वनमहोत्सवानिमित्त १ लक्ष वृक्षलागवडीच्या मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |





नवी मुंबई: स्वच्छ व सुंदर नवी मुंबईप्रमाणेच हरित नवी मुंबईचे स्वप्न साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या सहयोगाने व्यवस्थित नियोजन करीत असून या पावसाळ्यात १ लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्यात येत असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी महानगरपालिका निर्माण करीत असलेल्या स्मृतीवनात नागरिकांनी त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नातेवाईकांचे पुण्यस्मरण अशी वेगवेगळी औचित्य साधून वृक्षारोपण करावे व आपण लावलेल्या वृक्षरोपाच्या संवर्धनाचीही काळजी घेऊन वृक्षाची जपणूक करण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन रविवारी केले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने पावसाळी कालावधीत राज्यभरात लावण्यात येणार्‍या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टांपैकी नवी मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रात १ लाखांहून अधिक वृक्षलागवड करीत असून त्या मोहिमेचा शुभारंभ सेक्टर २६ नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात तसेच पावणे एमआयडीसी परिसरात गामी इंडस्ट्रियल पार्क समोरील मुख्य रस्ता दुभाजकांमध्ये मोठी वृक्षरोपे लावून करण्यात आला.

 

याप्रसंगी महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृहनेते रवींद्र इथापे, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शासनाने वनमहोत्सवानिमित्त दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त १ लाख १८ हजार झाडे महानगरपालिकेमार्फत नियोजनबद्ध रितीने लावण्यात येत असल्याची माहिती देत त्यापैकी अमृत योजनेंतर्गत तसेच वनजमिनीवर ४० हजार वृक्षरोपे लावण्यात आली असल्याचे सांगितले. विभाग कार्यालयाच्या हद्दीत लावण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयास २ हजार वृक्षरोपे उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत लोकप्रतिनिधी, सहकारी गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी अशासकीय संस्था, रुग्णालये यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागांवर वृक्ष लागवड करण्याकरिता संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान सहायक यांच्याशी संपर्क साधून वृक्षरोपे उपलब्ध करून घ्यावीत, असे आवाहन केले.

 

वनमहोत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने १ कोटी १८ हजार वृक्षारोपण करण्याचे निश्चित केले असून या नियोजनबद्ध मोहिमेचा शुभारंभ रविवारी संपन्न झाला. ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात प्राईड ऑफ इंडिया म्हणून नावाजल्या जाणार्‍या ताम्हण वृक्षरोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. वृक्षारोपणामध्ये ताम्हण, चाफा याप्रमाणेच कांचन, शंकासूर, आकाश नीम, कदंब, वड, पिंपळ, आंबा, फणस, काजू, आवळा, बदाम अशा विविध वृक्षरोपांचा समावेश असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी दिली. वनमहोत्सवानिमित्त जुलै महिन्यात नागरिकांना वृक्षरोपणासाठी सहजपणे वृक्षरोपे उपलब्ध व्हावीत याकरिता उद्यान विभागामार्फत एक वृक्षरथ तयार करण्यात आला असून याद्वारे नागरिकांना आपल्या परिसरात वृक्षरोपे उपलब्ध होणे सोयीचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@