बुडत्याला काडीचा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

अखेर तो दिवस उगवलाच. वनवास भोगून त्रासलेल्या एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळाने का होईना पण एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वेतनवाढ जाहीर केली. एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांना ४ हजार ८४९ कोटी रुपयांचा वेतनकरार जाहीर झाल्यानंतर यापूर्वीच कंबरडे मोडलेल्या एसटी महामंडळाला १ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक भार सहन करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यातच इंधन दरवाढीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या एसटी महामंडळाला दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची पाळी आली. त्यातच वेतनकरार निश्चित करण्यापूर्वी यासाठी लागणारा पैसा कुठून आणि कोणत्या पद्धतीने उभारायचा हे ठरवणे महत्त्वाचे होते. मात्र, यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता घाईगडबडीत ही वेतनवाढ जाहीर करण्यात आली.
 

२००० साली झालेल्या २४० कोटी रुपयांच्या वेतनकरारानंतर थेट २०१८ साली ४ हजार ८४९ कोटी रुपयांचा वेतनकरार जाहीर करण्यात आला. मात्र, यासाठी निधी उभारायचा कुठून याची पूर्वतयारी होण्यापूर्वीच वेतनवाढ जाहीर झाली आणि एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले. नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण यावेळीही एसटी महामंडळाने या निमित्ताने दाखवून दिले. वेतनवाढीसाठी निधी उभारताना एसटीकडून भाडेवाढ, डिझेलवरील कर कमी करणे आणि टोलमाफी मिळविण्यासाठी बरीच धडपड केली जात असल्याची माहिती यानंतर समोर आली. याचाच परिणाम म्हणून रावतेंनी १५ जूनपासून दरात १८ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणला. डबघाईला आलेल्या महामंडळाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ही दरवाढ होणार, यात शंकाच नव्हती. त्यात प्रस्तावित असलेल्या ३० टक्क्यांऐवजी आम्ही केवळ १८ टक्केच दरवाढ केली, हे सांगून प्रवाशांच्या खिशाची आपल्यालाही चिंता असल्याचा आव आणला गेला. असो. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ व्हावी यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना वेठीला धरून का होईना, एसटी सेवा ठप्प करत वेतनवाढीची मागणी केली होती. गेल्या १५ वर्षांपासून अधिक काळ वेतनकराराअभावी वेतनवाढ मिळाली नसल्यामुळे त्यांच्या मागण्या या अतिशय रास्त होत्या. मात्र, प्रवाशांना गृहीत धरून त्यांची संप करण्याची पद्धत ही चुकीची होती. यावर्षी १ मे रोजी वेतनवाढीची अपेक्षा बाळगलेल्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेवर विरजण पडले आणि ७० व्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळाने चार वर्षांसाठीचा ४ हजार ८४९ कोटी रुपयांचा वेतनकरार जाहीर केला. यामुळे प्रत्येक वर्षी एसटी महामंडळावर १,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक बोजा पडणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधनावरील खर्च आणि अन्य खर्चांसाठी महामंडळाकडून दरवर्षी ८ हजार कोटींच्या आसपास रक्कम खर्च केली जाते. हाच खर्च महामंडळाचं कंबरडं मोडत असताना यावर्षी २ हजार ६०० कोटींचा संचित तोटाही महामंडळाला सहन करावा लागला आहे. त्यातच वेतनवाढीसाठी आवश्यक पैसा उभारणे, ही त्यांच्यापुढील जटिल समस्या आहे.

 

सध्या एसटी महामंडळाचा २ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च हा डिझेलवर होत असून त्यात निम्मा कर हा त्यांना भरावा लागतो. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा याप्रमाणे यावेळी १६० कोटी रुपयांचा टोल टॅक्सही त्यांना भरावा लागला. यातच डिझेलवरील कर रद्द करण्याचा एसटीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर न केल्याने वर्षासाठी त्याचाही ४६० कोटींचा भार सोसवेनासा झाल्याने त्याचा परिणाम तिकिटांच्या दरवाढीत झाला. वेतनवाढ जाहीर जरी केली असली तरी ती अधिकृत कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन जाहीर केली नसल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि पुन्हा प्रवाशांना वेठीला धरून एसटी सेवा बंद करण्यात आली. यावेळीही संघटनांना विश्वासात न घेता केलेली वेतनवाढ, तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हवी असलेली वेतनवाढ, काही जाचक अटी यांच्याविरोधात हा संप पुकारण्यात आला. मात्र, संप सुरू असताना एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते फोन बंद करून बसले होते. त्यांनी त्वरित पुढे येऊन याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

नाण्याला दोन बाजू असतात तसे प्रत्येक घटनेच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. एसटीची बाजू जाणून घेतली तरी त्यांच्या नियोजनशून्य कारभाराकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रस्तावित ३० टक्क्यांऐवजी १८ टक्के दरवाढ केल्याचे एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी जाहीर केले, परंतु ही झाली झाली एसटी महामंडळाची बाजू. स्पर्धेच्या युगात एसटी महामंडळाला आपले अस्तित्व टिकवणे जड जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. नव्या तंत्रज्ञानाचा अभाव, खासगी वाहनांची संख्या वाढत असताना त्यांच्याशी स्पर्धा करण्यात आलेले अपयश आणि मूलभूत खर्चांवरील फसलेले नियंत्रण या एसटीचे कंबरडे मोडण्याला कारणीभूत ठरलेल्या प्रमुख बाबी आहेत. असे असले तरी यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही आजपर्यंत कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. 'रस्ता तिथे एसटी’ असे एकेकाळी ऐटीने मिरवणाऱ्या एसटी महामंडळाची आजची परिस्थिती ही बघवणारी नाही. आज दुर्गम भागातही जीप किंवा रिक्षासारख्या वाहनांनी मोठ्या प्रमाणात जम बसवला आहे. तसेच ज्या ठिकाणी जास्त फायदा त्या ठिकाणी एसटीची सेवा देण्यातही महामंडळ कमी पडत आहे. अनेक ठिकाणी मागणीच्या वेळीही एसटीच्या बसेस नसल्याने नाईलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनांकडे वळावे लागत आहे. खाजगी वाहनांशी दोन हात करण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी कमी पडतात, हे मान्य करावे लागेल.

 
ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने हंगामी दरवाढ जाहीर केली. मात्र, खाजगी वाहने जेवढे दर आकारतात तेवढे दर आकारून फायदा किंवा त्यांच्याशी स्पर्धा करता येणार नाही हेदेखील न कळण्याइतपत परिस्थिती उद्भवली आहे. काही काळापूर्वी एसटीचे सुरू झालेले अॅपही थकल्याचेच दिसून येत आहे. बसला होणारा उशीर किंवा ती रद्द झाल्याची माहिती अशी कोणतीच माहिती यावरून मिळत नसल्याचे याचा वापर केवळ तिकिटांच्या आरक्षणासाठीच करायचा का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. एसटी डेपोंच्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव, एकंदरीत बसेसची सध्याची परिस्थिती पाहिल्यास प्रवाशांनी एसटीकडे पाठ का फिरवली असेल, याचे कारण आपणहूनच मिळत जाते. काळानुसार एसटी महामंडळाने शिवशाही, शिवनेरी यांसारख्या बसेस आपल्या ताफ्यात दाखल केल्या खऱ्या, परंतु केवळ एसटी महामंडळाच्या नावाखाली खासगी कंत्राटदाराकडून या बसेस चालविण्यात येत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे दर परवडणारे असले तरी आजही आपल्या राज्यात हे दर न परवडणारा एक वर्ग आहे, याचीही जाणीव असायला हवी. खाजगी कंत्राटदाराला या बसेस चालवायला दिल्यामुळे कुठेतरी खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे काही संघटनांकडून म्हटले जात आहे.
 
आज एसटीची आपली ओळख टिकवण्याची धडपड ही त्यांच्या सेनापतींच्याच नियोजनशून्य कारभारामुळे टिकवणे शक्य झालेले नाही. ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेल्या एसटीच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक प्रश्न आज उपस्थित होतात. अस्वच्छ आणि जीव सोडलेल्या बसेस, डेपोंची स्थिती, वेळापत्रकात सतत होणारे बदल हे आज एसटी महामंडळाच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेले आहे. राज्यातील कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे लक्ष दिले नाही, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरले आहे. तोट्याचा भार काढून नफ्यात येणे हे कदाचित आता एसटीसाठी आश्चर्यच ठरणार आहे. आजच्या एकंदरीत परिस्थितीवर कर्मचारी आणि प्रवाशी समदु:खी आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एसटीच्या कायापालटासाठी निघालेल्या सेनापती रावतेंच्या पदरीही निराशाच पडली आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बसेस आहेत. काही काळापूर्वी रावतेंनी शिवशाहीचीदेखील सुरुवात केली. मात्र, सध्या केवळ १२१ बसेसच ठराविक मार्गांवर धावत आहेत. २ हजार गाड्यांपैकी १५०० गाड्या भाडेतत्त्वावर दाखल करण्यात येणार असून अद्याप त्यांचाही पत्ता नाही. शिवशाहीच्या नावाखाली मात्र, निमआराम बसेसवर गदा येणार आहे, हे नक्कीच. परिणामी सामान्य प्रवाशांना शिवशाहीचा प्रवास कितपत परवडेल हा प्रश्न उद्भवतोच. त्यानंतर मात्र प्रवासी खाजगी सेवांकडे वळल्यास त्यांच्या नावाने बोटे मोडत राहण्यापेक्षा प्रवाशांचा विचार करून सेवा दिल्यास त्याचा फायदा नक्कीच एसटी महामंडळाला होऊ शकेल.
@@AUTHORINFO_V1@@