देवाधिदेव महादेव आदियोगी शिव : नटराजनादांत नृत्यमुद्रा भाग-2

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018   
Total Views |



 

नटराजाच्या नृत्यमुद्रेचे वर्णन आणि विश्लेषण करणारे हे लेख, एक धोरण आणि एक उद्देश समोर ठेऊन लिहिले आहेत. यातील सजीव-निर्जीव चिन्ह आणि चिन्हसंकेत याचे मुर्तिशास्त्र रुपकमुल्यानुसार विज्ञाननिष्ठ विश्लेषण हे प्राथमिक धोरण नियोजन आहे. चिन्ह आणि चिन्हसंकेत हा लेखाचा मुख्य उद्देश असल्याने, नटराजाच्या या नृत्यमुद्रेचे सौंदर्यशास्त्रानुसार विश्लेषण या लेखात समाविष्ट केलेले नाही.

 

वाधिदेव महादेव अर्थात शिव यांच्या नटराज विग्रहातील नृत्यमुद्रेसंदर्भात एक कथा, दक्षिण भारतातील ‘तिल्लै चिदंबरम’ या देवालयाशी निगडीत आहे. ‘कोयिल पुराणम्’ या प्राचीन तामिळ संहितेत याचे सविस्तर वर्णन केले आहे, त्यात या नृत्याला ‘नादांतनृत्य’ असे संबोधन वापरले आहे. ‘कोयिल’ म्हणजे ‘देवालय’ आणि ‘पुराणम्’ म्हणजे पवित्र नोंदी. ‘कोयिल पुराणम्’ या तामिळ संज्ञेचा अर्थ, ‘त्या देवालयाच्या स्थापनेपासूनचा समग्र लिखित इतिहास. दक्षिण भारतातील प्रत्येक प्राचीन देवालयाचे स्वतःचे ‘कोयिल पुराणम्’, अभ्यासकाला उपलब्ध असते. ‘तिल्लै’ आणि ‘चिदंबरम’ ही दोन्ही देवालयाची स्थळदर्शक नावे आहेत. ‘तिल्लै’ हे तामिळ भाषेतील तर ‘चिदंबरम’ हे संस्कृत नाव.

 

‘कोयिल पुराणम्’ संहितेनुसार, ‘तिल्लै चिदंबरम’ देवालयातील देव-देवतांसमोर हे नृत्य सादर करण्याचे आधी, शिव, देवालयाजवळच्या थारगम (तारगम) नावाच्या जंगलात प्रथम प्रवेश करतात. मंत्र-तंत्र-जादूटोणा करणाऱ्या पाखंडी आणि धर्मद्वेषी साधकांची फार मोठी वस्ती या जंगलात वसलेली असते. महादेवांबरोबर या जंगलात, आदीशेषन अर्थात शेषनाग आणि सुंदर स्त्रीचे रूप धारण केलेले श्री विष्णूसुद्धा आलेले आहेत. देवालयाच्या ‘कोयिल पुराणम्’ संहितेत या घटनेच्या सूक्ष्म चिन्हसंकेताचे विस्ताराने वर्णन केले आहे.

 

शेषनाग आणि श्री विष्णूसह महादेवांना पाहाताच, या मांत्रिकांची आपापसात भांडणे सुरु होतात आणि त्याचा राग प्रथम महादेवांवर निघतो. मंत्रशक्तीने मांत्रिकांनी अग्नीतून निर्माण केलेला एक वाघ, महादेवावर हल्ला करतो. उजव्या हाताच्या तर्जनीच्या नखाने वाघाला फाडून, महादेव वाघाचे कातडे जणू रेशमी नाजूक वस्त्र म्हणून कमरेला गुंडाळतात. या हल्ल्यामागोमाग मांत्रिक एक प्रचंड विषारी मायावी साप महादेवाच्या अंगावर फेकतात. सापाला एका हातात धरून महादेवात्याला आपल्या मानेभोवती गुंडाळतात. इथे दर्शकाला महादेवाच्या प्रतिमेत नेहमी दिसणाऱ्या, कमरेला असणाऱ्या व्याघ्रजीनाचा आणि मानेवरच्या जहरी सापाचा संदर्भ मिळतो. या दोन हल्ल्यांनी विचलित न होता महादेव आपले नृत्य सुरु करतात तेवढ्यात दुष्ट-घातक असा मायावी ठेंगू असुर महादेवांवर धावून येतो. आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने महादेव त्याला जमिनीवर दाबून आणि त्याची पाठ मोडतात. हा ठेंगू असुर म्हणजेतो पाखंडी मांत्रिक समुदाय आणि सामान्य माणसाच्या अज्ञानाचेच रूपक आहे. नृत्याची सुरुवात करताना, महादेव सर्वप्रथम सृष्टीतील अज्ञानालाच नष्ट करतात. कारण, त्या नंतरच्या त्यांच्या नृत्याविष्कारातील विलक्षणमुद्रासंकेत प्रेक्षकांना समजणे महत्त्वाचे असते. महादेवाच्या अलौकिक रूपाने स्तब्ध झालेल्या मांत्रिकांचे सर्व हल्ले थांबले होते आणि मांत्रिक, अन्य ऋषीगण आणि समस्त देवदेवता, महादेवाच्या त्या नृत्याकडे अचंबित होऊन पाहात होते.

 

“तुमचे हे नृत्य आम्हाला पुन्हा पाहायचे आहे,” अशी विनंती सहस्त्रभुजाधारी शेषनागाने करताच महादेव त्या विनंतीचा स्वीकार करुन ते चिदंबरम देवालयाच्या सभागृहाच्या दिशेने निघाले. मंदिराच्या सभागृहात देव-देवतांच्या समोर त्यांनी पुन्हा हे नृत्य सादर केले. याच नृत्यमुद्रेची म्हणजेच नटराजाची प्रतिमा चिदंबरम देवालयात त्याकाळात तांब्यामध्ये बनवली गेली आणि स्थापन केली गेली. कालांतराने ती विश्वविख्यात झाली. या नृत्यात शिवा चतुर्भुज अर्धनारीनटेश्वर शरीर मुद्रेत आहेत. शिवाची सुंदर केशभूषा, केसात माळलेले हिरे- माणके-मोती आणि नृत्याच्या आवेगात तरंगणाऱ्या दाट केसांच्या बटा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या. दाट कुरळ्या केसांवर, दालचिनीच्या मंद सुवासिक पानांचा विणलेला मुकुट आणि त्यावर चंदेरी चंद्रकोर, केसांवर मंद तुषार सिंचन करणारी वाहती गंगा नदी, मानेवर डोलणारा सर्प आणि कवट्याची माळ अशी अलौकिक आभूषणे धारण करणाऱ्या शिवाच्या उजव्या कानात पुरुषाची कर्णआभूषणे, तर डाव्या कानात स्त्रीची कर्णआभूषणे होती. दंडावर वाक्या, मनगटावर कडी, बोटांत अंगठ्या, कमरेला मेखला, पायाच्या बोटात जोडवी असा नखशिखांत सजलेला-नटलेला नटराज. कमरेला घट्ट नेसलेले आखूड धोतर, गळ्यात उपरणे आणि जानवे असा नटराज आता नृत्यात मग्न झाला आहे. शिवाच्या वरच्या उजव्या हातात डमरू, तर खालचा उजवा हात अभयमुद्रेत. वरच्या डाव्या हातात अग्नी तर खालचा डावा हात, उजव्या पायाखाली दाबलेल्या मुयालक आसुराकडे अर्थात सृष्टीतील सजीवांच्या अज्ञानाकडे अंगुलीनिर्देश करतोय. या अज्ञानचे रूपक असलेल्या असूर मुयालाकाच्या एका हातात जहरी नाग आहे. सृष्टीतील अज्ञानाबरोबरच, सजीवांच्या मनातील भ्रष्ट-दुष्ट-हीन विचार आणि मनस्थितीचे हा नाग रूपक आहे. शिवाचा डावा पाय गुडघ्यात उंच मुडपलेला आहे. त्या पायाच्या अंगठ्याने, महादेव विश्वाच्या मध्यावरील सांकेतिक हृदयाला स्पर्श करत आहेत. डाव्या पायाची या मुद्रेच्या विलक्षण चिन्हसंकेताचे वर्णन ‘कोयिल पुराणम्’ संहिता करते.

 

शिवा उभे आहेत, त्या कमालासनावरून एक अग्नीशिखांनी नटलेली प्रभावळ त्यांच्या भोवती नक्षीदार कमान करते आहे आणि शिवाचे डमरू आणि अग्नी धारण करणारे वरचे दोन हात त्या कमानीला हलकाच स्पर्श करत आहेत. अशा अलौकिक नृत्यमुद्रेत शिवा आता तल्लीन होऊन नृत्य करत आहेत आणि समस्त देवीदेवता, ऋषी यांच्यासह सृष्टी त्या नृत्यात जणू एकरूप झाली आहे. कुमारस्वामी पुढे लिहितात, “कुठल्याही लिखित साहित्याचा संदर्भ न घेता, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाशिवाय या नृत्याविष्काराचे आकलन प्रेक्षकांसाठी सहज आणि सुलभ आहे. कारण, महादेवांनी नृत्याच्या प्रारंभी सृष्टीतील सर्व सजीवांच्या अज्ञानाचे निराकरण केले होते.” शंभर वर्षांपूर्वी कुमारस्वामी पुढे नोंद करतात की, “सुदैवाने आज या नृत्याचे वर्णन करणऱ्या संहिता उपलब्ध आहेत. यामुळेच या नृत्यातील नटराजाच्या हस्तमुद्रा आणि शरीरमुद्रा आणि मौखिक अभिनय यासह त्यातील सूक्ष्म अलिखित तरीही निश्चित चिन्हसंकेत समजून घेणे आपल्याला शक्य झाले आहे.”

 

एक लक्षात घ्यायला हवे की, लांब कुरळ्या केसांच्या स्मशान योग्यालाच शोभणाऱ्या अस्ताव्यस्त बटा, ताज्या हिरव्या पानांचा हार, ब्रह्माचे प्रतिक असलेली कवटी, मस्तकावरून वाहणारी गंगा, गळ्यातला नाग, दोन्ही कानातील वेगवेगळी कर्णभूषणे आणि वरच्या उजव्या हातातला डमरू ही सगळी या नृत्यातील वैशिष्ट्ये खास शिवाची स्वतःची ओळख आहे, ही या नृत्याची ओळख नव्हे. एका बैरागी योग्याच्या नृत्यात त्याच्या सान्निध्यात असलेली ही सर्व सजीव आणि निर्जीव चिह्ने काही सूक्ष्म अर्थसंकेत देतात. या नृत्याला ‘नादांतनृत्य’ असे संबोधित केले गेले. याबद्दल शिवभक्तांचे म्हणणे असे की, शिवा त्यांची प्रेरणाशक्ती वापरून सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण करतात. खरे म्हणजे, या नादांतनृत्यातून महादेवाने विश्वासाठी योजलेली पाच मूलभूत तत्वे व्यक्त होतात. स्थिती-सृष्टी-संहार-तीरोभाव-अनुग्रह या महादेवाच्या पाच वैश्विक कार्यकक्षा.

7400173637

@@AUTHORINFO_V1@@