सांबर सरोवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2018
Total Views |




परिस्थितिकीयदृष्ट्या सांबर सरोवराला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. उत्तर आशियामधून दरवर्षी हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो व इतर पक्षी येथे स्थलांतर करून येतात; परंतु ही संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.१९९० पासून सांबर सरोवराचा परिसर ‘रामसर परिसर’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सांबर सरोवर हे भारतातले सर्वांत मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर. राजस्थान राज्याच्या पूर्वमध्य भागातील नागौर व जयपूर जिल्ह्यात त्याचा विस्तार असून, अजमेर जिल्ह्याची सरहद्द या सरोवराला येऊन भिडली आहे. जयपूरपासून पश्चिमेला ९६ किमी, तर अजमेरपासून ईशान्येकडे ६४ किमी. अंतरावर हे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून ३६६ मीटर उंचीवर असलेल्या, या सरोवराच्या चोहोबाजूंना अरवली पर्वताच्या टेकड्या आहेत. सांबर सरोवराचा आकार लंबवर्तुळाकार असून, परीघ ९६ किमी. आहे. सरोवराची कमाल लांबी ३५ .५ किमी. व रुंदी ३ ते ११ किमी. च्या दरम्यान आहे. ऋतुनुसार या जलसाठ्यांचे क्षेत्रफळ १९० ते २३० चौ. किमी. असते. ‘सांबर मीठ’ म्हणजे खार्‍या जमिनीपासून काढलेले मीठ. हजारो वर्षांपासून हे सरोवर मीठ उत्पादनासाठी प्रसिद्घ असल्याने या सरोवराला ‘सांबर’ असे नाव पडले असावे.

 

स्थानिक आख्यायिकेनुसार, दुर्गादेवीचा अवतार असणार्‍या शाकंभरी देवीने (शिवाची पत्नी) येथील दाट जंगलाचे रुपांतर रुपेरी मैदानात केले. ही घटना हितकारक न होता, धनाच्या लोभाने लोकांमध्ये आपापसात झगडे होतील, या भीतीपोटी स्थानिक रहिवाशांनी या रुपेरी मैदानाचे खार्‍या पाण्याच्या सरोवरात रुपांतर व्हावे, अशी देवीकडे प्रार्थना केली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन, या ठिकाणी सरोवराची निर्मिती केली. त्यामुळे या सरोवरास सांभर असे नाव देण्यात आले. सांभर हे शाकंभरीचे अपभ्रंश रूप असावे, असे मानतात. ही घटना इ. स. सहाव्या शतकात घडली असल्याचे मानले जाते. हिंदू परंपरेनुसार, शाकंभरी ही चौहान-राजपूतांची रक्षणकर्ती देवी असल्याचे मानले जाते. शाकंभरी देवीचे मंदिरही येथे आहे. महाभारतातील उल्लेखानुसार राजा ययाती व देवयानी (राक्षसगुरू शुक्राचार्यांची मुलगी) यांचा विवाह येथे झाल्याचे मानले जाते. सरोवराजवळ देवयानी मंदिर व देवयानी नावाचा तलाव आहे.

 

भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण विभागाने या सरोवराच्या निर्मितीसंबंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यासाठी सरोवराच्या पात्रात तळाशी तीन ठिकाणी छिद्रण करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, सरोवरातील गाळाची जाडी पूर्व भागात १८ .६ मीटर, मध्यभागात २१ .६ मीटर, तर वायव्य भागात २३ मीटर आहे. सरोवरातील गाळात ‘सुभाजा’ व ‘पट्टिताश्म’ खडकांचा अंश आढळतो. लगतच्या अरवली पर्वतातही खडकांची स्तररचना असून, या पर्वतातून वाहत येऊन सरोवराला मिळणार्‍या नद्यांमुळे विशेषतः पुराच्या वेळी या खडक पदार्थांचे संचयन या सरोवरात होते.

 

सांबर सरोवर परिसरात वार्षिक सरासरी तापमान उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअस, तर हिवाळ्यात ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. सांबर सरोवर सामान्यपणे उन्हाळ्यात कोरडे पडलेले असते. अपवादात्मकरित्या भरपूर पावसाने जेव्हा सरोवर भरते, तेव्हा त्यात वर्षभर पाणी असते. मेंढा, रूपनगड, खांदेल व खारीअन या अल्पकालिक चार नद्या आणि काही प्रवाहांपासून सरोवराला पाणीपुरवठा होतो. त्यांपैकी पहिले दोन प्रवाह प्रमुख आहेत. त्यांतील मेंढा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर रूपनगड प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो. सरोवराच्या परिसरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ५०० मिमी आहे. सरोवराभोवतालची जमीन वालुकाश्म व निर्जंतुक आहे. सरोवराचे उन्हाळ्यातील दृश्य विलक्षण प्रेक्षणीय असते. मिठाच्या कणांमुळे हे सरोवर बर्फाच्छादित पृष्ठभागाप्रमाणे चकाकणारे दिसते. अनेकदा त्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी व त्यांदरम्यानच्या अरुंद वाटा दिसतात. नद्यांनी वाहून आणलेल्या पाण्यापासून बाष्पीभवन प्रक्रियेने येथे मिठाची निर्मिती केली जाते.

 

वालुकाश्मात बांधलेल्या ५ .१ किमी. लांबीच्या धरणामुळे सांबर सरोवराचे दोन भाग करण्यात आलेले आहेत. खारे पाणी विशिष्ट सांद्रित स्थितीत पोहोचल्यानंतर धरणाचे दरवाजे वर उचलले जाऊन, धरणाच्या पश्चिम भागातील पाणी पूर्वभागात सोडले जाते. धरणाच्या पूर्व भागात मीठ बाष्पीकरण डबकी असून, त्यातच मिठाचे उत्पादन घेतले जाते. या पूर्वेकडील भागाचे क्षेत्रफळ ८० चौ. किमी. आहे. पूर्व भागातच मीठ साठवण, पाण्याचे नाले, मिठाचे वाफे, मिठागरे व मीठ प्रक्रिया केंद्र आहे. येथील मिठात पोटॅशिअमचे प्रमाण कमी असते. इ. स. १५०० च्या पूर्वीपासून या सरोवरातून मीठ उत्पादन घेण्याचे काम सातत्याने चालू आहे. मीठ उत्पादनाचे अधिकार हे स्थानिक लोकांकडून राजपूत, मोगल, ब्रिटिश व शेवटी ’सांबर सॉल्ट लि. कंपनी‘ असे हस्तांतरित होत गेले. अलिकडे मीठ उत्पादनाची परंपरागत पद्घत बहुतांश बंद झाली असून, कमीतकमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून केला जातो. परंपरागत पद्घत मोसमी पावसावर अवलंबून असे. आता भूजलाचाही वापर केला जातो. मीठ उत्पादनात राजस्थानचा देशात तिसरा क्रमांक लागतो. प्रतिवर्षी या सरोवरातून सुमारे दोन ते अडीच लक्ष टन स्वच्छ मिठाचे उत्पादन होत असून, देशाच्या एकूण मीठ उत्पादनाच्या सु. ८ .७ टक्के इतके हे प्रमाण आहे. सरोवराजवळून लोहमार्ग गेलेला असून, सांबर, गूधा व कुंचावन रोड किंवा नाव ही सरोवराजवळील लोहमार्ग स्थानके आहेत. येथे मिठाची साठवण करून रेल्वे डब्यातून ते बाहेर पाठविले जाते. सरोवराभोवती २८ गावे आहेत.

 

परिस्थितिकीयदृष्ट्या सांबर सरोवराला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. उत्तर आशियामधून दरवर्षी हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो व इतर पक्षी येथे स्थलांतर करून येतात; परंतु ही संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सरोवरात वाढणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण शैवाल व सूक्ष्म जंतूंमुळे यातील पाण्याला विशिष्ट रंग प्राप्त होतो. त्यामुळे स्थलांतर करून येणार्‍या पाणकोंबड्यांचे सातत्य कायम राहिले आहे. १९९० पासून सांभर सरोवराचा परिसर ‘रामसर परिसर’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@