गरजूंचा जीवनाधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 

 
 
 
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळग्रस्त भागातून चांगदेव खाडे यांनी मुंबईत स्थलांतर केले.  

डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी ’शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा जीवनमंत्र दिल्यानंतर दलित समाजातील अनेक तरुणांनी शिक्षणाची कास धरली. शिक्षणामुळे त्यांच्या जाणिवा रुंदावल्या. आपली प्रगती खेड्यात होणार नाही. आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला पुढे न्यावयाचे असल्यास आपणांस शहरात जावे लागेल हे त्यांनी जाणलं. ते शहराकडे आले. शहरात तुलनेने जातीयता कमी होती. पुढे जाण्याची समान संधी होती. त्या संधीचं काही जणांनी सोनं केलं. एवढ्यावरचं ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वत:च्या कुटुंबासह आपल्या समाजालादेखील सोबत नेलं. या अशा काही लोकांपैकी एक होते चांगदेव खाडे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून मुलांना शिकवले. चांगदेवांना एक मुलगा आणि दोन मुली. पाच जणांच्या कुटुंबाचं शिक्षकाच्या तुटपुंज्या पगारात भागत नसे. त्यावेळी आजच्या तुलनेत शिक्षकांना पगार कमीच असायचा. आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी शिक्षकी पेशातून मिळालेल्या वेळेत चांगदेव सोलापूरहून सोलापुरी चादरी आणून विकत. सोलापुरी चादरींना नेहमीच मागणी असते. ती त्यांच्या पथ्यावर पडली. सोबत चपलादेखील विकल्या. मात्र त्याला त्यांनी व्यावसायिक स्वरूप दिलं नाही. कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेला पैसा त्यांनी समाजकार्यासाठी वापरला. आपल्या वडिलांचं हे कार्य त्यांचा मुलगा राजेश खाडे समर्थपणे पुढे नेत आहे.

वडिलांच्या धाकामुळे आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे उमजल्यामुळे राजेशने बारावी झाल्यानंतर ऐरोलीतून सिव्हिल डिप्लोमा केला. पुढे राजस्थान विद्यापीठातून बी. टेकची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्ही. आर. तळवलकर असोसिएट्समध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून तीन वर्षे नोकरी केली. या दरम्यान त्यांचा विवाह अनिता राजेश खाडे यांच्याशी झाला. अनिता खाडे यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली असून, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मास्टर्स इन व्हॅल्युएशन हा अभ्यासक्रम शिकत आहेत. नोकरी करत असतानाच राजेश खाडे बांधकामाची लहानसहान कामे घेत होते. प्लंबिंग, ड्रेनेज अशी घरगुती स्वरूपाची ही कामे होती. प्लंबिंगचं महानगरपालिकेचा परवानादेखील त्यांनी काढला. एका प्रकारे त्यांचा पुढे मोठा बांधकाम व्यावसायिक होण्याचा अभ्यासच चालू होता. १९९६ साली त्यांनी ’मानसी एंटरप्रायजेस’ची स्थापना केली. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभारणीची गरज असते. काही पैसे बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात, तर काही पैसे सोने गहाण ठेवून, त्यांनी भांडवल उभारलं. हळूहळू प्रगती होत होती. कामाचा दर्जा आणि प्रामाणिकपणामुळे म्हाडाची कामे देखील मिळू लागली होती.

त्यांच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे वॉटरप्रूफिंग अर्थात जलरोधक. वांद्रे कुर्ला संकुल येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या जलतरण तलावाचं काम खूपच आव्हानात्मक होतं. ते त्यांनी पूर्ण केलं. त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडिअमचा भुयारी टँक खाडेंच्या कंपनीनेच बांधलेला आहे. गोरेगाव येथील उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे प्रबोधनकार वाचनालय किंवा गोरेगाव द्रुतगती मार्गाजवळील स्मशानभूमी आदीचं बांधकामदेखील खाडेंच्या कंपनीनेच उभारलंय. सध्या ते खारघर येथे एक लाख चौरस फूट जागेवर इमारत बांधत आहेत. त्याचप्रमाणे सांगोला, सोलापूर येथे चार एकरच्या विस्तीर्ण जागेत सांगोला हाऊसिंग कॉलनी ते उभारत आहेत. मायक्रो कॉन्क्रीट ही अभिनव संकल्पना राजेश खाडेंची. त्याचा शोध खाडेंनी लावला. आज जवळपास प्रत्येक बांधकामामध्ये त्याचा वापर होतो. राजेश खाडेंच्या कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दुरुस्त केलेल्या बांधकामाची ते दहा वर्षांपर्यंत हमी देतात. ’मानसी एन्टरप्रायजे’स व्यतिरिक्त ’झेड पेस्ट कंट्रोल’ ही कंपनीदेखील ते चालवितात. या कंपनीच्या संचालिका त्यांच्या पत्नी अनिता खाडे आहेत. शून्यातून सुरू झालेला हे उद्योगसाम्राज्य, आता चार कोटींची उलाढाल करत आहे.

राजेश खाडेंच्या वडिलांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे कुटुंबाची गरज भागली, की उरलेला पैसा ते समाजकार्यांसाठीच वापरत. त्यांच्या या सामाजिक योगदानासाठीच महाराष्ट्र शासनाने ’दलितमित्र’ पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव केला होता. राजेश खाडे हेदेखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सामाजिक कार्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी ’जीवनाधार प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके आदी शाळेसाठी उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं. तसेच फिजिओथेरपिस्ट, दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन केलं जातं.

समाजात काम करत असताना त्यांना एक गोष्ट जाणवली, की स्त्री जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर कुटुंबदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं. ही सक्षमता आणण्यासाठी त्यांनी ’जीवनाधार क्रेडिट को-ऑप सोसायटी’ची स्थापना केली. या पतपेढीच्या माध्यमातून दहा महिलांच्या बचतगटांना चालना देण्यासाठी दोन लाख रुपये दिले जातात. समाजातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी ’जीवनाधार बेरोजगार मजूर सहकारी संस्था’देखील त्यांनी स्थापन केली आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेअंतर्गत के पश्चिम विभागात स्वच्छता मोहीम ते राबवितात. भविष्यात आदिवासी पाड्यांमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने ते सध्या प्रकल्पाची आखणी करत आहेत.

”बांधकाम व्यवसाय तसा काहीसा बदनामच. मात्र सचोटी अन प्रामाणिकपणे तुम्ही काम केल्यास यश तुमच्या पायाशी लोळण घेते,” असे राजेश खाडे सांगतात. या क्षेत्रात यावयाचे असल्यास उत्तम जनसंपर्क असावा, बँकेशी चांगले संबंध असावेत. बँकेचे हप्‍ते वेळोवेळी फेडावेत. शक्य नसेल एखाद्या वेळेस, तर बँकेला तसे कळवावे. त्यामुळे बँकेसोबतचे संबंध दृढ होतात. आपल्या सोबतच्या सहकार्‍यांना, कर्मचार्‍यांना योग्य वागणूक दिल्यास ते उत्तम कार्य करतात. असे कानमंत्र राजेश खाडे आपल्या अनुभवातून देतात.

अंधेरी येथील दहा बाय दहाच्या चाळीत राहणारा हा तरुण आज इतरांच्या स्वप्नांतील घरांना आकार देतो. गुणवत्ता आणि मेहनत यांची जोड असेल तर सुबत्ता नक्कीच येथे हे राजेश खाडेंनी सिद्ध केले.

प्रमोद सावंत

@@AUTHORINFO_V1@@