माओला 'जाओ’ म्हणावेच लागेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2018   
Total Views |


 

शनिवार वाड्यात ‘एल्गार’ परिषद झाली. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक एकत्र आले. दोनशे वर्षे भीमा-कोरेगावच्या विजय स्तंभावरून कधीही हिंसा झाली नाही. मात्र १ जानेवारी २०१८ रोजी दंगल उसळली. का? कशी? या दंगलीमध्ये माओवाद्यांनी सहभाग घेत, जातीय तेढीचा रंग दिला आहे का? माओवादाचे वस्तीपातळीवरचे नवरूप त्यासाठी कसे आहे याबाबत घेतलेला वेध

काही दिवंसापूर्वी सुधीर ढवळे, सुधींद्र गडलिंग, शोमा सेन, रॉनी विल्सन यांना माओवाद्यांशी संपर्क आहे, या कारणास्तव अटक झाली, पण त्यानंतर असे काही चित्र निर्माण केले गेले, की जणू त्यांना अटक म्हणजे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक. त्यांना अटक म्हणजे आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या समाजावर अन्याय. देवनारमध्ये तर पोलीस चौकीभोवती सुधीर ढवळेंना अटक म्हणजे समाजावर घाला म्हणत, समाजातील काही लोकांनी घेरावही घातला. आज वस्त्यावस्त्यांमध्ये गेले, तर चित्र स्पष्ट होते, की माओवादाने आंबेडकरी विचारांचा बुरखा पांघरून, आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली आहे. असे नाही की मार्क्सवाद आपल्या देशाला नवीन आहे. सर्वच विचारांचे सार पचवून, आपला समाज आणि देश तावून सुलाखून निघाला आहे. सहिष्णूता, करुणा, स्वातंत्र्य वगैरे मानवी मूल्यांना अग्रक्रम देत, समाज देशनिष्ठच राहिला. धर्म प्रमाण मानत, मानवी नीतितत्त्वे पाळतच राहिला. २०१४ साली तर सत्तापालट झाला आणि चित्रच पालटले. मार्क्सवादाने कितीही हातपाय आपटले, तरी भारतीय जनमनात त्यांना स्थान मिळाले नाही. लाल गट निर्माण करणे लालभाईंना जमले नाही. जगभरात विविध देशांत सत्तास्थानी असलेल्या लालभाईंना भारतात थातुरमातुर कामगिरीवर तगावे लागले. परिस्थिती अशीही आली की मार्क्सवाद आता शेवटचा श्वास घेतो की काय?

पण जीव जाताना शेवटची मोठी घरघर लागावी तसे मार्क्सवादाचे भारतात झाले आहे. येन केन प्रकारेण भारतीय समाजात आपले प्रस्थान बसावे म्हणून त्यांनी आपली पद्धतीच बदलली. भारतीय समाजाला काय आवडते? भारतीय समाजाला अंतर्बाह्य हलवणारा पैलू कोणता? घटक कोणते? याचा सांगोपांग विचार या कम्युनिस्टांनी केला. 'अर्बन पॅ्रास्पेक्टिव्ह अवर वर्किंग अर्बन एरिया’ या त्यांच्या तपशीलात याची पाळेमुळे सापडतात. शहरामध्ये मार्क्स त्याहीपेक्षा माओवाद कसा जनमान्य होईल, याची ती एक विस्तारित संकल्पनाच होती. त्यामध्ये 'ए-१’ ते 'ए-७’ कार्यप्रणाली दिली होती. त्यानुसार लोकांना मनोरंजनात्मक पद्धतीने भुलविणे, वंचित समाज घटकांना त्यांच्या दुःखाचा पाढा वाचून जाळ्यात ओढणे, स्त्रिया, दलित, अल्पसंख्यांक आणि आदिवासी यांना आपल्या समर्थनार्थ उभे करणे. शहरातील बुद्धिवादी लोकांचा, समाजमान्य लोकांचा पाठिंबा मिळवणे इत्यादी... जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जी. एन. साईबाबा यांच्याकडे हे दस्तावेज सापडले होते.

प्रश्न पडतो की माओवादी त्यांच्या प्रयत्नांत यशस्वी झाले आहेत का? खुल्या मनाने आणि डोळ्यांनी पाहिले, तर दुर्दैवाने याचे उत्तर काही प्रमाणात होय असेच द्यावे लागेल. आधीच सांगितल्याप्रमाणे मार्क्सविचारसरणी समाजामध्ये पूर्वी कधीच रुजली नव्हती, कारण आपल्या देशात समाजात जातीप्रथा असली, तरी वर्गकलह नव्हता. जातीप्रथेमुळे विषमता होती, पण एकमेकांबद्दल टोकाचा विद्वेष नव्हता. आलुतेदार बलुतेदार पद्धतीत प्रत्येकाचे व्यवसाय स्तर वेगळे होते, त्यानुसार जीवनमानही वेगळे होते, पण असे आहे म्हणून कोणी कोणाच्या जीवावर उठले नव्हते. जगभरात जेव्हा मार्क्सवाद ऐन भरात होता, त्यावेळी त्याचा पाया कामगार आणि भांडवलदार हाच होता. त्यामुळे निर्धनांनी सधनांना संपवावे आणि स्तर मिळवावा. हे संपवणे मिळवणे रक्तरंजित क्रांतीशिवाय शक्यच नाही, असा एकंदरीत ठाम विश्वास. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये कामगार आणि भांडवलदार हा वाद कधीच कोणाचा जीव घेण्याइतका पेटला नाही. वर्गवादामुळे समाजात कधीही भेद झाला नाही. समाज कधीही तुटला नाही. उलट वेगवेगळे आर्थिक स्तर जगत असतानाही समाज एकसंध राहिला. जगात इतरत्र सत्तास्थानी असलेला मार्क्सवाद भारतात मात्र कधीही सत्तास्थानाचा दावेदार झाला नाही. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादाचे मुख्य सूत्र आहे असलेली सत्ता उलथवून, आपली सत्ता प्रस्थापित करणे. तीदेखील रक्तरंजित संघर्षाने. इतर देशांत लोकांचा पाठिंबा असल्याने मार्क्सवाद्यांना रक्तरंजित संघर्ष करत सत्ता मिळविणे सोपे झाले, पण भारतात लोकाश्रयच नाही, तर राजाश्रय कुठून मिळणार? लोकांचा आश्रय मिळवायचा कसा? तर इथे त्यांनी वेगळी खेळी खेळली. भारतीय समाजात कित्येक वर्षे धुमसत असणारा प्रश्न म्हणजे जातीय विषमता. या जातीय विषमतेचा आधार घेत, इथे कम्युनिस्टांची खेळी सुरू झाली.

वंचित समाजघटकामंध्ये मोडणाऱ्या प्रत्येक घटकांना पुतना मावशीचे प्रेम दाखवत, कम्युनिस्टांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. कुठेही अत्याचार अन्याय झाले, की त्याला जातीयतेचा रंग देत, एका समाजाने दुसऱ्या समाजावर कसा अन्याय केला यावर भर देऊन, समाजमन दूषित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने जातीय भेदाने प्रेरित होऊन, एखादी घटना घडली, तर लगेच हे खोट्या मायेचा पुळका येऊन तिथे स्वयंघोषित तारणहार म्हणून हजर. समोरच्याने कितीही म्हटले, की हे आमचे वैयक्तिक भांडण आहे, तरी हे त्याला धर्मजातीचे रंग देणारच. यात हिशोब एकच, की जातीचे नाव घेतले की भारतीय समाजामध्ये जातीय अस्मितेचे वादळ उठते. ठराविक जातीचे लोक एकवटतात आणि समाजासमाजामध्ये कधीही भरून न निघणारी दरी निर्माण होते.

बरं हे सगळं करताना त्यांच्या पद्धती वेगळ्याच. स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडणे नाही, तर संगीतप्रेमी असलेल्या आपल्या समाजाला गीत, पोवाडे, जलशांतूनच ते सांगितले जाते. आजपर्यंत समाज शिवाजी महराजांचे पोवाडे गायचा. बाबासाहेब आंबेडकरांचे जलसे करायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी, बुद्धपौर्णिमा आणि अशाच प्रकारच्या सणउत्सवांमध्ये कम्युनिस्टांनीही पोवाडे, जलसे, कव्वाली कार्यक्रम करण्याचा सपाटा सुरू केला. यामध्येही कम्युनिस्ट विचारधारेला कसे भुलतील असा पद्धतशीरपणे प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल, तर सुरुवातीला प्रस्थापित महापुरुषांना वंदन केले जाते.

तथागतांच्या लढ्याची गाथा,

तिथं झुकू दे तुझा माथा

छत्रपतींच्या लढ्याची गाथा

तिथं झुकू दे तुझा माथा

शाहु फुल्यांच्या लढ्याची गाथा

तिथं झुकू दे तुझा माथा

म्हणत ही गाडी कलबुर्गी, पानसरे आणि रोहित वेमुल्लाच्या संघर्षावर आणि त्यांच्यापुढे माथा झुकविण्यावर येते. गोड आवाजात सुमधुर स्वरात आणि मुख्य म्हणजे लोकगीताच्या आवेशात म्हटले गेलेले हे गीत लोकांच्या ओठावरही उमटू लागते. खरे तर समोर बसलेल्या पाच वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या आजोबापर्यंत कित्येकांना कलबुर्गी पानसरे किंवा रोहित माहीतही नसतात, पण त्यांचा माथा झुकवला जातो. अर्थात यात वरवर काही गैर नाही. पण लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करत त्यांच्या मनावर छानपणे आपली श्रद्धास्थाने उमटविली जातात.

तसेच कुठेही काहीही अन्याय अत्याचार झाला, की हेच लोक आपणच 'वंचिताचे कैवारी’ असल्याच्या आवेशात मुखवटे पांघरून पुढे येतात. तिथेही मग असेच कार्यक्रम होतात. अन्याय झालेली घटना समजा वैयक्तिक असेल, तरीही तिला जातीयतेचा रंग दिला जातो. दलित सवर्ण भेद केले जातात. हाताच्या मुठी आवळत समूहगान केलं जात-

दलिता रं हल्ला बोल तू

दलिता रं हल्ला बोल तू

ही लोकशाही तुझी नाही रं

हे शासन तुझं नाही रं..

दलिता रं हल्ला बोल तू

म्हणजे समोर बसलेल्या तरुणवर्गाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारची लोकशाही, त्यानुसार असलेली शासनव्यवस्था कशी कुचकामी आहे हे नकळत ठसवले जाते. इतकेच काय! काही कार्यक्रमांमधून तर असेही ठसवले जाते, की आंबेडकरांना माननारे सगळेच आंबेडकरवादी नसतात. विशिष्ट धर्माचे लोकच आंबेडकरांना मनापासून मानतात. जर दुसर्या समाजाचे लोक आंबेडकरांना मानत असतील, तर ते मनापासून नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी आंबेडकरांना मानतात असे सांगितले जाते. मग गीत गायले जाते-

जीभ उचलून अशी टाळ्याला लावू नका

जय भीम बोलण्याआधी आपलं रगत तपासा..

आणि वर हेही सुचवले जाते की आंबेडकरांचे नाव घेऊन, आपल्या समाजाजवळ कुणी येत असेल, तर त्याचे वैरीपण ओळखा आणि त्याची जीभ डागा. जर हे करता येत नसेल, तर मरा किंवा मारा..

कदाचित वाचताना यातला गर्भितार्थ तितक्या भयंकरतेने येत नसेल, पण ही गीते ऐकत असलेली तरुणाई या गीतांनी आणि त्यातल्या अर्थांनी बेभान होते. अर्थात बाबासाहेबांनी ज्या समाजाला घडवले, त्या समाजातले सर्वच जण यांच्या भक्षी पडत नाहीत, पण तरीही धोका मोठा आहे. सातत्याने होणारे मोर्चे, बंद हे लोकशाहीत कायेदशीर असले, तरी या बंदांचे करते करविते कोण आहेत किंवा होते हे पाहिल्यावर हा धोका जाणवतो. बेकारी, दारिद्र्य, अंधश्रद्धा, सुरक्षा असे किती तरी प्रश्न समाजासमोर आहेत, पण या सर्व प्रश्नांना टाळून, आज आंबेडकरी चळवळीला जातीय रंग देण्याचे काम हे कम्युनिस्ट करत आहेत. जातीभेदाची तेढ देऊन, दोन समाजात फूट पाडून, देशाला या ना त्या कारणाने अस्थिर करण्याचे कम्युनिस्टांचे प्रयत्न आहेत.

याचा पुरावा म्हणून भीमा-कोरेगाव दंगलींकडे पाहता येईल. या दंगलींमध्ये माओवाद्यांचा सहभाग होता. का? कशासाठी? याचे उत्तर सोपे आहे. जे वर्गव्यवस्थेच्या लढ्याने जमले नाही, ते जातीव्यवस्थेच्या भेदाने त्यांना साधायचे आहे. १ जानेवारी भीमा-कोरेगाव दंगली अगोदर जी 'एल्गार’ परिषद झाली, त्या परिषदेमध्येही असेच काहीसे घडले होते. त्यानंतर परिषदेच्या आयोजंकावर गुन्हाही दाखल झाला. त्यानुसार माओवाद्यांशी संपर्क आहे म्हणून काहींना अटकही केली आहे. ही अटक आंबेडकरी जनतेने आपल्या अस्मितेचा प्रश्न बनवावा यासाठी काही देशविघातक शक्ती जंगजंग पछाडत आहेत. कारण, जातीय अस्मितेचा सुरुंग या देशाच्या सांस्कृतिक एकतेला उत्तर होऊ शकते, असे त्यांना वाटते. 'भारत तेरे टुकडे होंगे हजार’ची मनिषा बाळगणाऱ्यांना जेव्हा देशात फूट पडेल, तेव्हाच सत्ता काबीज करण्याचे दिवस येतील, अशी आस आहे. अर्थात हे त्यांचे दिवास्वप्न आहे, पण तरीही रात्र वैराची आहे आणि शत्रू आपल्यातच मिसळायच्या प्रयत्नात आहे. माओवादाच्या रक्तरंजित सोबतीला आताच ओळखायला हवे. समाजाचे प्रश्न आता समाज जात किंवा प्रादेशिक पातळीवर उरलेच नाही आहेत.

जागतिकीकरणाच्या विळख्यात आणि प्रसारमाध्यमाच्या जाळ्यात कोणत्याही एका समाजाचे प्रश्न हे त्या ठराविक समाजाचे प्रश्न राहिले नाहीत. तर ते वैश्विक प्रश्न आहेत. प्रगती करणे, आर्थिक सामाजिक संपन्नता मिळवणे हे सर्वांनाच अभिप्रेत आहे. यामध्ये दलित-सवर्ण भेद आहे कुठे? महिलासुरक्षिततेचा प्रश्न हा एका समाजापुरता आहे का? उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर तो हल्ला एका समाजापुरता असणार आहे का? नाही! भारत हा एक देश आहे आणि त्याचे नागरिक म्हणून सगळ्यांचे प्रश्न एकच आहेत. त्यांची उत्तरे सगळ्यांनी एकात्मतेने दिली, तरच भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा असेच लालभाई येतील आणि समाजात दूही माजवून, रक्ताचा लाल पाट वाहवतील. हे असे होण्याआधीच आपण सावध होऊ. आपले कोण आणि परके कोण याचा बोध घ्यायला हवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने माओवाद पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कर्तृत्व स्वतंत्र आहेत. मार्क्सच्या आणि माओच्या लक्तरं झालेल्या विचारांची झालर का लावायची? समाजाच्या प्रगतीसाठी माओला ‘जाओ’ म्हणावेच लागेल.

आंबेंडकरवादी हा कधीही माओवादी असू शकत नाही.

आपल्याला इथे आंबेडकरवादी आणि माओवादी यांमध्ये फरक करावा लागेल. काही देशविघातक शक्ती आंबेडकरावाद्यांचा मुखवटा पांघरून, आंबेडकर चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुधीर ढवळे किंवा ’कबीर कला मंच’च्या काही लोकांना मागच्या सरकारने माओवादी चळवळीशी संबंध असल्यामुळे सजा दिली होती. त्यामध्ये सुधीर ढवळे ४० महिने तुरुंगात होते. ते सुटले, पण त्यांना सोडताना न्यायालयाने शेरा दिला होता की ते माओवाद्यांचे समर्थक आहेत. आपण पाहतो की माओवादी जंगलात शस्त्र घेतात निरपराधांना मारतात, पण ते जितके घातक नाहीत, तितके त्यांना भडकवणारे, समाजासमाजामध्ये दूही माजविणारे भंयकर आहेत. त्यांना तुरुंगात डांबणं महत्त्वाचं आहे. आता पाहा जी. एन. साईबाबा अपंग होता. तो कधी जंगलात गेला असेल का याबाबत शंका आहे, पण त्याला कट रचणे आणि नियोजन करणे याबद्दल न्यायालयाने जन्मठेप सजा दिली ना? आता तुम्हीच सांगा वर्षानुवर्षे लोक भीमा-कोरेगावला मानवंदना द्यायला जायचे, पण याच वर्षी असे का झाले? कारण तिथे काही विचारांचा प्रसार केला गेला. प्रचार केला गेला. साहित्य वाटले गेले. ज्यामध्ये सरकार, सीबीआय, एटीएस विरोधात मत मांडले गेले. सामान्य आंबेडकरवादी व्यक्तीला सरकार, सीबीआय एटीएसची भीती वाटते का? नाही. ही भीती देशविघातक कारवाया करणार्यांनाच वाटणार. तसेच भीमा कोरेगावला जवळ जवळ पाच लाख लोक मानवंदना द्यायला गेले होते. त्यापैकी सरकारने केवळ पाच जणांना पकडले. कारण तिथे गेलेली इतर जनता निष्पाप आणि केवळ मानवंदना देण्यासाठीच गेली होती. मग ही कारवाई विशिष्ट समाजावर केली गेली असे कसे म्हणता येईल. सर्वात आधी जातीय विषमतेच्या लढ्याविरुद्ध आपण सारे वंचित समाजाच्या सोबत आहोत, पण समाजानेही आपले कोण आणि परके कोण ओळखले पाहिजे. हे माओवादी जय भीमपुढे हळूच लाल सलामचा नारा देत आहेत. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेत, पुढे मार्क्सला सलामी देतात. आजपर्यंत माओवाद्यांनी ५० दलितांची हत्या केली आहे. तसेच पुण्याच्या शेलार आणि कांबळे कुटुंबातले युवक माओवादी चळवळीत अडकले गेले आहेत. आंबेडकरी विचारांच्या तरुणांना माओवादाच्या हिंसक जाळ्यात ओढले गेले. या मुलांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? वेळ आली आहे समाजाने माओवादाचा धोका ओळखण्याची.

- तुषार दामुगडे

खूप मोठ्या षड्यंत्राचा एक छोटासा भाग

कोरेगाव-भीमाच्या एकूण घटनाक्रमाकडे आपण लक्षपूर्वक पाहिलं, तर त्यात एक विशिष्ट पॅटर्न दिसून येतो. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण हे खूप मोठ्या षड्यंत्राचा एक छोटासा भाग आहे. यात सर्वात आधी स्वतःला आंबेडकरी म्हणवणाऱ्या डाव्या संघटनांनी वर्षभर कोरेगाव-भीमाची लढाई ही पेशवा म्हणजे ब्राह्मण विरुद्ध दलित होती असं रंगवून, दोन समाजात तेढ निर्माण केली. त्याच विखारी उन्मादाची सांगता शनिवार वाड्यावर 'एल्गार’ परिषद आयोजित करून केली. मी याला विखारी उन्माद का म्हणालो हे ज्यांनी तेथील वक्त्यांची भाषणं ऐकली आहेत, त्यांना नक्कीच कळलं असेल. त्यातील वक्त्यांनी आंबेडकरी जमावाच्या पुढे अत्यंत भडकाऊ भाषणं केली. ज्याची परिणती आपण सर्वांनी त्यानंतर महाराष्ट्रभर उसळेल्या दंगलीत पाहिली. या समाजद्रोही प्रकाराला कोणीतरी विरोध करणं गरजेचं होतं. म्हणून एक सजग नागरिक म्हणून पुढे येऊन, मी पोलिसांत तक्रार दाखल केली.

- अक्षय बिक्कड

समाजामध्ये एकी ठेवणे गरजेचे आहे

फॅक्ट फाईंडिंग करून, आपण पत्रकार परिषदेत सांगितले होते, तसेच आपण पिन्सचा जो रिपोर्ट केला होता की भीमा-कोरेगावच्या दंगलीचा कट हा माओवाद्यांचा आहे. आता हे समोर आले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून हे स्पष्ट होत आहे. आज माओवाद्यांचा मुखवटा फाटला आहे. आंबेडकरी जनता आज या माओवाद्यांचा निषेध करत, टीका करत आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे. वढूमध्ये जो प्रकार आहे, तेच दंगलीचे कारण आहे. गावकऱ्यांच्या मते समाधीवर बोर्ड लावण्यामध्ये संभाजी ब्रिगेड आणि बामसेप यांची जी भूमिका आहे त्याचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे. यामध्ये एक महत्त्वाचे आहे, की आंबेडकरी जनतेला माओवादी किंवा नक्षली म्हणणे चुकीचे आहे. तसेच आंबेडकरी जनतेनेही बाबासाहेबांच्या नावाचा वापर करणार्या माओवाद्यांचे पितळ उघडे केले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी देशाच्या आणि समाजाच्या एकतेसाठी आयुष्य वेचले होते. त्यांच्या विचारांनुसार आपण आपली एकी ठेवणे गरजेचे आहे.

- कॅ. स्मिता गायकवाड

@@AUTHORINFO_V1@@