काँग्रेसने पुन्हा एकदा आळवला सॉफ्ट हिंदुत्वाचा राग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

गंगा नदीतील प्रदुषणावरून मोदींवर साधला निशाणा

 
 
 
नवी दिल्ली : गेल्या काही निवडणुकांपासून धडा घेऊन काँग्रेस पक्षाने आता देशातील हिंदूंनाही चुचकारायला सुरुवात केल्याचे दिसते आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये पक्षापासून हिंदू व्होट बँक फारच लांब गेल्याची जाणीव झाल्यामुळेच काँग्रेसने आता सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग अवलंबल्याचे दिसते. त्याची सुरुवात गुजरात निवडणुकांपासून झाली व त्याची चांगली फळंही काँग्रेसला मिळाली. गुजरातमध्ये दररोज मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या राहूल गांधींच्या काँग्रेसने आता पुन्हा एकदा तोच सॉफ्ट हिंदुत्वाचा राग आळवायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील हिंदू मतांची बेगमी करता यावी म्हणून काँग्रेसकडून असे केले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
 
भारतमाता, गोमाता आणि गंगामाता या खरंतर आजपर्यंत भाजप आणि हिंदुत्ववादी मंडळींना प्रिय असणाऱ्या मुद्द्यांवर आता काँग्रेसनेही भर द्यायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये हिंदू मतदारांना काँग्रेसला चांगलाच हात दाखवल्यामुळे आता त्या राज्यातील हिंदूंना आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे. जे लोक गंगा सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार हा कधीकाळी मोदींना विचारलेला प्रश्न आता काँग्रेसनेच मोदींना परत विचारला आहे. गंगा नदीतील प्रदूषणाचे प्रमाण गेल्या ४ वर्षांत वाढल्याचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या सोशल मिडिया हँडलवरून प्रदर्शित केला आहे.
 
 
 
या व्हिडिओत काँग्रेसने भगवान शिव, पार्वती, गंगा आणि हिंदू समाज यांचा चक्क आदराने उल्लेख केला आहे. सहसा हिंदू देवदेवतांना पाण्यात पाहणाऱ्या काँग्रेसला गंगेच्या पाण्याची चिंता कशी काय वाटायला लागली याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली याची कथा जशी हिंदू पुराणांमध्ये सांगितली जाते तशीच्या तशी या व्हिडिओत सांगण्यात आली आहे हे विशेष. केवळ एवढेच नव्हे तर गंगेच्या पाण्यात औषधी आणि आध्यात्मिक गुण असतात असा चक्क देशातील सर्वसामान्य हिंदू करतात तसा दावा देखील करण्यात आला आहे.
 
 
तिनही लोकांमध्ये प्रवाहमान असणारी गंगा ही एकमेव नदी आहे. मात्र लोकांच्या कल्याणासाठी तिने पृथ्वीवर राहण्याचा निर्णय घेतला आहे असे चक्क या व्हिडिओत काँग्रेसने म्हटले आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता हिंदू गंगेला देवी मानतात आणि तिच्या पवित्र जळामध्ये आध्यात्मिक ताकद असल्याची मान्यता आहे असे देखील व्हिडिओ पुढे सांगतो. त्याही पुढे जाऊन गंगेच्या संरक्षणासाठी १९८६ मध्ये राजीव गांधी यांनी गंगा अक्शन प्लॅन सुरु केला होता असे सांगत राजीव गांधीच्या कपाळावर गंध असलेला फोटो जाणीवपूर्वक दाखवलेला आहे.
 
 
सामान्यपणे हिंदूंच्या श्रद्धास्थानांबद्दल काँग्रेसने कधीही जाहीर आस्था प्रकट केल्याचे ऐकिवात नाही. किंवा कधी भारताच्या गौरवशाली इतिहासाचा दाखला काँग्रेसने दिल्याचे एखादे उदाहरण देखील सापडत नाही. त्यामुळेच आता आगामी निवडणुकीत हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडून येणाऱ्या काळात अशा अनेक व्हिडिओ आणि कार्यक्रमांचा मारा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा एकदा सॉफ्ट हिंदुत्वाचा राग आळवणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@