स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
 
आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही स्पर्धा परीक्षांद्वाराच मिळू शकते. त्यामुळेच सध्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसचे पेव फुटले आहे. हजारो... प्रसंगी लाखो रुपये खर्च करुन विद्यार्थी या वर्गांना प्रवेश घेतात. तीन-चार वर्ष परिश्रम घेतात (किमान असा त्यांच्या घरच्यांचा, समाजाचा समज तरी असतो) आणि निकालांती भ्रमाचा भोपळा फुटल्यावर अनेकजण वैफल्यग्रस्त होतात. कारण शासकीय नोकरीतील सुरक्षित आणि ‘राजा नोकरी’ मिळवण्याच्या नादात स्वतःची क्षमता, आवड यांचा विचार करण्यासाठीसुद्धा या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसच्या अवास्तव जाहिराती त्यांना वेळ देत नसाव्यात हे आजकाल मुखपृष्ठांवरील भल्या मोठ्या जाहिराती बघीतल्यावर तरी वाटते. असो...
 
पण स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना प्रत्येक युवकाने किमान स्वत:चीच चाचपणी करुन घेणे आवश्यक आहे. नुसत्या भल्यामोठ्या जाहिरातीना भाळून, लाखो रुपये खर्चून सर्वांनाच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येत नाही हे कटुसत्य आहे. पदवीनंतर केवळ स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करणारे अनेक युवक आजूबाजूच्या जगातील बदलांपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या नकारात्मक निकालानंतर अन्य उद्योग किंवा नोकरीत त्यांचे मन सहसा रमत नाही किंवा त्यांना ते काम जमतही नाही.
 
स्पर्धा परीक्षांमधील अपयश आणि आजूबाजूच्या जगापासून दुरावलेले हे युवक अनेकवेळा तणावग्रस्त दिसून येतात आणि त्यातूनच काही युवक आत्महत्त्या करतात असे समोर आले आहे. यात त्यांचाही दोष असतोच असे नाही. एकूणच ‘क्लास’ संस्कृतीचा हाच परिपाक असणे स्वाभाविक आहे. मुळात शालेय जीवनात असतांनापासून सामाजिकशास्त्राचा पाया पक्का असल्यास अशा व्यावसायिक क्लासेसवाल्यांचे फावणार नाही. याचे भान येण्याची खरी आवश्यकता आहे. पण प्रत्येक्षात स्पर्धा परीक्षांचा बाऊ किंवा भीती इतकी निर्माण केली जाते की, हेच विद्यार्थी क्लासेसमध्ये मेंढरांसारखे कोंबले जातात. अशा मार्गदर्शन केंद्रातून प्रचंड अर्थार्जन होत असल्यानेच हजारोंच्या संख्येत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु झाली आहेत.
 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांचा प्रपोगंडा अनेक युवकांना प्रवेशासाठी उद्युक्त करीत असतो. त्यामुळेच क्लास लावला की हमखास यश मिळणार अशा भ्रमात अनेक पालक मुलांच्या इच्छा... प्रसंगी कर्ज करुन पूर्ण करतांना दिसतात. ज्या पालकांना वाटते की त्यांच्या पाल्याने अधिकारी व्हावे त्यांनी त्याच्या अभ्यासाकडे ५ व्या इयत्तेपासूनच लक्ष दिले पाहिजे. विशेषतः सामाजिक शास्त्रांच्या पायाभरणीसाठी.! आणि पदवीनंतर सरळ मार्गदर्शन केंद्राला प्रवेश घेण्यापूर्वी योग्य समुपदेशन करुन त्यांच्या आवडीनिवडी व मर्यादांचे आकलन करु दिले पाहिजे.
 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसला प्रवेश घेतला तरच यश मिळते हा समज अनेक अधिकार्‍यांनी फोल ठरविला आहे. ध्येयप्रेरित कठोर परिश्रमानेच यश साध्य करता येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे निव्वळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मृगजळाच्या मोहात न पडता आपली आवड, क्षमता व आर्थिकस्थितीचे भान यानुसार योग्य नियोजनासह कठोर परिश्रमाची जोड हेच यशाचे सूत्र असावे. अन्यथा मार्गदर्शन केंद्रांच्या जाहिरातींच्या मायाजाळात फसून वैफल्यग्रस्त होण्यापासून अशा युवकांना कोणीही वाचवू शकणार नाही....!
 
 
 
 
स्वप्निल चौधरी
९९२२८९८६००
@@AUTHORINFO_V1@@