जिल्ह्यात एस.टी. संपाला संमिश्र प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |



ठाणे : ”एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग सज्ज झाला असून खाजगी बसेस, शाळेच्या, कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खाजगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संप सुरू असेपर्यंत ही परवानगी राहील. या अनुषंगाने परिवहन विभागाने पोलीस, होमगार्ड तसेच पालिकांच्या परिवहन सेवांचीदेखील मदत घ्यावी,” असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे.

गुरुवारी या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, परिवहन अधिकारी, पोलीस तसेच पालिकांच्या परिवहन सेवांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी संपकाळात सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवावा, असे सांगितले.

वाहतूक अंशत: विस्कळीत

ठाणे जिल्ह्यात आठ बस आगार आहेत. या आठही आगारांतून दररोज १ लाख ८५ हजार प्रवासी ये-जा करतात. ठाणे तसेच भिवंडी, शहापूर येथील कर्मचार्‍यांच्या संपाच्या संमिश्र प्रतिसादामुळे सकाळी ५ ते ६ या कालावधीत वाहतूक विस्कळीत झाली होती, पण नंतर ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी , वाडा येथील वाहतूक बर्‍याच अंशी व्यवस्थित सुरू आहे.

नियंत्रण कक्ष सुरू

आठही आगारांचे नियंत्रण विभागीय कार्यालय, ठाणे येथून होत असून या कार्यालयाचा क्रमांक २५३४२७६१ असा आहे तर विभागीय वाहतूक अधिकारी जगताप यांचा भ्रमणध्वनी ८२७५०२१५१६ असा आहे.

सर्व आगारांच्या ठिकाणी खाजगी बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिवाय अडचण येऊ नये म्हणून पोलीस, एस. टी. महामंडळ अधिकारी, परिवहन अधिकार्‍यांची टीम प्रत्येक डेपोत नियंत्रण करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. यामध्ये वायुवेग पथकांचा समावेशसुद्धा असून प्रवाशांना काही अडचणी आल्यास किंवा कुणी या संपाचा फायदा घेऊन अवास्तव भाडे आकारात असल्यास ते लगेच कार्यवाही करतील.

एस. टी. प्रवाशांना संपामुळे बससेवा खंडित असल्याने तिकिटांचा परतावा देण्याचे कामही सुरू आहे, असे सांगण्यात आले.

वाड्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संपात सहभाग नाही

वाडा ः एस.टी. कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचार्‍यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. मात्र वाडा तालुक्यातील एस.टी. कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. याबाबत वाडा आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एम.आर.धांगडा यांच्याशी संपर्क साधला असता वाडा आगाराच्या कर्मचार्‍यांना ठोस संदेश नसल्याने ते संपात सहभागी झालेले नाहीत. आगाराच्या गाड्या नियोजित वेळेनुसार चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

शहापुरात ‘लाल परी’ आगारातच

शहापूर ः एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या ’काम बंद’ आंदोलनात शहापूरातील ९० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने एसटी सेवा पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून खाजगी वाहतूकही त्यामुळे कोलमडली होती. चाकरमान्यांनाही त्याचा फटका बसला.

शहापूर बस आगारात एकूण ५२ बसेस असून त्यामार्फत एकूण १३३ फेर्‍या चालविण्यात येतात़ मात्र, शुक्रवारी केवळ 29 फेर्‍याच चालविण्यात आल्या. त्यापैकी बहुतांशी फेर्‍या रात्रीच्या निवासी गेलेल्या बसेसमधून करण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण बससेवा ठप्प झाली. शहापूर बस आगारातून अघई, साकडबांव, डोळखांब, कसारा, खर्डी, किन्हवली, मुरबाड,शेई शेरे, वासिंद आदी परिसरातील गावांत १३३ फेर्‍या चालविण्यात येतात. मात्र, शुक्रवारी केवळ 29 फेर्‍या चालविण्यात आल्या तर १०४ फेर्‍या रद्द करण्यात आल्या. बसस्थानकातील एकूण ३०० कर्मचार्‍यांपैकी चालक, वाहक, दुरुस्ती विभागातील सुमारे २७० कर्मचार्‍यांनी शुक्रवारी ’काम बंद’आंदोलन उगारल्याने संपूर्ण बससेवा ठप्प झाली. या आंदोलनाचा शाहपूर आगाराला सुमारे साडेतीन लाखांचा फटका बसल्याचे आगारप्रमुख पी. एन. मोरे यांनी सांगितले.

भिवंडीत तुरळक सेवा सुरू

भिवंडी ः एस.टी. कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवित शुक्रवारी मध्यरात्री अचानक संप पुकारला. भिवंडी मुक्कामास असलेल्या बाहेरच्या बस आगारातील एस.टी. बस लवकरच मार्गस्थ झाल्यानंतर भिवंडी आगारात या संपास संमिश्र प्रतिसाद मिळाला असून सुमारे ८० टक्के बस बंद होत्या, तर भिवंडी आगारातून सकाळच्या सत्रात सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या १३ बसपैकी ९ बस रवाना झाल्याने तुरळक प्रवासी वाहतूक सुरू होती.

बस कर्मचारी महासंघांतील १३ संघटनांनी या संपास पाठिंबा दर्शविला असून शिवसेनाप्रणित कामगार संघटना व कास्ट ट्राईब कामगार संघटनांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने भिवंडी आगारात सकाळपासूनच संप तुरळक प्रमाणात सुरू होता. भिवंडी बस आगारात ११ वाजेपर्यंत १३ पैकी ९ बस रवाना झाल्या तर जवळील टप्प्यातील ४२ पैकी १२ बस रस्त्यावर धावल्या. या संपाची कल्पना नागरिकांना नसल्याने सकाळी बसस्थानकात आलेल्या प्रवासांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांच्या हिरमोड होत होता, तर सकाळी कास्ट ट्राईब कामगार संघटनेचे सदस्य असलेले जी.बी. इंगळे यांना संपात सहभागी असलेल्या कर्मचारी पी.एस. आव्हाड यांनी बस सुरू न करण्यासाठी हुज्जत घालीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या विरोधात निजामपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, प्रामुख्याने ग्रामीण भागातील रहिवासी आणि शहरातील कामगारवर्ग हा एस.टी. सेवेवर अवलंबून असतो. त्यात आज शालांत बोर्डाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी व कामगार यांचे एसटी संपामुळे प्रचंड हाल झाले. रिक्षाचालकांनी अधिक भाडे घेऊन गरजू प्रवाशांची लूट केली असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. केडीएमटी आणि टीएमटी या बससेवा सुरू असल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला.

@@AUTHORINFO_V1@@