गड्यांनो, जरा ‘नितीसवां’कडून शिका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |



नितीशकुमारांनी लालूंची साथ सोडल्यास ना भाजपचा फायदा आहे ना त्यांचा. फायदा लालूंचा आहे, जे नितीशकुमारांना भविष्याच्या दृष्टीने परवडणारं नाही. शिवाय, भाजपला बिहारमध्ये नुकसान झालं, तरी ते इतर राज्यांत भरून काढता येतं. नितीशकुमार जाणार कुठे?

 

जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया आदी समाजवादी परंपरेतील दिग्गज नेत्यांचे राजकीय वारसदार, अनुयायी म्हणवून घेणारे अनेक पट्टशिष्य पुढे या दोघांचे नाव धुळीस मिळवण्याचाच विडा उचलल्यासारखे वागले. अनेकांची राजकीय कारकीर्द, राजकीय निष्ठा आणि चारित्र्य आदी सगळंच वादविवादांनी, आरोपांनी बरबटलेलं राहिलं. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव हे त्यातील दोन नरशिरोमणीच. या सर्वांपेक्षा स्वतःची वेगळी छाप पाडणारे, उत्तर भारतात आणि भाजप-काँग्रेस आदी राष्ट्रीय पक्षांखेरीज इतर पक्षांतून ‘एक आश्वासक नेतृत्व’ अशी ओळख मिळवण्यात यशस्वी ठरलेले नेते म्हणजे नितीशकुमार. या नितीशकुमारांचा केवळ एकच दुर्गुण असा की, बिहारबाहेर आपल्या व्यक्तिगत नेतृत्वाचं आणि पक्षाचं फारसं अस्तित्व नसताना आणि खुद्द बिहारमध्येही त्यांचा अगदी एकछत्री अंमल नसतानाही त्यांची राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा अचानक उचल खाते. अर्थात, प्रादेशिक पक्षांपैकी ममता बॅनर्जी, मुलायमसिंह, शरद पवार वगैरे अनेकांना तशी स्वप्नं अधूनमधून पडत असतात. मात्र, सगळ्यांची सगळीच स्वप्नं काही दरवेळी सत्यात उतरू शकत नाहीत. त्यामुळे अंतिमतः या कुणाचंच काहीच खरं होत नाही. या वास्तवाची जाण किमान आतातरी ‘नितीसवां’ना आलेली दिसते. म्हणूनच हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावण्याचे उद्योग थांबवून ते इमानेइतबारे ‘आपण बरं आणि आपलं बिहार बरं’ अशा बचावात्मक मूडमध्ये गेल्याचे दिसते.

 

म्हणूनच, नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी लालूंना रातोरात काडीमोड देऊन रस्त्यावर आणल्यानंतर नितीश भाजपमध्ये आले. तीन वर्षं भाजप आणि मोदींवर वारेमाप चिखलफेक करून झाल्यानंतर पुन्हा नितीश भाजपच्याच गोटात चूपचाप सामील झाले. भाजपनेही ही ‘घरवापसी’ आनंदाने स्वीकारली. मात्र, पुन्हा एकदा नितीसवा रूसले. पुन्हा एकदा ते एनडीएच्या व्यासपीठांपासून दूर राहू लागले, त्यांच्या कथित नाराजीच्या बातम्या डोकं वर काढू लागल्या आणि नेहमीप्रमाणे २०१९ मध्ये नितीशकुमार भाजपची साथ सोडणार, अशी चर्चा सुरू झाली. हे असं आघाड्या करणं आणि मोडणं यांमध्ये नितीश हे मुलायम, लालू, ममता, पवार, देवेगौडा आदी विक्रमादित्यांच्याही पुढे जातात की काय, अशी चिन्हं दिसत असतानाच त्यांनी अखेर थोडं सबुरीने घेत भाजपसोबतच राहायचं ठरवलं असेल, तर त्याला शहाणपणाचं लक्षण मानावं लागेल. केंद्र सरकारच्या ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हे सारं अचानक कसं काय घडलं, अशी कोणती जादूची कांडी फिरली की, नितीशकुमारसारख्यांचा काडीमोड घेण्याचा वेग तिने रोखला, हे अद्याप समजलेलं नाही. कदाचित, लालूप्रसाद यादवांच्या पक्षाने पोटनिवडणुकांत मिळवलेला विजय त्यांना भीती दाखवत असावा किंवा स्वपक्षांतर्गत वाढत चाललेल्या असंतोषाचीही त्यांना धास्ती वाटत असावी.

 

वास्तविक पाहता, नितीशकुमार हे केंद्रात रेल्वे, कृषी, भूपृष्ठ वाहतूक अशा वजनदार खात्यांचा तेही अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात कारभार सांभाळलेले, तसेच बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषविणारे राष्ट्रीय स्तरावरील वजनदार नेते. पण, तितकेच ते एककल्ली स्वभावाचे आणि स्वतःचं वर्चस्व पुरेपूर राहील, याची काळजी घेणारे. त्यामुळे भाजपच्या सुशीलकुमार मोदींसारख्या माणसाव्यतिरिक्त त्यांचं फारसं कुणाशी कधी पटलं नाही. अगदी शरद यादवांशीही नाही. ज्याच्या विरोधात संघर्ष करून नितीशकुमारांची राजकीय कारकीर्द घडली, त्या लालूंशी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत हातमिळवणी करून स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावण्यात त्यांनी धन्यता मानली. का, तर केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं, त्यापूर्वी, २००१ पासून मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी होते आणि त्याच भाजपच्या केंद्रातील मंत्रिमंडळात नितीश रेल्वेमंत्री होते. २०१४ पर्यंत जेडीयु रालोआत होता. तेव्हा कधी नितीशकुमारांची कथित धर्मनिरपेक्षता आड आली नाही. राष्ट्रीय स्तरावर आपल्याला पंतप्रधानपदाचा ‘जॅकपॉट’ लागू शकतो, अशी शक्यता दिसू लागल्यावर त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या मागे लागून अचानक रालोआची साथ सोडली. आपण नसलो तर भाजपची गाडी पुढे सरकणार नाही आणि सत्तेसाठी भाजपला आपल्याच दारात यावं लागेल, अशी त्यांची तेव्हाची अटकळ, पण नंतर काय झालं, हे सर्वांनी पाहिलं. लोकसभा निवडणुकीत मोदींनी नितीशकुमारांचा अक्षरशः धुव्वा उडवला. जेमतेम दोन जागा मिळवत तेव्हा जेडीयुने आपली लाज राखली होती. मग भाजपचा वारू रोखण्यासाठी त्यांनी चक्क लालूंशी हातमिळवणी केली. काँग्रेस, लालू आणि नितीश असं भलतंच ‘महाठगबंधन’ बिहारमध्ये तयार झालं, ज्याने मतांच्या टक्केवारीचं गणित बरोबर जुळवत सत्तासोपान गाठला. मात्र, यात भलं झालं ते लालूंचंच आणि नुकसान जेडीयुचं. ज्या लालूंच्या भ्रष्ट, अराजकतावादी राजकारणाला नितीश आणि भाजपच्या युतीने पुरतं नेस्तनाबूत केलं होतं, त्या लालूंना नितीशकुमारांच्या या घोडचुकीने नवसंजीवनी दिली. जेडीयुपेक्षाही जास्त जागा राजदला मिळालेल्या असल्याने मग लालू आणि लालुपुत्राचे चोचले पुरवणं आणि भ्रष्टाचाराच्या रोज नव्याने होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करणं, एवढंच त्यांच्या हाती उरलं. काँग्रेस तर तशीही बिहारमध्ये केव्हाच निस्तेज झालेली असल्याने तिच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता. अखेर उपरती झाली आणि नितीश रातोरात रालोआत आले. घर सोडून गेलेल्या आणि दुनिया फिरून पस्तावलेल्या मुलाला बाप मोठ्या मनाने घरात घेतो, तसंच भाजपने त्यांना स्वीकारलंदेखील. एवढं रामायण होऊन आता पुन्हा नितीश भाजपवर रुसून वगैरे बसतात म्हटल्यावर आता काय बोलणार?

 

आता नितीश पुन्हा भाजपसोबत राहायचं म्हणत असले तरी पुढे जागावाटप हा एक मोठा अडचणीचा भाग असेल. कारण, लोकसभा निवडणुकीत बिहारच्या ४० पैकी एकट्या रालोआने ३२ जागा मिळवल्या होत्या आणि जेडीयुने अवघ्या दोन. त्यामुळे आता २०१९ मध्ये नितीश मनाला येईल तो आकडा सांगतील खरा, पण मोदी-शाह ते सगळंच केराच्या टोपलीत फेकून देतील, हेही निश्चित. ‘२०-२०’चा फॉर्म्युला ठरला तरी भाजपचंच नुकसान आहे, कारण भाजपकडे आत्ताच २२ जागा आहेत. नितीशकुमार रालोआत असल्याने भाजपला फायदा जरूर होईल, मात्र म्हणून नितीश सांगतील ते ऐकणं आणि त्यांचे रुसवेफुगवे काढणं, हे काही होण्यातलं नाही. शिवाय, नितीश आता पुन्हा लालू किंवा काँग्रेसकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे नितीशकुमारांनी लालूंची साथ सोडल्यास ना भाजपचा फायदा आहे ना त्यांचा. फायदा लालूंचा आहे, जे नितीशकुमारांना भविष्याच्या दृष्टीने परवडणारं नाही. शिवाय, भाजपला बिहारमध्ये नुकसान झालं, तरी ते इतर राज्यांत भरून काढता येतं. नितीशकुमार जाणार कुठे? भाजपला, विशेषतः पक्षातील नव‘चाणक्यां’ना नाक दाबून तोंड उघडण्याची कला चांगलीच अवगत आहे. मात्र, तरीही, कुंपणावर बसलेली मुलायम, पवार, ममतांसारखी अन्य मंडळी यातून धडा घेण्यास तयार नाहीत. पंतप्रधानपदाचं बाशिंग त्यांनी गुडघ्याला बांधलं असलं तरी २०१९ मध्ये पुन्हा एकदा या तिसऱ्या आघाडीची ढोपरं फुटणार, हे स्पष्टच दिसत आहे. त्यामुळे काळाची पावलं ओळखत नितीसवांनी जो शहाणपणा दाखवला, त्यातून या मंडळींनीही काही धडा घेतला तर त्यातच त्यांचं हित सामावलेलं आहे.

@@AUTHORINFO_V1@@