देशात अराजकता पसरवणे हेच कॉंग्रेस आणि माओवाद्यांचा ध्येय : भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

रोना विल्सनच्या पत्रावरून कॉंग्रेसवर जोरदार हल्ला 



नवी दिल्ली : 'आपल्या राजकीय स्वार्थासाठी दलितांचा उपयोग करणे आणि माओवाद्यांच्या मदतीने देशात अराजकता पसरवणे हेच काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे' अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी आज केली आहे. कोरेगाव-भीमा येथे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांनी काल पाच माओवादी समर्थकांना अटक केली आहे. यातील रोना विल्सन या शहरी माओवाद्याकडून पोलिसांना एक पत्राचा खुलासा करण्यासाठी म्हणून भाजपकडून नवी दिल्लीतील आपल्या कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.


कॉम्रेड रोना विल्सन याच्याकडे सापडलेल्या पत्रामध्ये कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलींचा स्पष्ट उल्लेख असून यामध्ये जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, सुधीर ढवळे आणि काही नक्षलवाद्यांसह कॉंग्रेस पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे पात्रा यांनी यावेळी म्हटले. पत्रात लिहिल्याप्रमाणे 'एल्गार परिषदे'साठी नक्षलवाद्यांकडून दोन वेळा निधी मिळाल्याचे आणि त्यातूनच महाराष्ट्रासह देशात दंगली घडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अशाच प्रकारच्या दंगली आगामी २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात घडवल्या जाव्यात आणि यासाठी हवी तेवढी आर्थिक मदत 'कॉग्रेस' पक्ष करायला तयार आहे, याचा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला असल्याचे पात्रा यांनी सांगितले.


याचबरोबर पत्रामध्ये 'अराजकता' या शब्दाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला असून याचा गुजरात प्रमाणेच येत्या निवडणुकांमध्ये देखील कॉंग्रेसला फायदा होईल, असे यात लिहिण्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष सत्तेसाठी आता कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचे स्पष्टीकरण स्वतः कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच द्यावे, असे थेट आवाहन देखील पात्रा यांनी दिले आहे.

संपूर्ण जगात 'भारतविरोधी' वातावरण पसरवा  

दरम्यान पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या आणखी एका मुद्द्यावर पात्रा यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. पत्रामध्ये रोना विल्सन यांना परदेशातील काही कॉम्रेड नेत्यांशी संपर्क करून कोरेगाव-भीमा येथील दंगलीमध्ये झालेल्या युवकाच्या मृत्यूवरून एक अजेंडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या तरुणाच्या मृत्युचा फायदा घेत परदेशातील सर्व कॉम्रेड नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'भारत विरोधी' वातावरण तयार करावे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे हे सर्व जण देशाच्या हितावरच घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप पात्रा यांनी यावेळी केला..

 
 
@@AUTHORINFO_V1@@