'तुंबवून' दाखवले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |

 

मुंबई : मुंबईत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट करत पाऊस जोरदार बरसला. या मुसळधार पावसामुळे किंग्ज सर्कल, दादर टीटी, माटुंगा, सायन, घाटकोपर, कुर्ला, धारावी, मुलुंड, भांडुप, दहिसर, गोरेगाव, चेंबूर आदी सखल भागात कमी अधिक प्रमाणात पाणी साचले होते, तर हिंदमाता, परळ टीटी, धारावी याठिकाणी तब्बल शंभर मिमी इतका पाऊस पडल्याने दुपारपर्यंत या भागात गुडघाभर पाणी साचले होते. पावसापूर्वी नालेसाफाई समाधानकारक झाली आणि यंदा पाणी साचणार नाही, असा दावा सत्ताधारी शिवसेनेकडून केला जात होता, मात्र हा दावा फोल ठरवत, पावसाने पाणी 'साचवून दाखवले’.
 

या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर व रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. हिंदमाता, दादर, धारावी, परळ या भागातील नागरिकांना त्यामुळे पावसामुळे साचलेल्या गुडघाभर घाण पाण्यातूनच वाट काढत, आपल्या कामासाठी मार्गक्रमण करावे लागले. या पावसामुळे जनजीवनावावर परिणाम झाला. तसेच पालिकेने पावसामुळे पाणी साचलेल्या ६४ ठिकाणी पाणी निचरा करणारे पंप त्वरित कार्यान्वित करण्यात आले. तसेच हिंदमाता येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने ब्रिटानिया पंपिंग स्टेशन लगेचच कार्यान्वित केल्याने हिंदमाता परिसरातील पाण्याचा दुपारनंतर निचरा होऊन, नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, हिंदमाता येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या पथकाने काही नागरिकांना साचलेल्या पाण्यातून जाण्यासाठी मदत केली.

 

पवई येथे पद्मावती मार्गावर एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली. मात्र या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच पश्चिम उपनगरातील जेव्हीएलआर मार्गावर गांधीनगर येथे रस्तावरील दुभाजकावर एका कंटेनरने धडक दिल्याने या मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

 

शंभर मिमी पाऊस पडल्याने पाणी साचले

 

मुंबईत पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली. हिंदमाता परिसर, धारावी, परळ टीटी जवळजवळ शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबई शहरामध्ये हिंदमाता, परळ टीटी व सायन रोड नं. २४, किंग्जसर्कल या ठिकाणी पाणी एक फुटापेक्षा कमी पाणी तुंबले. इतर कोणत्याही भागात पाणी तुंबलेले नाही, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

 

पाणी तुंबलेच नाही : महापौर

 
आज पाऊस झाल्यानंतर मी मुंबईत फिरलो आहे. मुंबईत कोठेही पाणी तुंबले नाही. हिंदमाता वगळता कोठेही पाणी साचले नाही. थोड्याफार ठिकाणी पाणी साचले असेल, परंतु मुंबर्ई तुंबली नाही, २६ जुलैचा पाऊस २००५ किंवा २९ ऑगस्ट २०१७ सारखी स्थिती नाही. तरीही मुंबई तुंबल्याचे वातावारण तयार केले जात आहे, असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@