रजेची त्यांना पर्वा नव्हती. हे सम्राट लहरी आणि हिंदुद्वेष्टे होते. त्याचे अनेक पुरावे श्री. शंकरराव देव यांनी ‘समर्थावतार’ या ग्रंथात दिले आहेत. रामदासांच्या तीर्थाटनाच्या काळात दिल्लीचा सम्राट शहाजहान हा होता आणि त्याचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. इटलीचा प्रवासी ‘मनू ची’ याने औरंगजेबाला जवळून पाहिले होते. त्याने हिंदुस्थानात आल्यावर शहाजहान व औरंगजेबाकडे नोकरी केली होती. आपल्या प्रवासवर्णनपर पुस्तकात मनू ची लिहितो, “औरंगजेबाला कूच करण्यासाठी ज्या मार्गाने जायचे होते, त्या मार्गावर ८० काफरांना बळी द्यावे असा त्याने हुकूम दिला. हुकूमात तो पुढे म्हणतो, या काफरांना बळी द्यावे असा हुकूम दिला. त्या हुकुमात तो पुढे म्हणतो, या काफरांना हात बांधून एका रांगेत ओणवे उभे करावे व एकेकाचे मुंडके छाटीत जावे.”
 

या सार्‍या हालअपेष्टांतून प्रजेला वाचविण्यासाठी कोणीतरी सामर्थ्यवान हिंदू राजाच्या शोधात रामदासस्वामी होते. परंतु, तीर्थाटन काळात हिंदूसंस्कृती वाचवू शकणारा कोणीही शक्‍तिमान राज्यकर्ता त्यांना आढळला नाही. त्यावेळची महाराष्ट्रातील एकंदर सामाजिक स्थिती कशी होती, याचे वर्णन करताना वि. का. राजवाडे लिहितात,चातुर्वण्य संस्थेला त्यावेळी उतरती कळा आली होती. वैश्यवर्ग तर महाराष्ट्रातून नाहीसा झाला होता. शूद्र स्वतःहून मुसलमान झाले होते. मराठ्यांत एक भाऊ हिंदू, तर दुसरा बिरादार मुसलमान असे दिसू लागले. काजी न्यायासनावर बसला. अग्निहोत्री पीरांचे मुजावर झाले. कुठे कानाकोपर्‍यात स्वधर्माने चालणारा एखाद्दुसरा ब्राह्मण राहिला. (राजवाडे लेखसंग्रह) ‘वणीच्या सप्तशृंगीची पूजा कोणी करायची?’ हा तंटा सुलतानी ठाणेदाराकडे नेला गेला होता. हिंदुस्तानच्या इतर भागातील सांस्कृतिक दुर्दशा रामदासांनी पहिली होती. ते म्हणतात-

 

ब्राह्मण बुद्धिपासून चेवले।

आचारापासून भ्रष्टले॥

कित्येक दावलमलकास जाती।

कित्येक पीरास भजती ॥

 

ही स्थिती पाहून तीर्थाटनाच्या काळात रामदासांनी आपले ध्येय निश्‍चित केले; ते म्हणजे, ‘हिंदू संस्कृती वाचवणे आणि सनातनी धर्मियांचा लोकोद्धार’ ध्येय कितीही कठीण असेना का, रामदासस्वामी मागे हटणारे नव्हते. ते अतुलनीय प्रयत्नवादी होते. त्यांचे कार्य किती कठीण होते, याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

 

लोकोद्धार हिंदुसंस्कृतीचे रक्षण व त्यासाठी हिंदवी स्वराज्य आवश्यक, अशी त्यांच्या कार्याची दिशा ठरली गेली. तीर्थाटन संपवून रामदासस्वामी बारा वर्षांनी नाशिकला परत आले. रामरायाचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेची सांगता केली. आता लोकोद्धाराच्या कार्याला सुरुवात करायची होती. ती नाशिक किंवा स्वामींचे जन्मगाव जांब येथून करणे अपेक्षित होते. असे असताना रामदासांनी आपल्या कार्यासाठी कृष्णेचे खोरे निवडले आणि ते मसूर, चाफळकडे रवाना झाले. हा निर्णय रामदासास्वामींनी का घेतला? यासाठी तत्कालीन ऐतिहासिक पार्श्‍वभूमी तपासली पाहिजे.

 

हिंदुसंस्कृतीचे रक्षण करु शकणार्‍या राजाच्या शोधात रामदासस्वामी असताना त्यांची गाठ शहाजीराजांशी पडली. शहाजीराजे आदिलशहाचे मांडलिकत्व स्वीकारुन, त्याला खंडणी देत असत. तथापि, त्यांचे मांडलिकत्व केवळ नावासाठी होते. वि. का. राजवाडे म्हणतात, शहाजीराजे स्वतः रसिक, गुणवान आणि उत्तम संस्कृत जाणणारे होते. त्यांच्याकडे अनेक शास्त्री, पंडित, पुराणिक होते. शहाजींनी कर्नाटकात एक प्रकारचे स्वराज्य निर्माण केले होते. शहाजींकडे मोठे सैन्य असल्यामुळे आदिलशहा त्यांना वचकून असे. शहाजींचा कर्नाटकात दरारा होता. त्यामुळे मंदिरांची तोडफोड, स्त्रियांना पळवणे असले प्रकार कर्नाटकातून हद्दपार झाले होते. शहाजींनी वेदविद्येला उत्तेजन दिले. संस्कृत, हिंदी, मराठी भाषांचे संवर्धन केले. आदिलशहाने कर्‍हाड व मसूर या परगण्यांची देशमुखी शहाजींकडे दिली होती.” तीर्थाटनाच्या काळात रामदासस्वामी कर्नाटकातून येताना शहाजीराजांनी भेटले असणार. रामदासस्वामी या अगोदर तीर्थाटनाला निघण्यापूर्वी शहाजीराजांना नाशिक मुक्‍कामी भेटले असण्याची शक्यता आहे. शहाजींचा चुलतभाऊ खेळोजी भोसले याची स्त्री गोदावरीस्नानाला नाशिकला आली असताना महाबदखानाच्या लोकांनी तिला पळवली व भल्यामोठया रकमेची मागणी खेळोजीकडे केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी शहाजीरजे नाशिकला आले होते. रामदासांनी तेव्हा हिंदू राजा म्हणून शहाजींची भेट घेतली असणार. तत्कालीन परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली असेल. कर्नाटकात शहाजींराजांचे मांडलिकी राज्य का होईना, पण हिंदवी स्वराज्य पाहून रामदास सुखावले असतील. शहाजींच्या भेटीत लोकोद्धारयुक्त कार्यावर दोघात विचारविनिमय झाला असेल, तेव्हा रामदासांनी हिंदुसंस्कृती रक्षणाचे कार्य कृष्णाखोर्‍यातील मसूर, कर्‍हाड येथून सुरु करावे, असे ठरले असेल; कारण, त्या परगण्यांची देशमुखी शहाजींराजांकडे होती. रामदासस्वामींच्या लोकोद्धार, बलसंवर्धन, हिंदुसंस्कृती रक्षण या कार्यास मसूर चाफळ येथून सुरुवात झाली.

-सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@