रहिवाशांच्या रोषाने महापौरांना सुटला घाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |



मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या चेंबूर येथील माहुलगावच्या एव्हरस्माईल संकुलनातील रहिवाशांची समस्याचा पाढा वाचल्यानंतर महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सुरक्षारक्षकाच्या गराड्यात पळ काढला. गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या रहिवाशांनी महापौरांसमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी रहिवासी आक्रमक झाले होते. त्यामुळे महापौरांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही.

चेंबूर येथील माहुलगावमध्ये एव्हरस्माईल संकुलात स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा शुक्रवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, स्थानिक नगरसेवक श्रीकांत शेट्ये, सहाय्यक आयुक्त संभाजी घाग आदी उपस्थित होते.

चेंबूर येथील माहुलगावमध्ये एव्हरस्माईल संकुलात प्रकल्पबाधितांसाठी सदनिका आहेत. माहुलगाव येथील एव्हरस्माईल संकुलात एकूण ७२ इमारती आहेत. त्यांपैकी ४५ इमारतीमध्ये ४ ,६५५ कुटुंब राहत आहेत. तर; दहा इमारती पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी तिथे वास्तव्य करण्यासाठी नकार देण्यात आला. तर १७ इमारती रिकाम्या आहेत. या सदनिकांमध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पातील प्रकल्पबाधितांना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या या इमारतींची दुरावस्था झाली असून, पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे पाण्यासाठी स्थानिकांना भटकंती करावी लागत आहे. तसेच काही सदनिकांच्या लाद्या तुटल्या असून, इमारतीच्या आवारामध्ये कचर्‍याचे ढीग साचले आहेत. तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तसेच काही इमारतीच्या लिफ्ट दुरुस्तीच्या अभावामुळे बंद पडल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा पुढाकार घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापौर आज या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आले असता नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, परंतु यावेळी काही नागरिक आक्रमक झाल्याने महपौरांनी त्याचा दौरा १५ मिनिटांमध्ये आटोपला.

यावेळी बोलताना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर म्हणाले की, ”गेल्यावर्षी या भागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. त्यापेक्षा आता परिस्थिती सुधारली आहे. गेल्या वर्षी येथे मलवाहिनीची गळती होती, चक्की नव्हती, शाळा नव्हती, पाण्याची समस्या होती, परंतु यामध्ये आता सुधारणा झाली आहे. येथे सध्या पहिली ते आठवी शाळा सुरू आहे, चक्की सुरु आहे. दवाखाना सुरू करण्यात आला आहे. बस सुरू केली आहे. हिंदी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत,” तसेच ”या ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये योग्य रीतीने कामे झाली नसून, संबंधित बिल्डरवर गुन्हा नोंदवायला हवा, प्रदूषणाबाबतचा विषय न्यायालयात असून, न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्याचे पालन केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@