मुंबई : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी आज जोरदार टीका केली आहे. राणे यांनी व्यंगचित्रामधून भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत.
राणे यांनी आपल्या व्यंगचित्रामध्ये भिडे गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. यामध्ये भिडे गुरुजींच्या अलीकडील वेताळ वक्तव्यांना उद्देशून शिवाजी महाराज हे भिडे गुरुजींना समज देत असल्याचे राणे यांनी चित्रात रेखाटले आहे. दरम्यान राणे यांच्या या व्यंगचित्राला सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिसाद मिळत असून काही जण राणे यांना पाठींबा देत आहेत. तर काहीजण भिडे गुरुजींच्या बाजूने बोलत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे गेल्या शनिवारी पुणे मुक्कामी आले होते. यावेळी पुणे शिवाजीनगर येथे संभाजी भिडे आणि त्यांचे अनुयायी पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी म्हणून याठिकाणी आले होते. पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील जंगली महाराज मंदिरामध्ये भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची तुलना मनुशी करत, 'मनु' हा ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यापेक्षा देखील सरस होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातूनच टीकेची झोड उठली होती.