आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |



ठाणे : 'मान्सूनच्या काळात ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत विशेषत: महावितरण, रेल्वे या विभागांनी अधिक दक्षता बाळगावी. तसेच येणाऱ्या तक्रारी तात्काळ सोडविण्यास प्राधान्य द्यावे,' असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन भवन सभागृहात झालेल्या बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काल सर्व पालिका, नगरपालिका, रेल्वे, महावितरण, लष्कर, विविध विभाग यांनी पावसाळ्याच्या कालावधीत केलेल्या नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पालकमंत्री यांनी सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार पोलीस उपअधीक्षक प्रशांत कदम, हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सादरीकरण केले व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात कामात हयगय करणार्यांवर कारवाईची तरतूद असल्याची माहिती दिली. पावसाळ्यात बऱ्याचदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटर्स आणि नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सुरू ठेवण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले. उघड्या वायर्स, डीपी यामुळे जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी, ठाणे जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे मार्ग पावसात दिवा, कळवा, ठाणे परिसरात पाण्याखाली जातात, सिग्नल यंत्रणा नादुरुस्त होते, असंख्य प्रवाशांना याचा त्रास होतो, हे लक्षात घेऊन, रेल्वे अधिकाऱ्यांनी सतर्क राहून, नाले साफ राहतील व पाणी तुंबणार नाहीत हे पाहण्याच्या सूचनादेखील त्यांनी यावेळी केल्या.

 

स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी

 

जिल्हा प्रशासनाने तसेच पालिकांनीदेखील आपत्ती आल्यास जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांची मदत घ्यावी असे सांगून, पालकमंत्री म्हणाले की, 'अशा वेळी पट्टीच्या पोहणाऱ्यांची तसेच कोळी बांधवांचीदेखील खूप मदत होते. होमगार्ड्स, एनसीसी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचे संपर्क क्रमांक प्रत्येक संस्थेने बाळगावेत, जेणेकरून त्यांना बोलवता येऊ शकेल. यावेळी पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागालादेखील धरण क्षेत्रात पाणी वाढत असल्यास तात्काळ इशारा देऊन, परिसरातील लोकांना संबध करावे तसेच कृषी विभागाने देखील अतिवृष्टीत शेतकर्यांचे नुकसान होत असल्याने तहसीलदारांच्या समन्वयाने पिकांचे पंचनामे हाती घ्यावेत असे सांगितले.

 

पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासणार

 
जिल्हा परिषद यंत्रणा पूर्णत: सज्ज असून, ग्रामसेवक व पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहे. पाण्यापासून होणारी रोगराई टाळण्यासाठी सातत्याने पाण्याच्या स्रोतांचे नमुने घेऊन, तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@