राजकारणाचेही झाले क्रिकेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |
 

 
 
जसे शेवटच्या चेंडूपर्यंत जय-पराजयाचा अंदाज लावता येत नाही त्याचप्रमाणे राजकारणातही शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल ठोस विधान करता येत नाही. कारण शेवटच्या चेंडूवर षटकार लागतो की दांडी गुल होते याची जशी धाकधूक असते तसेच राजकारणातही शेवटच्या क्षणीच निर्णय होत असतो. जळगाव महापालिकेतील राजकारणही सध्या असेच क्रिकेटसारखे झाले आहे. कालपर्यंत तडजोडीच्या भूमिकेत बॅकफूटवर असलेल्या भाजपाने ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘टिप्स’ अंमलात आणून जो षट्कार हाणला त्याने सर्वांचेच डोळे दिपले आहेत.
 
‘अनिश्‍चिततेचे दुसरे नाव म्हणजे क्रिकेट’ असे आजवर म्हटले जायचे. मात्र, हल्ली राजकारणही क्रिकेटएवढेच अनिश्‍चित आणि बिनभरवशाचे झाले आहे का ? असा प्रश्‍न पडावा असा अनुभव रविवारी सर्वांना आला. १० दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेल्या महापौर ललित कोल्हे यांनी अत्यंत नाट्यमय घडामोडीत रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील आणि जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करून खळबळ उडवून दिली. जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या १ ऑगस्ट रोजी मतदार मतदानाचा हक्क बजावून आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. ही निवडणूक सुरूवातीपासूनच गाजत होती. भाजप आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हा प्रश्‍न अखेरपर्यंत प्रश्‍नच राहिला.
 
 
कधी अधिक जागांच्या मागणीवरून तर कधी ‘इलेक्टिंग मेरिट’चे उमेदवार दाखवा आणि मग जागांची मागणी करा अशा शिवसेनेकडून आलेल्या सूचनेने नेते अस्वस्थ होते. महापालिकेत सध्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक जागांची मागणी होणे स्वाभाविक आहे. भाजपानेही अधिक ताठर भूमिका न घेता जुळवून घेण्याचाच प्रयत्न केला. मात्र, दरवेळी नकारात्मक उत्तरे अधिक ऐकावी लागल्याने आणि पदोपदी अडवणूक झाल्याने भाजपानेही मग ताठर भूमिका घेण्याचा निर्णय घेवून पावले टाकायला सुरूवात केली. भाजपा आणि खान्देश विकास आघाडी यांची युती झाली नाही तर शिवसेनेच्याच चिन्हावर ही निवडणूक लढविण्याचे संकेत जेव्हा मिळाले तेव्हा भाजपानेही जागांच्या वाटपाबाबत ‘आर पार’ची भूमिका घेतली. या निवडणुकीत भाजपा-खाविआ युती झाल्यास आपल्याला उमेदवारी मिळण्यास अडचण येऊ शकते हे दिसल्याने भाजपातील कार्यकर्ते नाराज होते. युती झाली तर आम्ही एकतर मतदान करणारच नाही आणि मतदान केले तरी ते युती वगळता अन्य उमेदवारांना करू असा सूरही कार्यकर्त्यांमधून उमटू लागला होता. गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांमधील हा असंतोष आणि त्यांचा उग्र स्वर अधिक उंच झाला. अशा स्थितीत कुणी पक्षनिष्ठा मनापासून पाळेलच याची शाश्‍वती नसते. या स्थितीत पक्षाला अंतस्थ धोका निर्माण होऊ शकतो. भाजपाने प्रारंभापासूनच ‘मिशन-५० प्लस’ची घोषणा केली होती. काहीही झाले तरी यावेळी निवडणुकीत बहुमत घेऊन महापालिकेत सत्ता हस्तगत करायचीच असा चंग बांधून भाजपा कार्यकर्ते कामाला लागले. नेत्यांनीही ‘भाजपा स्वतंत्रपणे लढेल आणि मनपामध्ये सत्ता हस्तगत करेल’ अशी विधाने दरवेळी केल्याने कार्यकर्त्यांचीही तशी मनोभूमिका तयार झाली होती.
 
प्रत्यक्षात मात्र, भाजपा-खाविआ युतीचे घोंगडे अखेरपर्यंत तसेच भिजत राहिले. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी जळगाव महापालिकेत भाजपा-शिवसेना युतीसाठी जरी हिरवा कंदील दाखविला होता तरी प्रत्यक्षात जळगावची स्थिती त्याला अनुकूल नव्हती. युती झाली तर आपले काय ? हा प्रश्‍न इच्छूक उमेदवारांच्या मनात होता. मुक्ताईनगरला नगरपंचायतची निवडणूक असल्याने जळगाव महापालिका निवडणुकीकडे लक्ष देणे जमणार नाही असे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी सांगितल्याने ना.गिरीश महाजन यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे आली. मात्र, गिरीशभाऊंनी नेतृत्त्व माझ्याकडे असले तरी मार्गदर्शन नाथाभाऊंचेच राहील असे जाहीरपणे घोषित केल्याने अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला. गिरीशभाऊ कामाला लागले. बैठका, चर्चा होऊ लागल्या, रणनीती तयार होऊ लागली, कार्यकर्ते कामाला लागले, प्रभागनिहाय ‘पक्का’ उमेदवार ठरविण्यात आला आणि बघता बघता भाजपाच्या शक्तीचा प्रत्यय येऊ लागला. यादी तयार झाली. रविवारी ना.चंद्रकांतदादा जळगावला आले आणि या निवडणूक नाट्यातील तिसरा अंक सुरू झाला. त्यासाठी ना.गिरीशभाऊ आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी व्यूहरचना करून भाजपामध्ये येण्यास कोण-कोण इच्छूक आहेत त्याचा आधीच शोध घेतला होता. मात्र, त्याबद्दल अत्यंत गोपनियता पाळण्यात आली. या कानाचे त्या कानाला कळणार नाही याची खबरदारी घेऊन पावले टाकण्यात आली. युतीबद्दल आज काहीतरी ठोस निर्णय होईल या प्रतीक्षेत असलेल्यांना चंद्रकातदांनी जाता-जाता षटकार ठोकत ललित कोल्हे यांचा भाजपात प्रवेश घडवून आणला अन् सारेच अवाक् झाले. या निवडणूक नाट्याचे हे भरतवाक्य ठरले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@