देवघर पुलाचे काम अद्यापही अपूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |




प्रवाशांना तीन किमी अंतराचा मारावा लागतो फेरा


वाडा: तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीच्या कुडूस - चिंचघर - देवघर या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे.देवघर येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने या परिसरातील नागरिकांना गुंज - काटी मार्गे तीन किमी अंतराचा फेरा मारावा लागत आहे.तसेच कुडूस-चिंचघर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी साईडपट्टीचे काम अपूर्ण असल्याने प्रवास धोकादायक बनला असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

 

कुडूस-चिंचघर-गौरापूर हा १२ किमी अंतराचा रस्ता असून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी ९ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून कुडूस ते चिंचघर हा १३५० किमीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण तर चिंचघर ते गौरापूर रस्ता डांबरीकरण होणार आहे. रस्त्याचे काम सांगळे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.

 

रस्त्याच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात एका वर्षानंतर झाली. त्यानंतर हे काम संथगतीने झाल्याने पावसाळा सुरू झाला तरी हे काम झालेले नाही. देवघर येथील पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने देवघर, गौरापूर येथील नागरिकांना तीन किमी अंतराहून गुंज काटी मार्गे फेरा मारावा लागत आहे तर कुडूस-चिंचघर या अंतराचे काँक्रिटीकरण झाले असले तरी साईट भराव न केल्याने वाहने रस्त्यावरून खाली उतरवता येत नाहीत. त्यामुळे कुडूस अभिषेक सिनेमा परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांना चारचाकी घरापर्यंत नेता येत नसून ते आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे ठेवत असल्याचे अनेकांनी सांगितले. रस्त्याच्या दुतर्फा साईटभराव न केल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. दोन दुचाकीस्वार रस्त्यावरून खाली पडून जखमी झाले आहेत. तसेच अनेकजण घसरून पडले आहेत.ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना होत असल्याने ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करून ते पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. या संदर्भात ठेकेदार संदीप गणोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

या रस्त्यासाठी आम्ही ठेकेदाराला वेळोवेळी सहकार्य केले आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराला पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे सात हजार विद्यार्थी व हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून ते संताप व्यक्त करीत आहेत. ठेकेदाराच्या गलथानपणाचा फटका येथील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी बोलताना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@