एका अनावश्यक वादाची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018
Total Views |

 

 
 
सरसंघचालकांनी आपल्या अलंकारिक आणि ओघवत्या भाषणात जे सांगितले त्याचा आणि प्रणवदांच्या भाषणाचा भावार्थ काही फारसा निराळा नव्हता. हे ज्यांना कळले त्यांना संघ समजला अन्यथा हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट आपल्या संगळ्यांना ठाऊक आहेच.
 

१७ जून १९९६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन झाले होते. बाळासाहेबांचे निधन झाले तेव्हा संघांची एकाहत्तरी होती. अमृत महोत्सवाला दोन चार वर्षे इकडे तिकडे. बाळासाहेब देवरसांनी सरसंघचालक म्हणून काम करताना काही कमी आव्हानांचा सामना केला नव्हता. इंदिराबाईंची आणीबाणी, रामजन्मभूमीचे आंदोलन ही आणि अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. बाळासाहेबांच्या निधनानंतर बरोब्बर दोन वर्षांनी अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले होते. म्हणजेच ज्या विचारसरणीला इतकी वर्षे अनुल्लेखाने मारले गेले, त्याच विचारसरणीचा एक पाईक या देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला होता. किंबहुना जनमानसात इतका स्वीकार संघाला प्राप्त झाला होता. हा सगळा तपशील अशा घटनाक्रमात पुन्हा मांडण्याचे कारण म्हणजे बाळासाहेब देवरस ज्यावेळी गेले त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या देशातील सर्वात मोठ्या दैनिकाने आपल्या पहिल्या पानावर सर्वात लहानशी बातमी दिली होती. पत्रकारितेच्या भाषेत ज्याला ‘सिंगल कॉलम’ असे म्हणतात, त्यापेक्षाही ही लहान बातमी होती. माध्यमांचा संघाविषयीचा दृष्टिकोन कसा होता, याचे हे उदाहरण म्हणून पाहावे लागेल. तो दिवस आणि आजचा दिवस यात किती फरक आहे. हे ठरवता येईल अशी आजची स्थिती आहे.

 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रा. स्व. संघाच्या तृतीय वर्षाच्या वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आणि देशातले सर्वच प्रश्न संपले असल्याचा आव आणत, देशातल्या माध्यमांनी काथ्याकूट सुरू केला. संघ आणि संघात घडणाऱ्या घटनाक्रमांवर हल्ली माध्यमे बारकाईने लक्ष ठेवून असतात. काहीही झालं तरीही माध्यमांची घोकंपट्टी सुरू होते. यात सगळेच संघाचा द्वेष करणारे नसले, तरी बहुसंख्य मात्र तसेच आहेत. भारताच्या माध्यमाविश्वाला एक सवय आहे. किंबहुना जगभरातच असे घडत असावे. कुठल्याही गोष्टीचे ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचे काम ही मंडळी करतात. गुजरात दंगलींनतर नरेंद्र मोदींबाबत असा काही नॅरेटिव्ह सेट केला गेला होता, ज्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांत नरेंद्र मोदींची प्रतिमा एक खूनी म्हणून रंगविण्यात या मंडळींना चांगलेच यश आले होते. या प्रोपोगेंडाचा प्रभाव इतका होता, नरेंद्र मोदींसारख्या एका लोकनियुक्त मुख्यमंत्र्याचा व्हिसा नाकारण्यापर्यंत अमेरिकेची मजल गेली होती. याचा असुरी आनंद ल्युटन्स दिल्लीत कसा साजरा केला गेला, याची उदाहरणे दिली जातात. प्रणव मुखर्जींनी तृतीय वर्षाला यायचे मान्य केल्यानंतर हाच डाव पुन्हा खेळण्यात आला. फरक एवढाच की प्रणव मुखर्जी त्याला बधले नाहीत. प्रणव मुखर्जी एक मोठी राजकीय कारकीर्द पार केलेले नेते आहेत. आपण काय करत आहोत, याची पूर्ण समज त्यांना आहे. असे अजेंडा सेट करण्याचा खेळात वस्ताद असलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. आपण काय करत आहोत आणि त्याचे माध्यमांत काय परिणाम घडू शकतात, याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. देशाचे सर्वोच्च पद मिळविल्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात यापेक्षा मोठे म्हणून मिळविण्यासारखे काही नाही. असे असताना त्यांच्यावर काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी जे आरोप केले ते त्यांच्या अल्पमतीचीच साक्ष नेणारे होते. अत्यंत ठामपणे प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर आले, सर्वमान्य होतील असे विचार त्यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 

 

खरे तर सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणात जी सहजता दाखविली आणि ज्या सहजपणे त्यांनी प्रणवदांना आपण दिलेल्या निमंत्रणाचे कथन केले, त्यातच सगळा खरेपणा सामावला होता. अत्यंत प्रांजळ व स्वच्छ पद्धतीने झालेल्या संवादामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता. स्वत:ला भारतमातेचा सुपुत्र मानणारा कुणीही संघाला परका नाही. राजनैतिक मतप्रवाह निरनिराळे असले, तरीही आपण सगळे भारतमातेचेच पुत्र आहोत. इतक्या साध्या आणि सोप्या शब्दांत त्यांनी माध्यमात आणि राजकीय अवकाशात चाललेल्या काथ्याकूटाला तिलांजली दिली. ही इतकी साधी घटना! मात्र याचवेळी काँग्रेस आणि काही संघद्वेषाची कावीळ झालेल्या पत्रकारांनी यामागचा राजकीय मथितार्थ शोधण्याचा फुकटचा प्रयोग चालविला होता. काँग्रेसने नथुराम गोडसेचा जुना कोळसा पुन्हा उगाळला, तर वाहिन्यांवर यातून काय होणार याचे दळण दळायचे उद्योग चालू होते. एखादी घटना अनावश्यकरीत्या कशी चघळायची याची प्रात्यक्षिके आठवडाभर चालली होती.
 
 
प्रणव मुखर्जी संघाच्या तृतीय वर्षाच्या कार्यक्रमाला आले यात बातमीमूल्य नक्कीच होते, मात्र त्यामागच्या राजकारणाचा शोध घेण्याची आणि संघाला अस्पृश्य ठरविण्यासाठी जो काही आकांडतांडव करण्यात आला, तो पारंपरिक माध्यमांच्या अपरिपक्वतेचा परिचय देणाराच होता. पारंपरिक माध्यमांची जागा आता मुक्तमाध्यमे घेऊ लागली आहेत. ती पारंपरिक माध्यमे असे तारतम्य सोडून वागतात म्हणूनच. काल नागपूरच्या बाबतीतही तेच झाले. संघाच्या कामाचा मूलाधार सरसंघचालकांनी इतक्या सोप्या शब्दांत मांडल्यानंतर खरे तर या सगळ्याचा गोड शेवट व्हायला हवा होता, मात्र त्यानंरतही संघाची विचारसरणी, गांधींजींची हत्या, संघाच्या भूमिका यावर त्याच प्रकारे तेच रिकामटेकडे लोक गोळा करून, चर्चा होतच राहिली. प्रणवदा वक्ते म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांच्या नेहमीच्या शैलीतच त्यांनी आपले भाषण केले, मात्र सरसंघचालकांनी आपल्या अलंकारिक आणि ओघवत्या भाषणात जे सांगितले, त्याचा आणि प्रणवदांच्या भाषणाचा भावार्थ काही फारसा निराळा नव्हता, हे ज्यांना कळले त्यांना संघ समजला, अन्यथा हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.
 
@@AUTHORINFO_V1@@