प्रणवदा कृतीतून खूप काही बोलले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेले २५ दिवस नागपुरात सुरू असलेल्या संघशिक्षावर्गाच्या समारोप समारंभात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होणार की नाही, त्यांनी तेथे जावे की नाही, सहभागी झाले तर काय बोलतील आणि बोलावे, या सर्व चर्चा आता समाप्त झाल्या आहेत. आता चर्चा होत आहे ते काय बोलले, कुणासाठी बोलले, त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय याची. ती होणे योग्यही आहे. त्यातून अमृतकलशच बाहेर येऊ शकतो, पण या चर्चेच्या गदारोळात त्यांनी केलेली कृती मात्र वाहत जाऊ नये. कारण ते जेवढे आणि जे काही बोलले, त्यापेक्षा अधिक त्यांनी कृतीतून सांगितले आहे व ते अधिक महत्त्वाचे आहे.
 

संघाच्या अशा कार्यक्रमात संघाबाहेरच्या, त्यातही काही संघविरोधी महनीय व्यक्ती येणे ही काही नवीन बाब नव्हती. अगदी महात्मा गांधींपासून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, रा. सू. गवई, डॉ. अभय बंग यांच्यापर्यंतच्या अनेक महनीय व्यक्ती संघाच्या व्यासपीठावर येऊन गेल्या. त्यांनी त्यांचे विचार मोकळेपणे मांडले. तरीही भारताचे राष्ट्रपतिपद भूषविलेले, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिलेले, केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळलेले प्रणव मुखर्जी जेव्हा संघाचे निमंत्रण स्वीकारतात, प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होतात, तेव्हा ती घटना साधारण राहत नाही. ती असाधारणच बनते व त्यामुळे त्यांच्या आगमनाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नागपूर भेटीचा अमित शाह यांच्या दौऱ्याशी किंवा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला ही बाब वेगळी, पण काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही संघाचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. त्यांनी तेथे जाऊ नये असा प्रयत्नही करून पाहिला. तसे करणाऱ्यामध्ये कपिल सिब्बल, जयराम रमेश, पी. चिदम्बरम असणे तर स्वाभाविकच आहे, पण त्यात सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचाही समावेश होता. त्यांच्या संघाच्या व्यासपीठावर जाण्याचे कोणकोणते अर्थ निघू शकतात याची जाणीवही त्यांना करून देण्यात आली. त्यांच्या कन्येने तर धोक्याचा इशाराही दिला, पण या सर्व दडपणाला झुगारून, प्रणवदा या समारंभात सहभागी झाले यातच सर्व काही येते. त्यांची ही कृतीच पुरेशी बोलकी ठरते. तिचा सर्वात महत्त्वाचा अर्थ म्हणजे संघाबद्दल असलेली वैचारिक अस्पृश्यता त्यांनी धुडकावून लावली. एका प्रकारे त्यांनी संघाला वैचारिक अस्पृश्यतेच्या शापातून मुक्तच केले. मग त्यांच्या भाषणाचा कुणी कोणताही अर्थ काढो.

 

प्रणवदांच्या संघभेटीच्या या आयोजनाला काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने एक राजकीय गैरसोयीचाही आयाम होता. तो म्हणजे आज त्या पक्षाचे नेते संघावर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा भाजपला जेवढा विरोध असतो, त्यापेक्षा तीव्र विरोध संघाबद्दल असतो. संघावर अश्लाघ्य आरोप करण्याच्या कारणावरून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अनेक न्यायालयात खटलेही सुरू आहेत. अशा वेळी प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावावी ही काँग्रेससाठी अडचणीचीच बाब होती. असे असतानाही काहीशा सूज्ञपणे काँग्रेसने अधिकृत आक्षेप घेणे टाळले. प्रमुख नेत्यांकरवी मात्र त्याने आपली नापसंती दर्शविलीच.

 

प्रणवदा संघाच्या कार्यक्रमात गेले, तरी ते तेथे कसे वागतात, याबद्दलही अनेकांनी तारे तोडले होते. ते डॉ. हेडगेवार व गुरूजी यांच्या समाधीला भेट देणार काय, तिथे फुले वाहणार काय, त्यांचे भाषण सरसंघचालकांच्या भाषणाच्या आधी होणार की नंतर, त्यांची उपस्थिती ही संघाच्या विचारांवर शिक्कामोर्तब ठरणार काय, असेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर न देता 'जे काय बोलेन ते कार्यक्रमातच बोलेन’ अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. प्रत्यक्षात ते काय बोलले हे आता सर्वांसमोरच आले आहे. ते कसे वागले हेही सर्वांसमोर आहे. दडपणाला झुगारून, संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणे ही त्यांची पहिली कृती. दुसरी कृती म्हणजे त्यांनी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट देणे व तेथे आपला अभिप्राय लिहिणे. वास्तविक ती फार भव्य वास्तू नाही. महाल भागातील एका अरुंद गल्लीत डॉक्टरांचे ते घर आहे. साधेच पण टुमदार. संघाने डॉक्टरांचे स्मारक या भावनेने व्यवस्थित केले. डॉक्टर वापरत असलेल्या काही वस्तूही तेथे आहेत. त्या स्मारकाला त्यांनी भेट दिली आणि तेथील शेरेपुस्तकात डॉ. हेडगेवार यांचा 'महान देशभक्त’ असा उल्लेख करून, त्यांच्या स्मृतीला अभिवादनही केले. त्यांची ही कृती काय सांगून जाते? ज्या संघाचा काँग्रेस पक्ष सातत्याने दुस्वास करत आला आहे, ज्या पक्षाच्या सरकारने संघावर तीन-तीनदा बंदी घातली आहे, त्या संस्थेच्या संस्थापकाचा तोही प्रणवदांसारख्या एके काळच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने गौरवपूर्ण उल्लेख करावा, या कृतीचा अर्थ कसा लावणार? त्यांनी आपल्या भाषणात संघाचा एकदाही उल्लेख केला नाही म्हणून समाधान मानणार? भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी स्पष्ट केले की, ते त्या ठिकाणी राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती याबद्दलचे विचार मांडणार आहेत. त्यात संघाबद्दलचा अभिप्राय व्यक्त करणार नाहीत हे ओघाने आलेच, पण मुद्रित भाषणाच्या बाहेर जाऊन, संघस्वयंसेवकांनी काय केले पाहिजे याचा त्यांनी शिक्षार्थींना संबोधून हितोपदेश दिलाच. या शिवाय समारंभात वावरताना व अन्य वेळीही त्यांचा सरसंघचालकांशी होणारा संवाद त्या दोघांमधील सौहार्द अधोरेखित करत होता. तोही बरेच काही सांगून जात होता.

 

संघाने निमंत्रण दिले आणि त्यांनी ते तडकाफडकी स्वीकारले असे घडण्याचीही शक्यता नाही. गेला काही काळ त्या दोघांमध्ये संवाद सुरूच होता. त्यांनी संघाबद्दलच्या शंका सरसंघचालकांसोबत बोलून दाखविल्याच असतील व त्याची समर्पक उत्तरेही त्यांना मिळाली असतील. या संवादाचे सुसंवादात रूपांतर होऊन, प्रणवदा या कार्यक्रमात सहभागी होणे अशक्य नाही. त्याचाही विचार होणे आवश्यक आहे.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या समारंभात झालेली प्रणवदा आणि सरसंघचालक यांची भाषणे. त्या भाषणांतून कुणीही आपल्या सोयीनुसार अर्थ काढू शकतो, पण भारतीय परंपरेचे 'विविधतेत एकता’ हे सूत्र दोघांनीही आपापल्या पद्धतीने अतिशय सुरेखपणे अधोरेखित केले. प्रणवदांच्या भाषणात संघ हा शब्द एकदाही आला नाही, हे जेवढे खरे आहे, तेवढेच सरसंघचालकांच्या भाषणात एकदाही 'हिंदुराष्ट्र’ हा शब्द आला नाही हेही खरेच. त्यातून सोयीनुसार वेगळे अर्थ काढता येतीलही, पण 'विविधतेत एकता’ या त्यातील समान सूत्राला कुणाचाही आक्षेप असणार नाही, असूही नये. एकेकाळी प्रणवदा राजकारणात आकंठ बुडालेले असले, तरी वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष वा सरकार यांच्यातील गतिरोध संपविण्यासाठी तेच कामी येत होते. याचाच अर्थ ते केवळ राजकारणीच नव्हते, तर घटनांचा समतोल विचार करणारे एक संकटमोचकही होते, हे विसरता येणार नाही. पण राष्ट्रपतिपदी आरूढ झाल्यापासून अगदी परवा संघाच्या कार्यक्रमात सहभागी होईपर्यंतचा त्यांचा व्यवहार पाहिला, तर ते आता खऱ्या अर्थाने 'स्टेट्समन’ झाले आहेत. घरातील एखादी वडीलधारी व्यक्ती जशी संपूर्ण कुटुंबासाठी आधार असते, तशी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. तिचेच विलोभनीय दर्शन नागपुरातील त्यांच्या कृतीतून दिसत होते. तिचा विचार होऊन, त्यानुसार आपणही तशी कृती करण्यास प्रवृत्त होणे, हा त्यांच्या नागपूरभेटीचा संघभेटीचा सारांश आहे.

ल.त्र्यं.जोशी
९४२२८६५९३५
@@AUTHORINFO_V1@@