कडोंमपा कचरा निर्मूलनाच्या प्रदर्शनात व्यस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |



डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कचरा निर्मूलनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, पण कडोंमपा मात्र प्रदर्शनात व्यस्त असून, शहरातील कचर्‍याचे चित्र ‘जैसे-थे‘ दिसून येते.

सन २०१७ च्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहराचा 234 क्रमांक लागताच, महापालिकेच्या वतीने नवनवीन उपक्रमांची सरबत्ती लावण्यात आली.

कडोंमपा हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजनाअभावी तीन तेरा वाजले आहेत. आधारवाडी डम्पिंगचा प्रश्नही गंभीर आहे. असे असताना कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही. केडीएमसीने दोन वर्षांत कॉल ऑन डेब्रिज, प्लास्टिकबंदी, ओला सुका कचरा वर्गीकरण, शून्य कचरा मोहीम, कचराकुंडीमुक्त शहर, अशा अनेक मोहिमा राबिविण्यात आल्या, पण या सर्व अभियानांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पालिकेच्या वतीने ’स्वच्छ सर्वेक्षण अ‍ॅप’चा घाट घालण्यात आला व नागरिकांकडून शहर स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यात आले. यानंतर नुकतेच उपकरणे व यंत्रणेद्वारे कचर्‍याचे निर्मूलन होऊ शकते. याबाबत कडोंमपाने मागील आठवड्यात कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रदर्शनाचे आयोजन केले होते, तरी मात्र शहरतील रोज उचलला जाणार्‍या कचर्‍याबाबत महापालिकेचे योग्य ते नियोजन नसल्याचा रोष मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली पूर्व असो पश्चिम असो, या ग्रामीण विभाग शहरात दुपारपर्यंत कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत असतात, यासाठी नियोजना बाबत लोकप्रतिनिधी कायम पाठपुरावा करत असतात, पण पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते. मोठमोठी गृहसंकुले, स्टेशन परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी असणार्‍या कचराकुंड्या कायमच भरून दिसतात. याच धर्तीवर कदम यांनी नेहरू रोड, पाथर्ली रोड, टंडन रोड या प्रमुख रस्त्यांवरील कचराकुंड्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले.

दरवर्षी ये रे माझ्या मागल्या

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून दरवर्षी कचरा प्रश्नावर तीच तीच कारणे देण्यात येतात. मग महापालिकेचे पदाधिकारी पगार घेऊन, याबाबत नियोजन का करत नाहीत, तर त्यांचा त्या पदावर बसण्याचा फायदा काय असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला. गेली कित्येक वर्षे हे चित्र काही केल्या बदलत नाही. यामुळे दरवर्षी पावसाळ्या दरम्यान सामान्य नागरिकांना साथीच्या रोगाला सामोरे जावे लागते. नुकताच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, असे काही झाल्यास नागरिकांनी करायचे काय? दोन ते तीन दिवस या कामासाठी पालिकेला वेळ देण्यात येईल, यानंतर ’मनसे स्टाईल’ने काम केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

’अ’ प्रभाग क्षेत्रात कचरार्‍याचे साम्राज्य

टिटवाळ्यासह ’अ’ प्रभागक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने सर्वत्रच कचरा, डास आणि दुर्गंधी पसरलेली दिसत आहे. मांडा पश्चिम परिसरातील गोदावरी अपार्टमेंट, वसुंदरी रोड, जानकी विद्यालय, बालाजी कॉलनी या विभागात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र कचरा साठलेला दिसत आहे. तर टिटवाळा महागणपती मंदिर परिसर, हरी ओम व्हॅली येथेदेखील तीच परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

5 जून हा जागतिक पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर शासन तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून पर्यावरणाचे विषयक जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले गेले. मात्र ’अ’ प्रभाग क्षेत्रांतर्गत असलेल्या टिटवाळ्यासह ठिकठिकाणी जमलेले कचर्‍याचे ढीग, तुडुंब भरून वाहणार्‍या कचराकुंड्या आणि गटारे यामुळे अन्य परिसरात पर्यावरणाच्या नावाने बोंब असल्याची परिस्थती निदर्शनास आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@