संघाचे काम केवळ संघाचे नव्हे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

 


 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात समारोपप्रसंगी संस्मरणीय असे भाषण केले. या भाषणाचा मराठी अनुवाद खास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
 
 

हा वर्ग पाहण्यासाठी, संघ समजण्यासाठी आपला वेळ खर्च करून आमच्या स्नेहाप्रती येथे उपस्थित असणारे सर्व माननीय पाहुणे, उपस्थित सज्जन, माता-भगिनी. मंचावर उपस्थित मा. सर्वाधिकारीजी, विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगराचे मा. संघचालक आणि आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो. प्रत्येक वर्षी नागपूरमध्ये तृतीय वर्षाचा वर्ग असतो आणि प्रत्येक वर्षी त्याचा प्रकट समारोह संपन्न होत असतो. असे आमचे जे कार्यक्रम होतात, त्यात आमची ही परंपरा राहिली आहे की, देशातील मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतो. ज्यांना येणे शक्य आहे ते आमचे निमंत्रण स्वीकारतात आणि येथे येतात, संघाचे स्वरूप पाहता आणि आपले विचार मांडतात. त्याला पथदर्शक मानून, त्याचे चिंतन करून, आम्ही पुढे जात असतो. त्याच परंपरेस अनुसरून आजचाही कार्यक्रम सहजतेने संपन्न होत आहे. नागपूरवासी हे सर्व जाणतातच परंतु, यावेळी याची विशेष चर्चा झाली. वास्तविक एक स्वाभाविक नित्यक्रमाने होणारा हा कार्यक्रम आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात जी चर्चा होत आहे, त्याला काही अर्थ नाही. कार्यक्रम प्रत्येक वर्षी जसा होत असतो तसाच झाला आहे. डॉ. प्रणव मुखर्जी आणि आमचा परिचय झाला. संपूर्ण देश त्यांना आधीपासून ओळखतोच. अत्यंत समृद्ध, ज्ञानसमृद्ध, अनुभवसमृद्ध असे एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याजवळ आहे आणि अशा सज्जनांकडून मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे, हे आमचे सौभाग्य आहे. आम्ही अगदी सहज त्यांना आमंत्रण दिले. त्यांनी आमच्या हृदयातील प्रेमभाव समजून संमती दिली. आज ते येथे उपस्थित आहेत. ही एक अत्यंत सहज बाब आहे. त्यांना कसे काय बोलावले? आणि ते कार्यक्रमाला का जात आहेत? ही चर्चा निरर्थक आहे. संघ संघ आहे, डॉ. प्रणव मुखर्जी डॉ. प्रणव मुखर्जी आहेत आणि राहणार.

 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने देशात कोणते तरी प्रभावी संघटन उभे करावे, जे देशातील सर्व कार्यावर आपले स्वामित्व चालवेल, या आकांक्षेस अनुसरून संघाचे काम चालू नाही. हिंदू समाजात एक वेगळे प्रभावी संघटन सुरू करण्यासाठी संघ नाही. संघ संपूर्ण समाजाला संघटित करू इच्छित आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी कोणी परके नाही. वास्तविक कोणत्याही भारतीयासाठी दुसरा भारतीय परका नाही. विविधतेत एकता’ ही आपल्या देशाची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे. आपण भारतवासी (भारतीय) आहोत म्हणजे काय आहोत? संयोगाने या देशात जन्म घेतला म्हणून केवळ आपण भारतवासी नाही. ही केवळ नागरिकतेशी संबंधित बाब नाही. भारताच्या भूमीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती भारतपुत्र’ आहे. या मातृभूमीची निस्सीम भक्ती करणे त्याचं काम आहे आणि जसेजसे छोट्यामोठ्या गोष्टींतून त्याला हे समजते, तेव्हा सगळे लोक तोच भक्तिभाव जपत मातृभूमीची सेवा करतात. या भारतभूमीने आपल्याला केवळ पोषण आणि जीवनमान जगण्यासाठी उपजीविकेचे साधन दिलेले नाही. भारतभूमीने आपल्याला आपला स्वभावदेखील दिला आहे.
 
 
 

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या सुजलाम् सुफलाम् भूमीवर परकीय आक्रमणे कमी होऊ शकली असती आणि भारतात भरपूर समृद्धी होती. त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागला नाही. स्वाभाविकच आपण या दृष्टिकोनातच वाढलो की, भारतात समृद्धी भरपूर आहे, आपण त्याचा उपयोग करत आहोत, आपले जीवन समृद्ध करत आहोत. कोणी येत आहे तर ठीक आहे, तुम्हीही या. आमच्याबरोबर राहा. भाषा, पंथ, संप्रदाय यांची विविधता तर पहिल्यापासूनच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत बनतात, राजकीय विचारप्रवाहांत मतभेद पहिल्यापासून आहेतच, परंतु या विविधतेत आपण सगळे भारतमातेचे पुत्र आहोत आणि आपापल्या विविधतेवर, वैशिष्ट्यांवर ठाम राहून, दुसर्‍यांच्या विविधतेचा सन्मान करत आणि त्यांनी त्यांच्या विविधतेवर ठाम राहावे या दृष्टिकोनाचे आपण स्वागत केले आहे. सर्व प्रामाणिक बुद्धिजीवी महापुरुषांनी आतापर्यंत ज्याचा उल्लेख करणे सोडले नाही, अशा अंतर्निहीत एकतेचा साक्षात्कार करत, आपण जगत आहोत. ही आपली संस्कृती बनली आणि त्याच संस्कृतीस अनुसरून या देशाचे जीवनमान बनले. सार्‍या जगातील कलह मिटवून, वैश्विक शांती, सुख-समाधान देणारा प्राकृतिक धर्म निर्माण व्हावा, या हेतूने या राष्ट्राला अनेक महापुरुषांनी उभे केले, आपल्या प्राणांचे बलिदान देऊन सुरक्षित ठेवले, आपला घाम गाळून मोठे केले, त्या सर्व महापुरुषांबद्दल, ते आमचे पूर्वज असल्यामुळे आमच्या हृदयात गौरवाचे स्थान ठेवतो. त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा आपापल्या परीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. मतभिन्नता होतच असते. मतांचे प्रतिपादन करताना आणि त्यांचा शास्त्रार्थ करताना वादविवादही करावे लागतात. मात्र, या सगळ्या गोष्टींची एक मर्यादा असते. अंतिमत: आपण सगळेच भारतमातेचे पुत्र आहोत. आपआपली मते काहीही असोत, पण आपण हे स्वीकारून पुढे चालत आहोत की, अंतिमत: आम्ही भारताचे भाग्य बदलू. भारताला समृद्ध बनवू’ या एकाच ध्येयासाठी (गंतव्यासाठी) वेगवेगळे रस्ते पत्करणार्‍या लोकांनी, आपली विविधता तिच्या वैशिष्ट्यांसह घेऊन पुढे चालावयास हवे. त्याने आपले सामाजिक जीवन समृद्ध होते. विविधता असणे, हे सुंदरतेचे व समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचा स्वीकार करत आपण चालत आहोत. या भावनेचे भान राखत, आपण सगळे एक आहोत, याचंही दर्शन वेळोवेळी होणे गरजेचे आहे. कोणत्याही राष्ट्राचे भाग्य बनविणारे समूह नसतात, व्यक्ती नसतात, विचार तत्त्वज्ञान नसते, सरकार नसते. सरकार खूप काही करू शकते, मात्र सगळेच करू शकत नाही. देशातील सामान्य समाज जोपर्यंत गुणसंपन्न बनत नाही, आपल्या अंतःकरणातून भेदांना तिलांजली देत नाही. मनातील सगळे स्वार्थ हटवून, देशासाठी पुरुषार्थ करावयास तयार होत नाही, तोपर्यंत देशाचे भाग्य बदलू शकत नाही.

 
 

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व विचारप्रणालींच्या महापुरुषांच्या मनात ही चिंता होती की, आम्ही तर प्रयत्न करत आहोत, आमच्या प्रयत्नांनी काहीतरी भले होईलही, मात्र कायमस्वरूपी व्याधीमुक्त होणार नाही. जोपर्यंत आपल्या सामान्य समाजाला आपल्या विशिष्ट गुणवत्तेच्या स्तरावर, एकात्मतेच्या भावनेच्या आधारावर उभे केले जात नाही, तोपर्यंत देशाच्या दुर्जनांचा संपूर्ण अंत होणार नाही. आपण सर्वांनी आपलं काम निवडलं आहे. आपण त्यात व्यग्र आहोत, पण समाजउभारणीचं हे काम झालेलं नाही आणि हे काम झाल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही.

 
 

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार या सर्व कार्याचे सक्रिय कार्यकर्ते होते, कारण त्यांना स्वत:च्या जीवनात स्वत:साठी काही करण्याची कोणतीही इच्छाआकांक्षा नव्हती. ते सगळ्या कार्यांत सक्रिय होते. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगवास भोगला. ते काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील होते. अग्रगण्य क्रांतिकारकांसमवेत क्रांतीची योजना त्यांनी बनविली. त्याच्या क्रियान्वयात भाग घेतला. समाजसुधारणेच्या कामी समाजसुधारकांसमवेत ते राहिले. आपल्या धर्मसंरक्षणाच्या कामासाठी संत महात्म्यांसमवेतदेखील राहिले आणि हे सर्व करताना त्यांचे स्वत:चे चिंतनदेखील चालू होते आणि या महापुरुषांच्या अनुभवाचे ज्ञानदेखील त्यांना मिळाले. १९९० मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या जन्मशताब्दी समितीचा सदस्य बनण्यासाठी बंगालच्या अनुशीलन समितीचे सदस्य व सुप्रसिद्ध क्रांतिकारक त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांना विनंती करायला आमचे कार्यकर्ते दिल्लीत जाऊन भेटले, तेव्हा ते म्हणाले, “१९११ मध्ये डॉ. हेडगेवार कोलकात्याला माझ्या घरी आले होते. तेव्हा झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, ”समाजाला उभे केल्याशिवाय कोणतेही चांगले काम संपन्न होणे शक्य वाटत नाही आणि असे दिसते की ते काम मलाच करावे लागेल.” हा विचार डॉ. हेडगेवार यांनी त्यावेळी केला. सगळे लोक मोठमोठ्या कामांत व्यग्र आहेत. चांगले लोक आहेत. वरिष्ठ लोक आहेत. अत्यंत समृद्ध विचारसरणीचे लोक आहेत. मोठी माणसं आहेत. त्यामुळे त्या कामांची चिंता त्यांच्यावर सोडली तरी चालेल. मात्र हे काम करणारं कोणी नाही. मग हे कार्य कसे करावे, याचा विचार करून, त्यांनी १९११ पासून प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि सर्व प्रयोग केल्यानंतर १९२५ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या छोट्याशा घराच्या पहिल्या मजल्यावर १७ लोकांसमवेत म्हणाले की, हिंदू समाज, जो भारताचा उत्तरदायी समाज आहे, तो केवळ परंपरेने राहत आला आहे, म्हणून नव्हे, आजच्या घडीला तो भारताचा बहुसंख्य समाज आहे म्हणूनही नव्हे तर, भारताच्या भाग्याबाबत प्रश्नदेखील त्यालाच विचारला जाईल! हे त्याचे दायित्व आहे. म्हणून त्या हिंदू समाजास संघटित करण्यासाठी या संघाचे कार्य सुरू झाले आहे.”

 
 

ही जी आपली दृष्टी आहे की, आपण सगळे एक आहोत, ती काहींना चटकन लक्षात येते, काहींना लक्षातच येत नाही तर काहींना लक्षात येऊनही त्यांना असे वाटते की, यांच्यासमवेत राहिलो तर नुकसान होईल. भारतात हे चारच प्रकार आहेत. परकं कोणी नाही, शत्रू कोणी नाही, सर्वांची माता भारतमाताच आहे. जनुकीय विज्ञानानुसार ४०,००० वर्षांपासून सगळ्यांचे पूर्वज समान आहेत. सगळ्यांच्या जीवनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव सर्वत्र स्पष्टपणे दिसून येतो. या सत्याचा आपण स्वीकार केला, ते समजून घेतले. आपले संकुचित भेद सोडून, या देशाच्या विविधतेचा सन्मान करत या देशाच्या इतिहासाचा मान राखत, आपले काम करत जाऊ. संघाने हाच विचार केला. संघ सर्वांना जोडणारे संघटन आहे. संघाला समाजामध्ये’ संघटन उभं करायचं नसून समाजाचं’ संघटन करायचं आहे. भाषणे ऐकून, पुस्तकं वाचून, संघटन होत नसते, कारण संघटनेत विशिष्ट व्यवहार अपेक्षित आहे. सौहार्दता, सर्वांना समजून घेणे, आजच्या भाषेत इंग्रजीत ज्याला डेमोक्रॅटिक माईंड’ म्हणतात, ते आवश्यक आहे. त्याशिवाय संघटन होणे संभव नाही आणि व्यवहार हा स्वभावाशी संबंधित आहे आणि स्वभाव हा आचरणानेच बनतो. आचरण बनविल्याशिवाय स्वभाव बनत नाही आणि पूर्ण समाजाचा स्वभाव बदलवायचा असेल, तर लक्षात घ्यायला हवे की, संपूर्ण समाजाचा विचार करून प्रत्येक व्यक्ती आचरण करीत नाही आणि अध्ययन करूनदेखील आचरण करत नाही. जे वातावरण बनेल, त्या वातावरणास अनुसरून समाज चालतो. वातावरण बनविणारे लोक आहेत. ते लोक हवेत. तात्त्विक चर्चा सामान्य समाज करत नाही. त्यात त्याला रस नसतो. त्यात त्याला गतीदेखील नसते. तत्त्वांची चर्चा करताना विषयासंबंधी अनेक प्रकारची मतभिन्नता विद्वानांत दिसते. हे पहिल्यापासून आहे. प्रत्येक ऋषी वेगवेगळी गोष्ट सांगतो. कधी एकच गोष्ट वेगळ्या भाषेत सांगतात, तर अनुयायी लोक ते वेगळं समजूनच चालतात. कोणाला प्रमाण मानावे? श्रुती, स्मृती सगळ्यांत फरक आहे.

श्रुतिर्विभिन्नाः स्मृतयश्च भिन्ना:

नैकोमुनिर्यस्य वच: प्रमाणम्।

धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम्।

महाजनी येन गत: स पंथ:।

समाजाला विस्कळीत न होऊ देता समाजाला जोडणारा हा धर्म आहे, समाजाला उन्नत करून, अभ्युदयाची प्राप्ती करून देणारा धर्म आहे. धर्मस्य तत्वं निहीता: ग्वा:,’ हे धर्माचे तत्त्व गुप्त असते. ते तत्त्व प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. सर्व लोक तपश्चर्या करत नाहीत. काही लोक करतात. बाकी लोक काय करतात? महाजनो यत गमस्य पंथा:‘ समाजातील श्रेष्ठ लोक जसे चालतात, तसेच हेही लोक चालतात.

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।

आपल्या या विशाल भूमीच्या, विशाल लोकसंख्येच्या देशात प्रत्येक गावात, प्रत्येक शहराच्या गल्लीत आपल्या आचरणाने समाजहितैषी वातावरण बनविणार्‍या कार्यकर्त्यांचा समूह आवश्यक आहे. संघाचा हाच प्रयत्न आहे. देशासमोर जे विभिन्न प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या सोडविण्याच्या पद्धतींबाबत मत काहीही असो, विचार काहीही असो, जाती-पाती, पंथ, प्रांत भाषा कोणतीही असो, संपूर्ण समाजाला, संपूर्ण राष्ट्राला आपले मानून, व्यापक दृष्टीने त्याच्या हितासाठी माझे व्यक्तिगत, पारिवारिक, सामाजिक आणि आजीविक यांत आचरण कसे असावे, याचा विचार करून आपल्या आचरणाचे उदाहरण आपल्या सभोवताली प्रस्तुत करणारा व्यक्तीच ते वातावरण बनवितो. तो कोणी महापुरुष नसून, तो आपल्यातलीच एक व्यक्ती असते. महापुरुषांच्या आदर्शांची समाज पूजा करतो. जयंती, उत्सव, पुण्यतिथी साजरी करतो, मात्र अनुकरण त्याचं करतो, जो त्याच्या आसपास समाजात वावरणारा आहे. त्याच्याचसारखा मात्र थोडा प्रमुख असा. असे उदाहरण आपल्या जीवनातून प्रकट करणारे कार्यकर्ते हवे आहेत. आदर्श आमच्याकडे भरपूर आहेत, त्यांची कमतरता नाही. सुविचारही कमी नाहीत, श्रेष्ठ तत्त्वज्ञान आमच्याकडे आहे परंतु, व्यवहाराच्या बाबतीत आम्ही निकृष्ट होतो. आता असे म्हणू शकतो की, थोडाशी सुधारणा झाली आहे. मात्र अजूनही जितक्या प्रमाणात व्यवहार असावा, तितका नाही आणि तो तेव्हा बनतो, जेव्हा सगळ्या प्रकारच्या परिस्थितींमध्ये चांगला व्यवहार करणारे, समाजातीलच परंतु आपल्या चारित्र्याने, नैतिकतेने संपन्न लोक उभे राहतात. असे लोक देशभरात उभे करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे, कारण सगळ्या समाजाला आज विशिष्ट दृष्टीने चालण्याची आवश्यकता आहे. कोणतेही कार्य शक्तीच्या आधारावर संपन्न होते. कोणतेही कार्य करण्यासाठी शक्ती आवश्यक आहे. हा जीवनाचा नियम आहे. विज्ञानसिद्ध नियम आहे आणि शक्ती संघटनेत असते. सगळ्यांनी मिळून काम करण्यात असते आणि शक्तीला नैतिकतेची जोड नसल्यास ती शक्ती दानवी शक्ती बनते. चांगल्या गोष्टींचा उपयोग वाईट कामांत होतो. विद्या विवादाय, धनम् मदाय, शक्तिः परेषां परिपीडनाय.’ विद्या प्राप्त करणारे सहमती बनवत नाहीत, विवादात वेळ वाया घालवितात. विद्येच्या आधारावर सहमती होणे आवश्यक आहे, मात्र विवाद होतात. श्रीमंत लोक श्रीमंतीच्या नशेत चूर होतात आणि शक्तीचा उपयोग दुसर्‍यांना पीडा देणे आणि दुसर्‍यांचे हिसकावणे यासाठी करतात. हे कोण करतं? दुष्ट लोक करतात. खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय.’ सज्जनांची गती याच्या विपरीत चालते. ते विद्येचा उपयोग ज्ञान वाढविण्यासाठी करतात, धनाचा उपयोग दानासाठी करतात आणि शक्तीचा उपयोग रक्षणासाठी करतात. दुर्बलांचं रक्षण करतात. शक्तीला नैतिकतेची जोड हवी ती नसल्यास, ती निरंकूश होते. धोकादायक ठरते. म्हणून त्या शक्तीची उत्पत्ती करण्यासाठी, त्या नैतिकतेची उत्पत्ती करण्यासाठी समाजाच्या आजच्या स्थितीमध्ये सर्व संकटांचा, समस्यांचा सामना करत, समाजश्रेयाचा मार्गावर चालण्यासाठी, अशा ज्ञानाची आराधना करण्यासाठी, सर्व परिस्थितीत आपल्या तपश्चर्येवर ठाम राहण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या मोह, कष्ट, लालसा यातून जाऊनदेखील आपल्या ध्येयापासून किंचितही विचलित न होणे, उलट अधिकाधिक ध्येयासक्तीची ध्येयनिष्ठा बाळगणे या पाच गुणांची आराधना संघाच्या शाखेत स्वयंसेवक करतात. एक तास हे सगळे आपल्या तनामनात ऊर्जा उत्पन्न करणारे कार्यक्रम करताना शेवटी भारतमातेची प्रार्थना करताना संघाने ईश्वराकडून याच पाच गुणांचे वरदान मागितले आहे.

 
 

१९२५ मध्ये संघ सुरू झाला. हळूहळू वाढत गेला. सगळे आघात सोसून, सगळ्या बाधा पार करत वाढत गेला. हळूहळू संघाने प्रतिकूलतेला स्नेहात परिवर्तित केले. आज संघ लोकप्रिय आहे. जेथे जातो, तेथे समाजाचा स्नेह मिळतो. मात्र आम्ही यात कृतार्थ झालो, असे मानत नाही. आम्हाला प्रसिद्धी मिळविण्यासाठी काम करायचे नव्हते. आणि आजही करत नाही आहोत. आम्हाला पुढे जायचे आहे. अनुकूल वेळदेखील येते, मात्र अनुकूलता विश्राम करावयास प्रवृत्त करते, आम्हाला विश्राम करावयाचा नाही.

 
 

हे आमचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी सातत्याने जी कार्यकर्ता निर्माणाची प्रक्रिया चालते, त्यास अनुसरून ही प्रक्रिया चालविणार्‍या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही दरवर्षी होते. तृतीय वर्षाच्या वर्गांचा समारोपाचा प्रसंग दरवर्षी आम्ही येथे अनुभवतो. आपला खर्च करून प्रशिक्षणार्थी येतात. सगळेच प्रशिक्षणार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत. प्रांताच्या वर्गातही आणि या वर्गातही असे लोक भेटतात. जे हजार रुपये शुल्क गोळा करणे, प्रवास खर्च करणे यासाठी दोनतीन महिने कष्ट करून, पैसा गोळा करून या वर्गाचे शुल्क भरून येथे येतात. यातून त्यांना काही मिळणार नाही. हे कार्य करुन यांना धन्यवाद देखील मिळत नाहीत आणि ही सवयही लावली जाते की, कोणतीही अपेक्षा करू नका! सत्कार्य करा अन् विसरून जा! ना वृत्तपत्रात नाव येणार ना स्वगत होणार. त्यामुळे हा विचार सोडून द्या आणि हिंदुराष्ट्रांचे तारणहार बना, हे संस्कार घेतात. आपल्या मनातील भावनेला बळकट करतात. तृतीय वर्षात येतात तेव्हा जे आजवर पुस्तकांत वाचले होते, बौद्धिकांत ऐकले होते. सभोवताली ऐकत होते, यांची प्रत्यक्ष अनुभूती येथे ते प्राप्त करतात. भारताच्या कानाकोपर्‍यातून लोक आले आहेत. विविध स्वभावाचे, विभिन्न अर्थिक स्थितीतील, विभिन्न भाषा, प्रांत, जाती, उपजातींचे असंख्य अपरिचित लोक पहिल्या दिवशी येतात आणि ज्या दिवशी जाण्याची वेळ येते तेव्हा डोळ्यांत अश्रू असतात. एकमेकांची भाषा एकमेकांना समजली नाही, मात्र आत्मियता अशी झाली की, वाटते दुरावा नसावा. सगळा भारत आपला आहे, ही अनुभूती धारण करतात. जी प्रतिज्ञा मी विद्यालयाच्या प्रार्थनेत करत होतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारताच्या समृद्ध, सांस्कृतिक परंपरेचा गौरव माझ्या मनात आहे. या सर्व गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती ते येथे प्राप्त करतात. यामुळे यानंतर त्यांना अधिक प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. मनात एक नवी ऊर्जा घेऊन डोळे आणि कान उघडे ठेऊन समाजात जाताना आणि समाज पाहताना त्यांचे पुढील प्रशिक्षण होते. हे संघाचे कार्य आहे.

 
आम्ही सगळ्या सज्जन शक्तीला एकत्र आणू इच्छितो. आम्हाला विचार, मत यांपैकी कशाचेही वावडे नाही. वैभवसंपन्न भारत, विश्वगुरू भारत’ हे एकच गंतव्य असावे. याची जगाला आवश्यकता आहे. दुसरे कोणीही आजमितीस जागतिक समस्या सोडविणारे उत्तर देऊ शकणार नाही. भारताला ते उत्तर द्यायचे आहे. केवळ बोलून हे घडणार नाहीे. आपले जीवन तसे प्रस्थापित करूनच हे उत्तर देता येईल. त्याच्या स्वत्वावर आधारित पक्का उभा असा भारत, ज्याच्या मनात आपले स्वत्व उभे करणे स्पष्ट आहे, असा समाज आम्ही उभा करू इच्छितो. असा समाजच विश्‍वाचे, भारताचे आणि तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनातील सगळ्या समस्यांचे पूर्ण उत्तर आहे. आपल्या सगळ्यांना असा समाज उभा करायचा आहे. संघाचे काम केवळ संघाचे काम नाही. हे तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. संघाचे काम पाहण्यासाठी अनेक विचारांचे महापुरुष येऊन गेले आहेत, येत असतात. मी त्याचे विवरण देणार नाही, कारण आपण ते जाणताच आणि संघ शिक्षा वर्गाच्या निमित्ताने असे अनेक लोक येऊन गेले आहेत. त्यांच्याकडून आम्हास पथमार्गदर्शन मिळते. त्यांच्या सूचनांचा विचार करतो. आम्ही जो पथ ठरविला आहे, जो कार्यक्रम ठरविला आहे जे गंतव्य ठरविले आहे, यात त्यांच्या ज्या विचारांची मदत असेल त्याचा विचार करतो, त्याचा स्वीकार करतो. आपापसात सद्भावना राखत समाज एकसाथ पुढे जावा. परस्परम भावयंतम.’ आपण आपल्या आपल्या मार्गाने प्रामाणिकपणे चालावे. तेव्हा प्रामणिक लोकांत मतभेद होत नाहीत. प्रामाणिक लोकांत कोणतीच गोष्ट बाधा आणत नाही. जे योग्य आहे त्यावर सगळेच चालतात. त्यांच्या मतांवरील आपापसातील चर्चा एक सुंदर संवाद बनतो. जसे आपले उपनिषदांतील संवाद आहेत. अनेक प्रकारची मते आहेत. सगळ्यांचे प्रतिपादन आहे. त्यातून एक सहमती समोर येते. वाचण्यासाठी, चिंतनासाठी आणि जीवनात आचरणासाठीदेखील ते आहे. कारण ते सत्य आहे. त्या सत्यपथावर आपण सगळ्यांनी चालावे, असा आमचा संस्कार असावा, अशी आमची सवय असावी, अशी आमची बुद्धी असावी, असा समाज उपदेशांनी नाही तर आपल्या स्वत:च्या जीवनात आचरण करणारे कार्यकर्ते संघ तयार करतो. हे आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांचे काम आहे. यासाठी मी आपणांस आवाहन करतो, या कार्यास प्रत्यक्ष पाहा. जे काही मी आत्तापर्यंत सांगितले, ते प्रत्यक्ष आहे की नाही याची पडताळणी करा, आणि आपणास वाटले की, असे आहे, हे सर्वहिताचे कार्य आहे. यात आपणही सहभागी व्हावे. संघाला पारखून घ्या, आतून पारखून घ्या, येणे-जाणे हे तुमच्या मर्जीवर आहे. सगळे येऊ शकता. सगळे पारखू शकता आणि पारखून आपलं मत बनवू शकता. जसे बनेल तसे बनू द्या. आम्हास त्यांची चिंता नाही. आम्ही काय आहोत आम्ही जाणतो. आम्ही जसे आहोत तसे दिसतो. आम्ही जसे आहोत तेच आम्ही करतो. सगळ्यांप्रती सद्भाव ठेऊन कोणाचाही विरोध मनात न ठेवता, आम्ही आमच्या मार्गावर दृढतेने पुढे जात आहोत. मात्र केवळ आम्ही करून हे होणार नाही तर ते संपूर्ण समाजाचे कार्य आहे. सर्व समाजाने हा मार्ग पारखून घ्यायला हवा आणि ठिक वाटला तर याचे सहयोगी बनावयास हवे. हे आवाहन मी आपणासमोर करतो आणि माझे बोलणे थांबवितो.
 

आणि आदरणीय डॉ. प्रणव मुखर्जी यांना अनुरोध करतो की, त्यांनी आम्हांस मार्गदर्शन करावे आणि ते इंग्रजी भाषेत बोलतील. लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल.

(शब्दांकन: प्रवर देशपांडे)

@@AUTHORINFO_V1@@