तीर्थाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 
 
मथुरेतील कृष्णजन्माच्या ठिकाणी बांधलेली मशीदही त्यांनी पाहिली असणार. या ठिकाणांच्या श्रीकृष्णाच्या बाललीला त्यांना आठवल्या असतील.

वयाच्या चोविसाव्या वर्षी रामदासांनी तीर्थाटनासाठी नाशिक सोडले. त्यावेळी इ. स. १६३२ हे वर्ष चालू होते. ते प्रथम काशीक्षेत्री गेले. हिंदूंच्या दृष्टीने काशीयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करावी, असा विचार त्याकाळी समाजात दृढ होता. काशीक्षेत्री गंगेचा प्रशस्त आणि प्रसन्न घाट, काशीविश्वेश्वराचे भव्य मंदिर व आसपास अनेक देव-देवतांची देवालये होती. पूर्वी तेथे अनेक ऋषिमुनींनी तप केले होते. त्यांनी पावन झालेली ती पवित्र भूमी होती. म्हणून समर्थांनी प्रथम काशीक्षेत्र गाठले. काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी कर्मकांडांचा बुजबुजाट पाहिला. असं म्हणतात की, पुजार्‍यांच्या कर्मठपणामुळे तेथील एका देवालयात स्वामींना प्रवेश नाकारण्यात आला होता. काशीला गेल्यावर तेथून त्रिस्थळी यात्रा करावी, असा संकेत आहे. म्हणून समर्थ प्रयाग व गया येथे जाऊन काशीला परत आले. तेथे एका घाटाचे नाव हनुमानघाट होते. स्वामींनी तेथील लोकांना विचारले, “येथील हनुमान कोठे आहे?” कोणाला काही सांगता येईना. तेव्हा स्वामींनींच त्या घाटावर हनुमानाची स्थापना केली. तेथून ते अयोध्येला गेले. अयोध्या म्हणजे त्यांचे आराध्यदैवत. श्रीरामाची ती जन्मभूमी. प्रवासात तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ एका स्थळी न थांबणारे रामदासस्वामी अयोध्येस मात्र अकरा महिने राहिले. अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागी त्यांनी बाबरी मशीद नक्कीच पाहिली असणार. अयोध्येस अकरा महिने थांबण्यामागे समर्थांचा काय उद्देश होता, याचा अंदाज करता येत नाही. तेथे मुसलमानी सत्ता होती. काळ मोठा कठीण होता. सर्वच बाबतीत गुप्तता पाळावी लागत होती. समर्थांच्या या काळातील गाठीभेटी, चर्चा, हकिगती यांची कोठे नोंद झाली असली, तर या गोष्टींचा उलगडा झाला असता. तेथून स्वामी पुढे मथुरा, वृंदावन व गोकुळ या स्थळांना भेटी देत निघाले. तेथून ते प्रभासपट्टम्ला गेले. याच ठिकाणी श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवले होते. पुढे स्वामी द्वारकेला गेले. द्वारकेला त्यांनी मारुतीची स्थापना केली.

नंतर स्वामी बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्री, हरिद्वार या स्थळांना भेटी देत, काश्मीरातून भ्रमंती करत पूर्वेकडे जगन्नाथपुरीला आले. तत्पूर्वी ते मानसरोवरापर्यंत जाऊन आले असावे, असा एक कयास आहे, पण त्याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. जगन्नाथपुरीला रामाची स्थापना करून, ते दक्षिणेकडे रामेश्‍वरम्ला गेले. रामेश्‍वराचे दर्शन घेऊन, धनुष्कोडीमार्गे सेतुबंध पाहत, ते श्रीलंकेत जाऊन आले. त्यावेळी मदोन्मत्त रावणाच्या राज्यातील हनुमानाचा पराक्रम त्यांना आठवत होता. नंतर दक्षिणेकडील तिरुपती, शिवकांची, विष्णुकांची, मदुराई, पक्षितीर्थम् इत्यादी तीर्थक्षेत्रे पाहत किष्किंधा, पंपासरोवर, गोकर्ण महाबळेश्वर करीत करवीरक्षेत्री (कोल्हापूर) आले. तेथून पश्‍चिम मार्गाने भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर तीर्थांना भेटी देऊन, इ.स. १६४४ ला नाशिकला परत आले. रामरायाच्या दर्शनाने त्यांच्या बारा वर्षांच्या तीर्थयात्रेची सांगता झाली.

समर्थांनी बारा वर्षे पायी फिरून, उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील मनाने सारा हिंदुस्थान पाहिला. तत्कालीन राजकीय स्थिती, लोकस्थिती, समाजस्थिती, सांस्कृतिक पडझड अनुभवली. त्याचा विलक्षण परिणाम त्यांच्या विचारांवर झाला. त्यांचे पुढील आयुष्य बदलून गेले. देशभर धार्मिक, सांस्कृतिक अधःपतन पाहून, त्यांचे अंतःकरण उद्विग्न झाले. याबाबत समर्थ वाङ्मयाचे गाढे अभ्यासक शं. श्री. देव यांचा अभिप्राय बोलका आहे. त्यांच्या ‘समर्थावतार’ या ग्रंथात ते लिहितात, ‘याप्रमाणे तीर्थाटनाच्या काळात स्वतः पाहून, तसेच लोकांच्या तोंडून ऐकून, देशस्थितीच्या अवनत स्वरूपाचा जो बोध त्यांना झाला, तो बोध किंवा प्रत्ययच त्यांच्या पुढील चरित्राचा पाया होय, असे मी मानतो.’ तसेच समर्थचरित्रकार आळतेकरांनीही असेच मत त्यांच्या ग्रंथात मांडले आहे. ते लिहितात, ‘समर्थांनी बारा वर्षे तीर्थयात्रेत घालवली, त्यावेळी त्यांनी तत्कालीन लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले होते. तत्कालीन धार्मिक, सामाजिक, राजकीय स्थिती पाहून, त्यायोगे त्यांच्या नैसर्गिक अध्यात्मिक प्रवृत्तीचा बराच कल व्यावहारिक प्रवृत्तीकडे वळला’

यात्रेतील सर्व तीर्थक्षेत्रांचा संदर्भ पाहिल्यावर रामदासांनी हिंदुस्थानच्या उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण दिशांना मार्गक्रमण केले. तेथील लोकस्थिती, सांस्कृतिक अवस्था पाहिली, तर याची कल्पना येते. त्या काळची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी तपासली, तर त्यावेळी उत्तरेकडे शाहजहानची सत्ता होती. ती सर्वत्र पसरविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. दख्खनची सुभेदारी हिंदुद्वेष्ट्या व महाराष्ट्रद्वेष्ट्या औरंगजेबाकडे होती. सर्व हिंदू समाज अहिंदू शासनयंत्रणेखाली या न त्या प्रकारे चिरडला जात होता. नर्मदेच्या उत्तरेस मोगल पातशाहीचा धुमाकूळ चालला होता. तर नर्मदेच्या दक्षिणेस आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बीदरशाही व इमादशाही ही बहामनी राज्याची झालेली पाच शकले हुकुमत गाजवीत होती. विजयनगर हे एकमेव हिंदू साम्राज्य त्याला अपवाद, पण तेही विध्वंसाला बळी पडले. वरील पाच मुसलमान शाह्यांनी धर्माच्या नावावर एकत्र येऊन, तालिकोटच्या लढाईत हे विजयनगरचे एकमेव हिंदू साम्राज्य नष्ट केले. त्या लढाईनंतर हे विध्वंसक शाह विजयनगरचे वैभव सहा महिने लुटून नेत होते.

तीर्थाटनाला निघण्यापूर्वी या ऐतिहासिक वार्ता रामदासांच्या कानावर गेल्या असतील. रामदासांसारख्या विलक्षण बुद्धीच्या माणसाने अध्यात्मग्रंथांच्या अभ्यासाबरोबर या ऐतिहासिक घटनाही जाणून घेतल्या असतील. त्यामुळे तीर्थाटनाला निघताना त्यांच्या मनात नेमके काय चालले होते, याचा अंदाज करणे कठीण आहे. हिंदूंची अवनती, मुसलमानांच्या विध्वंसक धाडी हे सारे आतून त्यांना छळत असणार. कदाचित त्यामुळे सज्जनांच्या संघटनांची योजना त्यांच्या मनात आली असावी. त्याची सुरुवात तीर्थाटनात झाली असावी, असे वाटते. समाजसंघटन रामदासांनी केव्हा सुरू केले, हा एक संशोधनाचा विषय आहे. धर्म, संस्कृती यांची पडझड, मुसलमानी विध्वंसकांनी निर्माण केलेले भग्नावशेष रामदासांनी पाहिले असतील. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न पुढील भागात करणार आहे.

सुरेश जाखडी

मो. 7738778322

@@AUTHORINFO_V1@@