दुर्योधनाचा विलाप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018
Total Views |



तुम्ही सेनापती आहात म्हणून विजय आपलाच आहे, असे मी समजत होतो, पण अजून तुम्ही एकाही पांडू पुत्राला मारले नाही. मला तर हे युद्ध एका दिवसात संपेल अशी आशा होती. पण ती फोल झाली.

युद्धात झालेल्या नुकसानामुळे दुर्योधन खूप दु:खी होता. अशा वेळी त्याला एकच व्यक्ती जवळची वाटत होती. ती व्यक्ती म्हणजे राधेय! त्याने आपल्या मनातील दु:ख राधेयाकडे प्रकट केले. आपल्या चोवीस भावांचा मृत्यू, सैन्याचा प्रचंड संहार, भीष्मांची वागण्याची तर्‍हा याविषयी तो खूप पोटतिडिकेने बोलला. राधेय म्हणाला, “मित्रा, अजिबात दु:खी होऊ नकोस. तुझी परिस्थिती पाहून मलाही वाईट वाटले; पण, तुझे सांत्वन कसे करावे, ते मला समजत नाही. तुझ्या चेहर्‍यावरचे स्मित हीच एक गोष्ट मला प्रिय आहे.“ दुर्योधन म्हणाला,” द्रोण, भीष्म, शल्य आणि कृप यांनी तर ठरवले आहे की, पांडवांचा वध करायचा नाही. ते पांडव सैन्याचा विनाश मात्र करत असले तरी तेव्हढे पुरेसे नाही. तू पण लढत नाहीस, म्हणून माझा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. राधेय म्हणाला, “दुर्योधना, तुझे आजोबा भीष्म यांचे पांडवांवर अतिशय प्रेम आहे आणि त्यांचा पराभव करण्याची शक्ती भीष्मांच्यात नाही. तू त्यांना शस्त्र खाली ठेवा, म्हणून सांग मग मी बघतो. मग, मीच शस्त्र हाती घेऊन पांडवांचा नि:पात करीन आणि तुझे स्मित तुला पुन्हा मिळवून देईन. मी स्वत: अर्जुनाला ठार करीन.” त्याचे हे बोलणे ऐकून दुर्योधन शांत झाला.

 

दुसर्‍या दिवशी दुर्योधन भीष्मांकडे गेला आणि म्हणाला,”आजोबा, तुम्ही देवांनाही हरवू शकता एवढे सामर्थ्य तुमच्यात आहे. तुमचे पांडवांविषयीचे गाढ प्रेम तुमच्या आड येते आहे. मला मात्र, त्यांचा मृत्यू हवा आहे. माझ्याविषयी तुमच्या मनात काहीतरी किन्तु आहे. मी खूप दुर्दैवी आहे. तुम्हाला युद्ध नको असेल, तर तुम्ही शस्त्रे खाली ठेवा आणि राधेयाला लढू द्या. मला जे हवे आहे, ते तो करेल.“ त्याच्या अशा कठोर बोलण्यामुळे भीष्म खूप दु:खी झाले. त्यांना रागही आला. पण त्यांनी तो व्यक्त केला नाही. ते इतकच म्हणाले,” तू रोज रोज तेच का मला सांगतो आहेस? मी तर तुझ्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहे आणि माझा बली देतो आहे, तरी तू असे बोलावे? याचे मला आश्चर्य वाटते. पांडव अजिंक्य आहेत, हे तुला पुन्हा पुन्हा सांगूनही लक्षात कसे येत नाही? अरे, सर्व जगाचा रक्षणकर्ता कृष्ण, जोवर त्यांच्या बाजूला आहे; तोवर हे अशक्य आहे. तू मूर्ख आहेस. मी उद्या त्यांचे सारे सैन्य जाळून दाखवतो. याहून अधिक मी काय करू? जा जाऊन झोप. तू खूप दमला आहेस.“ हे ऐकून दुर्योधनाचे थोडेसे समाधान झाले, पण राधेयाशिवाय कोणी आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही हे त्याला कळले. पण भीष्म जोवर आहेत तोवर मी लढणार नाही, असे राधेय म्हणत होता. राधेय पण मनातून खूप दु:खी होता. आपल्या प्रतिज्ञेमुळे त्याचे हात बांधले गेले होते.

 

हा विचित्र पेच कसा सोडवावा? याचा विचार करत राधेय आणि दुर्योधन या दोघांनी पण ती रात्र तळमळतच घालवली. ‘कृष्ण हा विश्वाचा स्वामी आहे,’ यावर दुर्योधनाचा अजिबात विश्वास नव्हता. त्याला भीष्म आजोबांचीच अडचण वाटू लागली, तर राधेयाला आपण मित्राची मदत करायला पाहिजे ही ओढ लागली होती. त्याला आपली कीर्ती टिकून राहो आणि रणांगणात वीरमरण येवो, असे वाटत होते.

 
@@AUTHORINFO_V1@@