कॉंग्रेस-माओवाद्यांचा दलाल जिग्नेश?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
2 जानेवारी 2018. भीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतरचा दुसरा दिवस. या दिवशी एका माओवाद्याने दुसर्‍या माओवाद्याला एक पत्र लिहिले. ते पत्र पोलिसांच्या ताब्यात आले आहे. 6 जून रोजी, पोलिसांनी ज्या आठ माओवादी समर्थकांना अटक केली, त्यात दिल्ली येथून रोना विल्सन या शहरी नक्षल्याचाही समावेश आहे. रोना विल्सनच्या घरी हे पत्र सापडले. हे पत्र ‘कॉम्रेड एम’ असे टोपण नाव घेतलेल्या माओवाद्याचे असून ते रोना विल्सनला लिहिलेले आहे. या पत्राचे जाहीर वाचन ‘टाइम्सनाऊ’ वृत्तवाहिनीवर करण्यात आले. 2019 साली नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून काय काय भयंकर षडयंत्रे सुरू आहेत आणि त्यांना कॉंग्रेस पक्षाकडून कशी रसद पुरविली जात आहे, याचा गौप्यस्फोट करणारे हे पत्र आहे.
‘टाइम्सनाऊ’चे म्हणणे आहे की, जे भीमा कोरेगावचे आंदोलन झाले, त्याला मदत आणि रसद पुरविणार्‍या कॉंग्रेस पक्षाच्या संबंधांना उघड करणारा अत्यंत स्फोटक असा मजकूर यात आहे. या पत्रात आहे- सीपीआयएमच्या वरिष्ठ कॉम्रेडचे कॉंग्रेसमधील ‘मित्रां’शी आधीच बोलणे झाले आहे. त्यात या कॉंग्रेसमित्राने, दलित आंदोलन अधिक आक्रमक करण्याची सूचना केली आहे; तसेच त्यासाठीची सर्व कायदेविषयक व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कॉंग्रेसकडून येणारी ही सर्व मदत ‘मध्यस्थ’ जिग्नेशच्या मार्फत येईल, असेही त्यात लिहिले आहे. महाराष्ट्र पोलिसांचा दावा आहे की, हा मध्यस्थ आमदार जिग्नेश मेवाणीच आहे.
या पत्रात असाही दावा केला आहे की, या माओवादी आंदोलनाला भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा आहे. पत्रात लिहिले आहे- दलितांच्या भावना, ब्राह्मणकेंद्रित भाजपा व रा. स्व. संघाच्या स्पष्ट विरोधात आहेत आणि या भावनांचे रूपांतर प्रचंड मोठ्या चळवळीत व गोंधळात (चाओस) केले पाहिजे. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य सरकार या मुद्यावर अत्यंत चिंतेत आहे आणि इतर राज्यांतही समांतर आंदोलने करून आपण हा दबाव कायम ठेवला पाहिजे. यामुळे 2019 साली मोदीला सत्तेवरून हाकलण्यात मदत होणार यात शंका नाही.
 
‘टाइम्सनाऊ’नुसार या पत्रात असाही उल्लेख आहे की- आपल्या क्रांतीचे कॉम्रेड जिग्नेश व कॉम्रेड उमर हे तरुण योद्धे आहेत. कॉम्रेड प्रकाश (म्हणजे आंबेडकर?) यांच्या ठाम पाठिंब्यामुळे येणार्‍या काही वर्षांत, या दोघांच्या सततच्या प्रयत्नांमुळे देशभरातील अनेक दलित चळवळींना एकत्रित आणण्यात यश मिळेल, अशी आपण आशा करायला हरकत नाही. भीमा कोरेगाव आंदोलन फारच प्रभावी ठरले आहे. एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूला, प्रचाराचे इंधन म्हणून पुढील आंदोलनासाठी वापरता येईल. ‘टाइम्सनाऊ’चा निष्कर्ष आहे की, भीमा कोरेगाव हिंसाचार हा कॉंग्रेससारख्या राजकीय शक्तींचा नियोजित प्रयत्न होता. दलित आणि माओवाद्यांना वापरून देशात अस्थिरता निर्माण करायची आणि त्याचा उपयोग 2019 साली नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी करायचा.
या पत्रात जिग्नेश मेवाणीचा वारंवार उल्लेख आला म्हणून ‘टाइम्सनाऊ’ने जिग्नेशशी संपर्क साधला तर तो म्हणाला- त्याच्याविरुद्धचा एकही आरोप सिद्ध झाला तर तो सार्वजनिक जीवनाचा त्याग करील.
 
बुधवारी अटक झालेले हे आठही जण पुणे येथे झालेल्या यल्गार परिषदेशी संबंधित आहेत. ब्रिटिशांचा पेशव्यांवरील विजयाचा 200 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. असे म्हणतात की, या परिषदेमुळेच दुसर्‍या दिवशीचा हिंसाचार झाला. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पोलिसांनी यल्गार परिषदेच्या काही सदस्यांवर धाडी टाकून बरेच दस्तावेज व इतर साहित्य जप्त केले होते. वाचकांच्या माहितीसाठी, हे जे 200 वर्षांपूर्वी ब्रिटिशांचे पेशव्यांविरुद्ध युद्ध झाले आणि ज्यात पेशव्यांचा पराभव झाला, ते युद्ध दलितांचा ब्राह्मणांवर विजय अशा अर्थाने आतापर्यंत कम्युनिस्ट इतिहासकारांनी रंगविले आहे. कारण ब्रिटिशांच्या सैन्यात दलित सैनिकांची एक तुकडी होती. असो. या सर्व प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचेही नाव उघड झाले म्हणून आंबेडकर बिथरले. ‘टाइम्सनाऊ’ने या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर जे बरळले, ते अत्यंत असभ्य व हीन होते. या पत्राचा गौप्यस्फोट करणारे ‘टाइम्सनाऊ’चे पत्रकार आनंद नरिंसहन्‌ यांना तर त्यांनी धमकीही देऊन टाकली. कॉम्रेड आंबेडकर म्हणतात- ‘‘हा ‘इडियटपणा’ बंद करा. (मोदी) सरकार सहा महिन्यांनंतर राहणार नाही. .... उसकी भी .... हम मार सकते है। वुई कॅन हॅव होल थिंग वुईथ यू. यह मत समझिये की यह सरकार चलेगी पाच साल के लिए। उसको (नरिंसहन्‌) कहिए की इलेक्शन होने के बाद मिलते है उससे, कह दो उसे। उसको बोल देना, किसके पीछे लगे हो ये याद नहीं है तुमको। पागल आदमी है. (म्हणजे नरिंसहन्‌) वहॉं से (बहुतेक भाजपाकडून) पाकिट ले के बैठा है। हम लोग भी उसके पीछे लग सकते है।’’ असो. आता या भयंकर धमकीनंतर, शेखर गुप्ता यांची एडिटर्स गिल्ड ही संस्था आंबेडकरांवर काय कारवाई करते, ते बघायचे. ठरल्याप्रमाणे सेक्युलर व सोनिया-राहुलचे गुलाम पत्रकार व कम्युनिस्ट मानवाधिकारवाले मिठाची गुळणी घेऊन चूप आहेत.
 
 
आम्ही मागेच सावध केले होते की, 2019 ची ही निवडणूक अत्यंत भयानक अशी होणार आहे. अगदी रक्तपातही होऊ शकतो. सोनिया गांधींनी कॉंग्रेस अधिवेशनात (ज्यात राहुलचा राज्याभिषेक झाला) स्पष्टच सांगितले होते की, आम्ही कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेवर बसू देणार नाही. ही जी ‘कुठलीही परिस्थिती’ आहे, ती नेमकी काय, हे आता हळूहळू उघड होत आहे. भीमा कोरेगाव दंगल हा त्याचा एक मासला होता. या दंगलीत कुणाला नेमके लक्ष्य करायचे हेही आधीच ठरले होते. मिलिंद एकबोटे आणि संभाजी गुरुजी भिडे. प्रकाश आंबेडकर सातत्याने संभाजी गुरुजी भिडे यांना अटक करण्याची मागणी का करत होते, याचे रहस्य आता उलगडू लागले आहे. 5-10 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले म्हणून, आयकरात सवलत दिली नाही म्हणून नाराज होऊन ‘नोटा’चा पर्याय स्वीकारू, अशी धमकी देणार्‍या, लहान-सहान गोष्टींवरून नरेंद्र मोदींवर आगपाखड करणार्‍या तमाम सुशिक्षित मतदारांना, हे एक आव्हान आहे. हा समाज समरस व्हावा, हा देश एकसंध राहावा, म्हणून जिवापाड धडपडणार्‍या संघाच्या स्वयंसेवकांच्या मनातही जातिभेदाचे विष पेरण्याचा आटोकाट प्रयत्न होणार. अर्थात्‌ तो निष्फळ जाणार, हेही निश्चित आहे. परंतु, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष किती रसातळाला जाणार, याची ही झलक आहे. आताही भारतीय सावध झाले नाहीत, तर कदाचित पुढची पिढी आपल्याला माफ करेल की नाही, सांगता येत नाही.
@@AUTHORINFO_V1@@