'आम्ही बदला घेऊ' नक्षलवाद्यांची मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |
 

 
मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील नक्षलवाद्यांकडून धमकीची २ पत्रे मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली या भागात पोलिसांनी उत्तम कामगिरी करत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला, त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे, तसेच केवळ तेच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना देखील धडा शिकवण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी तपास सुरु असल्याची माहिती गृहखात्याने दिली आहे.
 

मुख्यमंत्र्यांना अलेल्या धमकीच्या पत्राचे प्रमुख कारण :

गडचिरोली जिल्ह्याच्या ऐटापल्लीच्या ताडगाव-कसनूर, बोरिया जंगलात सुरक्षादलाने नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. २२ एप्रिल रोजी सी-६० पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती. बोरिया जंगलात १६ नक्षल्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळाजवळ इंद्रावती नदीमध्ये आणखी ११ मृतदेह सापडले होते. तसेच राजाराम खांदला परिसरातील चकमकीतही ६ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते अन्य एका कारवाईमध्ये १ नक्षलवादी ठार करण्यात आला होता. अशा प्रकारे एकूण ३४ नक्षलवादी ठार करण्यात आले होते. याच चकमकीचा या धमकी पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यामुळेच मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबियांना तसेच गडचिरोली येथे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे.

 
आम्हाला ठार करून तुम्ही आमचा विचार संपवू शकत नाही. मार्क्सच्या विचारांनी आम्ही आमची चळवळ सुरुच ठेवली आहे, असेही या पत्रात लिहीण्यात आले आहे. ही पत्रे कुठून आली, कधी पाठवण्यात आली आणि कुणी पाठवली, याचा तपास गृह विभाग करत आहे. नक्षलवादासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कामगिरी करत काही प्रमुख आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या पत्रातून काही मोठे खुलासे झाले आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणात झालेल्या हिंसाचाराविषयी देखील माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खालिद या सगळ्यांची नावे पुढे आली असून कांग्रेस पक्षावर देखील मोठा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भिती आणि नाराजीचे वातावरण असल्यामुळे अशा धमक्या देण्यात येत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@