नेतृत्त्वासमोर प्रश्‍न आहेच, ‘शहरविकास की, राजकारण?’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |

 
 
सन २०१३ मधील निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. एकूण ७५ जागांपैकी सर्वात जास्त ३२ जागा मिळविलेल्या खाविआला सत्ता स्थापनेसाठी इतरांचा टेकू घ्यावा लागला. भाजप तेव्हा १५ जागांपुरती मर्यादित राहिला होता. नंतरच्या घडामोडीत मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनीही सत्ताधारी गटाला जवळ केले. आता निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मनसेचे नेते ललित कोल्हे यांनी आपण कार्यकर्त्यांसह सुरेशदादांसोबत असल्याचे घोषित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसही खाविआसोबत आघाडी करण्यास उत्सुक होती, तर खाविआचे नेतेही भाजपसोबत घरोबा करण्यास सुरुवातीपासूनच इच्छुक होते. प्रश्‍न होता तो भाजपच्या भूमिकेचा.
 
 
जळगाव महापालिका निवडणुकीचे सर्वाधिकार मिळालेल्या ना. गिरीश महाजन यांनी भाजप विरोधकांचे मनसुबे उधळून लावत खाविआला जवळ केले. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘हिरवा कंदील’ मिळविला. परंतु त्यांचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. भाजपने इतकी वर्षे सुरेशदादांना विरोध केला. त्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढले आणि आज त्यांनाच कसे काय सोबत घ्यायचे? स्वबळावर निवडून येण्याएवढीही भाजपची ताकद नाही काय? यासारखे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. ही नाराजी जशी उघडपणे तशीच पडद्याआडही व्यक्त होत आहे.
 
 
गेल्या १० वर्षांत शहराचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. महापालिकेवर साडेतीनशे कोटींहून अधिक थकित कर्जाचा भार आहे. प्रशासनाला नागरी सुविधांवर निधी खर्च करण्याऐवजी दरमहा ३ कोटी रुपयांचा हप्ता हुडकोला भरावा लागत आहे. मूळ कर्जाच्या तिप्पट रक्कम आजपर्यंत व्याजात भरली गेली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर निकाल लागलेला नाही. गाळेकराराची समस्या २०१२ पासून सुटलेली नाही. खाविआ महापालिकेत सत्ताधारी असली, तरी हे महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांना यश आलेले नाही. अनेक नवीन योजना त्यांना स्वबळावर शहरात आणता आलेल्या नाहीत. त्यासाठी भाजपची मदत घ्यावी लागली आहे, हेही वास्तव जळगाववासियांपासून लपलेले नाही. घरकुल घोटाळाप्रकरणी झालेल्या तुरुंगवारीनंतर सुरेशदादांनी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यांच्यापासून आधीच प्रदीप रायसोनी, लक्ष्मीकांत चौधरी यांच्यासारखे कार्यकर्ते दुरावले आहेत. खाविआलाही स्वबळावर मनपात सत्तेवर येण्याची खात्री नसावी. त्यामुळे त्यांना बेरजेचे राजकारण करणे क्रमप्राप्त आहे.
 
 
दुसरीकडे शहराचा विकास साधत जळगावकरांचा विश्‍वास संपादन करण्याची नामी संधी भाजपला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तेथील विकासासाठी भाजपने-पीडीपीशी युती केली होती. विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नांना पीडीपीकडून साथ मिळत नसल्याचे लक्षात येताच भाजपने काडीमोड घेतला. तेथे भाजपची भूमिका स्पष्ट होती. जळगावमध्येही सुरेशदादांनी शहराच्या विकासासाठी भाजपची साथ मागितली आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे आणि यापुढेही राहील, असा अंदाज सुरेशदादांनी नक्कीच लावला असणार. त्यांचे आडाखे काहीही असोत पण भाजपला यानिमित्ताने मोठे होण्याची संधी चालून आली आहे. भाजप स्वबळावर विकासाच्या अनेक योजना शहरात आणू शकते. यापूर्वी २५ कोटी रुपये, ‘अमृत’ अंतर्गत महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना जळगावसाठी मंजूर होणे हे भाजप नेतृत्त्वामुळेच शक्य झाले आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता भाजपने गेली अनेक वर्षे सुरेशदादांना विरोध केला. आताही पक्ष कार्यकर्त्यांची स्वबळावरच निवडणूक लढविण्याची मागणी आहे. ‘५० प्लस’चा ध्यास आहे. यात गैर काहीच नाही. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांना गेले एक ते दीड वर्ष विरोधकांनी चौकशी आणि कोर्ट-कचेर्‍यात गुंतवून ठेवल्यामुळे त्यांना जळगावच्या विकासाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळू शकला नाही. कायम आरोप-प्रत्यारोप आणि कोर्टबाजीने तेही कंटाळून गेले होते. त्यातच आ. खडसे यांच्या होमपीचवर अर्थात मुक्ताईनगरला नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. पर्यायाने जळगावपेक्षा तेथे त्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच झाली. त्याची आचारसंहिता संपते न संपते तोच राज्य निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे एक महिना अगोदरच जळगाव मनपाची निवडणूक घोषित केली. त्यामुळे या निवडणुकीसाठी ते कितीवेळ देऊ शकतात? हाही प्रश्‍न आहेच. ना. गिरीश महाजन हे देखील पालघर विधानसभा निवडणुकीत व्यस्त होते. हे प्रमुख नेते राज्यात इतरत्र व्यस्त असल्याने स्थानिक पातळीवर पक्षाची काय स्थिती आहे? त्यांची निवडणुकीची तयारी खरोखरच झाली आहे का? यावेळी तरी महापालिकेत संख्याबळ वाढविणे शक्य होईल का? संपलेल्या टर्ममध्ये संख्याबळाअभावी महापालिका सभागृहात पक्ष प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे आता भाजपने महापालिकेत संख्याबळ वाढवून ‘शहराचे नेतृत्त्व’ करावे. त्यामुळे विकासाचे प्रश्‍न मार्गी लागून जनता मोठ्या संख्येने भाजपसोबत येईल. याचा थेट फायदा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपला नक्कीच होईल. शेवटी कार्यकर्ते पक्षासाठी किती झटतात यावरही महापालिका निवडणुकीचे यशापयश अवलंबून राहणार आहे. खाविआ जरी सोबत असेल तरी भाजपच्याच सर्वाधिक जागा कशा निवडून येतील यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न होणेही गरजेचे आहे.
 
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा आणि खाविआची युती होणार असल्याच्या संकेतामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना सोबत घेऊन रिंगणात उतरण्याची ना. गिरीश महाजन यांची रणनीती अनेकांच्या पचनी पडलेली नाही. त्यावर पक्षातूनच जोरदार टीका होत आहे. ‘शहरविकास की, राजकारण’ अशा कात्रीत हा निर्णय सापडला आहे. 
@@AUTHORINFO_V1@@