नालेसफाईच्या दाव्यांना नाल्यांतच जलसमाधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |

 

 
मुंबई : मुंबईतील हिंदमाता, धारावी, परळ या भागात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे व नालेसफाई नीटपणे न झाल्याने गुडघाभर पाणी साचले होते. मात्र पालिका उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी या तिन्ही भागात शंभर मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने व हे भाग बशीसारखे जास्त सखल भाग असल्याने या भागात पावसाचे पाणी साचले होते, असे कारण देत पालिकेच्या जबाबदारीपासून हात झटकले. उलट पालिकेने १२० ठिकाणी चांगले काम केल्याने अंधेरी, कुर्ला रोड, सांताक्रुझ, जय भारत कॉलनी, लोखंडवाला सर्कल, आनंद नगर, फितवाला रोड, वाकोला पोलीस ठाणे आदी परिसरांत पाणी साचल्याची कोणतीही तक्रार नाही, असा दावा डॉ. क्षीरसागर यांनी करत, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. 'यावेळी कोणताही सबवे पाण्यामुळे तुंबलेला नाही. नद्यांच्या पातळीत वाढ झालेली नाही व कोणतीही अप्रिय घटना मॅनहोल उघडल्याने घडल्याचे वृत्त नाही,' असे त्यांनी सांगितले. २९८ पैकी ६४ ठिकाणी पाणी निचरा करणारे पंप कार्यान्वित करण्यात आले होते, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे पावसाळी परिस्थितीवर पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. सध्या पालिकेच्या घनकचरा, मलनि:सारण, पर्जन्यजलवाहिनी खात्याचे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
 

तसेच पालिकेच्या सर्व यंत्रणा २४, तास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हिंदमाता येथे पाणी जास्त साचल्याने मदतीसाठी एनडीआरएफ पथकाला बोलावण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार बरसात केली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत शहर भागात ७५.६६ मिमी, पूर्व उपनगर भागात २७.०५ मिमी तर पश्चिम उपनगरे भागात ३१.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

पावसाची नोंद

शहर भागात सर्वात जास्त पाऊस पडला. चंदनवाडी - १००.४८ मिमी, भायखळा - ८८.८९ मिमी, कुलाबा - ५७.६६ मिमी, धारावी - १०६.४४ मिमी, ग्रँट रोड - ४१.३६ मिमी, वडाळा - ७०.३५ मिमी, सीएसएमटी - ८५.०० मिमी, मांडवी - ८४.९० मिमी, नायर - ४७.१७ मिमी, वरळी - ६०.९४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगर भागात, गव्हाणपाडा - २ .०० मिमी, कुर्ला - ३६.८१ मिमी, मुंलुंड - १०.४१ मिमी, भांडुप - ३३.३७ मिमी, चेंबूर - ५२.५३ मिमी, घाटकोपर - २७.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरे भागात अंधेरी - ६०.७० मिमी, बीकेसी - ३३.०० मिमी, चिंचोली - १८.५५ मिमी, दहिसर - २९.१७ मिमी, कूपर - ५१.७० मिमी, गोरेगाव - १६.२१ मिमी, सांताक्रुझ - ४०.९० मिमी, कांदिवली - ७.६० मिमी, मालाड - ९.३८ मिमी, मरोळ - ३४.७८ मिमी, मालवणी - ३६.८९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

झाड पडून मुलीचा मृत्यू

दहिसर पूर्व येथील एस एन दुबे रोड वर झाड पडून एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दृष्टी मुकेश मुंग्रा असे या मुलीचे नाव आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास एस एन दुबे रोड वर झाड कोसळून दृष्टी जखमी झाले. तिला दहिसर येथील रोहित नर्सिंग होम दाखल करण्यात आले असता डॉक्टर उदय यादव यांनी तिला मृत घोषित केले.

@@AUTHORINFO_V1@@