थांबा ! तुम्ही प्रतिक्षेत आहात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |



वसई : अनेकदा मोबाईलवर बोलताना एखाद्याचा कॉल सुरू असल्यास तुम्ही प्रतिक्षेत आहात असे नक्कीच ऐकले असेल. मात्र वैकुंठभूमीत जर आगाऊ नोंदणी करण्यास सांगितलं आणि कोणीही गेल्यास तुम्ही प्रतिक्षेत आहात असं सांगितलं तर? ही अगदी सत्य परिस्थिती आहे. वसई तालुक्यातील नालासोपारा या शहरात असलेल्या समेळपाडा येथील वैकुंठभूमीची.

 

वसई विरार महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून समेळपाडा या ठिकाणी असलेल्या वैकुंठभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मोडकळीस आलेल्या शेगड्या, भोवतालच्या तुटलेल्या लाद्या, छतांना गेलेले तडे, ढासळणा-या भिंती आणि गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद पडलेली विद्युतदाहिनी असं काहीसं चित्र या ठिकाणी पहायला मिळत असल्याने मानवी आयुष्यातला अखेरचा टप्पादेखील खडतर असल्याचे पालिकेच्या अनास्थेमुळे सिद्ध झाले आहे.

 

अनेकदा नगरसेवकांच्या होणाऱ्या फे ऱ्या, पालिका अधिक-यांच्या होणा-या फे-यांमध्येच ही वैकुंठभूमी अडकून राहिली आहे. अंत्यसंस्कारासाठी येणा-या व्यक्तीवर आपला जीव मुठीत धरून आपलं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे. नालासोपारा पश्चिमेला सात प्रभागांसाठी मिळून ही एकमेव वैकुंठभूमी आहे आणि त्यात केवळ दोनच शेगड्या आहेत. असे असतानाही वसई विरार महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.

 

नालासोपारा पूर्व परिसरात तुळींजजवळदेखील एक वैकुंठभूमी आहे. मात्र, वनखात्याच्या जमिनीवर ती वैकुंठभूमी असल्यामुळे त्याची अवस्था तर यापेक्षाही बिकट आहे. त्यातच पूर्व पश्चिमेकडून अनेक जण आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यसंस्कारासाठी समेळपाडा येथील वैकुंठभूमीतच जात असतात. त्यामुळे दोन शेगड्यांवर विधी सुरू असताना आणखी कोणी आल्यास त्यांना प्रतिक्षेत थांबावे लागते. तर अनेकदा यासाठी आगाऊ येऊन नोंदणीदेखील करावी लागते. नोंदणीनंतर संबंधितांना नोंदणी क्रमांक आणि वेळ दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे.

 

अनेकदा या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेकदा या ठिकाणी येणारे लोक हे विद्युतदाहिनीची मागणी करतात, मात्र, या ठिकाणी ती सोय नसल्याने अनेकदा त्यांना भाईंदर किंवा मीरारोडसारख्या ठिकाणांपर्यंत नेले जाते, असे या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले. इतकेच काय तर केवळ गॅस नसल्याने याठिकाणची विद्युतदाहिनी बंद असून आता ती चालू केल्यास इमारतीचे छतदेखील पडण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. गेल्याच आठवड्यात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबाच्यादेखत शेगडीवर छताचा भाग कोसळला होता. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. दोन शेगड्यांवर अंत्यविधी सुरू असताना नाईलाजास्तव अनेकदा आम्हाला खाली लाकडं मांडून अंत्यविधीची तयारी करावी लागते. तसेच या समस्यांविषयी पालिका कर्मचा-यांना, अधिका-यांना सांगण्यात आले असून पाहणी करण्यापुढे पानही हलले नसल्याची खंत या ठिकाणच्या कर्मचा-यांनी बोलतना व्यक्त केली. बरेचदा जास्त संख्येत अंत्यविधीसाठी लोक आल्यानंतर शेगड्यांवर पाणी टाकून ती आग शांत करण्याईतकी वाईट परिस्थिती आपल्यावर उद्भवत असल्याची खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, याबाबत वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतिश लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरात लवकर आम्ही ही गैरसोय दूर करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

कर्मचारी बिन पगारी

 

वसई-विरार महानगरपालिकेअंतर्गत येणा-या वैकुंठभूमींमध्ये काम करणारे अनेक कर्माचारी हे कंत्राटी पद्धतीवर सवेत रूजू करून घेण्यात आले आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पगार मिळाला नसल्याचे काही कामगारांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले. चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने प्रवासाचा खर्च आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा हा आमच्यासोमरचा यक्षप्रश्न असल्याचे एका कर्मचा-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 

कर्मचारीही सुविधांच्या ‘प्रतिक्षेत’

 

पगार तर सोडाच मात्र, या ठिकाणी आम्ही वापरत असलेला झाडूदेखील पालिकेने दिलेला नसून तो आम्ही आमच्या पैशाने खरेदी करत असल्याचे कर्मचारी सांगतात. तसेच याठिकाणी कर्माचा-यांना तोंडावर बांधण्यासाठी लागणारे मास्क, ग्लोज यापैकी कोणतीही सुविधा आम्हाला पुरवली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील या वैकुंठूभींची दयनीय अवस्था झाली असून पालिकेला जाग कधी येणार असा सवालही या ठिकाणचे नागरिक करत आहेत.

 

या ठिकाणी जागेचा काही वाद होता. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असून ते शुक्रवारी या ठिकाणी भेट देतील. तसेच आम्ही विद्युतदाहिनीचा वापर करण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, त्याचा वापर होत नसल्याने ती बंद अवस्थेत आहे. कर्मचा-यांच्या पगाराबाबतही आम्ही विचारणा करून हे काय प्रकरण आहे, ते नक्की पडताळून पाहू.

-सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार मनपा.

@@AUTHORINFO_V1@@