विचारांच्या आदानप्रदानामुळेच भारतातील सहिष्णुता टिकून - डॉ. प्रणव मुखर्जी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 
नागपूर : माझ्या ५० वर्षाच्या सार्वजनिक जीवनाच्या दीर्घ अनुभवातून मी हे सांगू इच्छितो की, विचारांच्या आदानप्रदानामुळेच भारतातील विविधता आणि सहिष्णुता टिकून आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी केले. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या संस्कृतीच्या समग्रतेमुळेच आपण एक राष्ट्र म्हणून उभे आहोत, असे देखील ते म्हणाले.
 
 
डॉ. प्रणव मुखर्जी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करत होते. त्यांच्या या कार्यक्रमाला येण्याची निश्चिती झाल्यापासून माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती, त्याचबरोबर देशाच्या राजकीय पटलावर देखील मोठ्याप्रमाणात या कार्यक्रमाची चर्चा होती. त्यामुळे प्रणव दा काय बोलतात?, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.
 
 
मी येथे राष्ट्र, राष्ट्रीयता, आणि राष्ट्रभक्ती यांबद्दलच्या माझ्या संकल्पनांची चर्चा करायला आलो आहे, असे भाषणाच्या सुरुवातीलाचा प्रणव मुखर्जी बोलले. राष्ट्राची संकल्पना मांडताना त्यांनी विविधतेत एकता या मुद्द्यावर आपली मते सर्वांसमोर मांडली. राष्ट्र म्हणजे एक संस्कृती, एक इतिहास असलेल्या अनेक लोकांचा समूह होय, असे ते म्हणाले. त्याचबरोबर स्वत:च्या देशाबद्दल असलेला अभिमान, आणि एकता म्हणजेच राष्ट्रीयता होय, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रभक्तीची व्याख्या करताना ते म्हणाले की, राष्ट्रभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेली निष्ठा आणि त्याचे जोरदार समर्थन होय.
 
 
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ५० वर्षाच्या राष्ट्रीय जीवनातील अनेक अनुभव सांगितले, त्याचबरोबर राष्ट्रीयतेचे मुद्दे भारतभरातून आलेल्या संघ कार्यकर्त्यांसमोर मांडले. आपल्या या भाषणाची सांगता करताना त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आभार देखील मानले. शेवटी जय हिंद, वंदे मातरमच्या उद्घोषाने त्यांनी भाषणाची सांगता केली.
 
पहा संपूर्ण कार्यक्रम लाइव्ह: 
 
 
@@AUTHORINFO_V1@@