संघ स्थापनेपासून देशातील मान्यवरांना बोलावण्याची आमची परंपरा - डॉ. मोहन भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 
नागपूर : संघाच्या स्थापनेपासून देशातील मान्यवरांना संघाच्या कार्यक्रमात बोलावण्याची आमची परंपरा आहे, ती खूप स्वाभाविक आहे, त्यात नवीन काहीही नाही, तरी याची विशेष चर्चा चालवली गेली, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती निश्चित झाल्यापासून माध्यम आणि राजकीय क्षेत्रात त्याची मोठ्याप्रमाणात चर्चा सुरु आहे. संघात दरवर्षी तृतीय वर्षाचा कार्यक्रम होतो. त्यात देशातील विविध मान्यवरांना अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते, ती स्वाभाविक आणि नित्य चालणारी प्रक्रिया आहे, परंतु तरी देखील याची विशेष चर्चा देशभरात चालली, त्याला काहीही अर्थ नाही, अशा शब्दात भागवत यांनी या चर्चेचे उत्तर दिले.
 
 
 
डॉ. प्रणव मुखर्जी हे अनुभव संपन्न आणि ज्ञानी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या अनुभवातून आणि ज्ञानातून संघाला मार्गदर्शन मिळावे ही आमची इच्छा आहे. हे आमंत्रण अगदी सहज भावाने दिलेले असून त्यांनी देखील तेवढ्याच सहजतेने स्वीकारले. त्यामुळे त्यांना येथे का बोलावले? ते का आलेत? यावर चर्चा करणे निरर्थक आहे, असे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
भारतभूमीवर जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती भारतमातेचा पुत्र आहे. एखाद्या भारतीयासाठी दुसरा भारतीय परका असूच शकत नाही, प्रत्येक भारतीय एकमेकांचे बांधव आहेत. देशात राजकीय मतप्रवाह भिन्न असू शकतात. परंतु इतरांच्या विविधतेचा सन्मान करणे, आणि स्वत:च्या विचारांवर स्थिर राहून आपण सगळे एकत्रित नांदू शकतो, किंबहुन हीच आपली संस्कृती आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
 
 
या भाषणाच्या समारोपाला त्यांनी संघाला समजून घेण्यासाठी सर्वांनी संघात यावे, संघाचा अनुभव घ्यावा असे आवाहन केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@