अनंत आमुची ध्येयासक्ती किनारा तुला पामराला..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2018   
Total Views |

 


अंतरराष्ट्रीय संस्थेची मोठ्या पगाराची नोकरी सोडून डॉ. अभिजीत भिकाऱ्यांची आरोग्यसेवा करू लागले. त्यातूनच भिकारी ते उद्योजक हि यशस्वी संकल्पना साकारली. त्या संकल्पनेचा वेगळा प्रवास..
 

साध्या पावलाचा ठसा उमटवायचा असेल, तरी आधी पावलं चिखलात बुडवायला हवीत. स्वतःच्या काळजीत जगणारा जागरण करतो, तर दुसऱ्यांच्या चिंतेत जगणारा जागृत असतो. तू बघ तुला काय करायचे आहे. कधीकाळी क्लास दोन ऑफिसर असलेले, पण आज परिस्थितीमुळे मंदिरामध्ये भीक मागण्याची पाळी आलेले बाबा डॉ. अभिजीत सोनवणेंना सांगत होते. त्यावेळी डॉ. अभिजीत कठीण कालखंडातून जात होते. निराशा, उद्वेग, अपेक्षाभंग, उपेक्षा या साऱ्यांनीच डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या मनात पिंगा घातला होता.

 

मूळचे साताऱ्याचे आणि आताचे पुण्यात असलेले सोनवणे कुटुंब. आपल्या आईबाबांनी आपल्याला डॉक्टर बनवण्यासाठी खूप कष्ट केले. आता आपण आपल्या पायावर उभे राहावे या विचाराने अभिजीत रक्ताचे पाणी करत होते, पण यश मिळालेच नाही. तीनवेळा दवाखाना काही ना काही कारणास्तव बंद करावा लागला. यातच अभिजीतचा प्रेमविवाह झाला. जबाबदारी वाढली. पैसे कमावणे गरजेचे होते. पण कितीही हातपाय हलवले, तरी पोटापुरतेही पैसे मिळत नव्हते. अपयश, निराशा, अपयश, निराशा असा पाठशिवणीचा खेळ सुरूच. काय करावे? खून करावा? चोरी करावी? काहीही करून पैसे कमवावे. डॉ. अभिजीत यांच्या मनात वाईट विचार येऊ लागले. एका भणंग दुपारी भणंग मनस्थितीत ते मंदिरात येऊन रडू लागले. तिथे भिक्षा मागत बसलेल्या या कधीकाळी क्लास दोन ऑफिसर असलेल्या भिकारी बाबांनी अभिजितशी स्वतःहून संवाद साधला. त्याला आपल्या भिक्षेतले चांगले अन्न खायला दिले. इतकेच नाही तर भीक मागून, जमलेल्या पैशातून काही पैसेही मदतीखातर दिले. या भिक्षुक बाबांशी बोलून, डॉ. अभिजीतच्या मनातली निराशा दूर गेली.

 

पुढे डॉ. अभिजीत आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये कामाला लागले. महिन्याला दोन लाख रुपये पगार. स्थैर्य, सुबत्ता, सुखं दारात घरात झुलत होती, पण डॉ. अभिजीतना चैन पडत नव्हती. मला वेळेला हिशोबी दोन शब्द सांगणारे ते बाबा लौकिक अर्थाने भिकारी होते, पण त्यांनी मला आयुष्याचा अर्थ सांगितला. त्या बाबांसारखे कितीतरी भिकारी असतात. त्यांची कहाणी काय असेल? मला त्यांच्यासाठी जमेल तसे काही तरी करायलाच हवे.

 

या विचारांनी झपाटलेल्या डॉ. अभिजीत सोनवणेंचे त्यानंतर आयुष्यच पालटले. डॉक्टर फॉर बेगर्स असे त्यांच्या जीवनाचे स्वरूप झाले. डॉ. अभिजीत यांनी विचार केला, भिकारी काय जन्मतःच भिकारी असतील? त्यांची कहाणी काय असेल? त्यांना पुन्हा मूळ समाजप्रवाहात आणायला हवे. डॉ. अभिजीतने लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या मंदिरात आणि शुक्रवारी मशिदीसमोर, रविवारी चर्चसमोर असेच भिकारी बसलेले असतात. डॉ. अभिजीतने डॉक्टरी आयुधांनी भरलेली आपली बॅग घेतली आणि ते भिकाऱ्यांच्या गर्दीत मिसळले. दररोज दुपारी ११ ते २ डॉ. अभिजीत भीक मागणाऱ्या वृद्धांची आरोग्य तपासणी करू लागले. नुसती आरोग्याची तपासणी नाही, तर मनाची तपासणीही करू लागले. रस्त्यावर किड्यामुंग्यांसारखे जगणारे हे वृद्ध त्यांच्या भूतकाळात काहीतरी चांगले असेलच ना? या वृद्धांना पुन्हा मनाने उभं करणं हे काम अभिजीत करू लागले. हळू हळू लोक स्वतःहून अभिजीतच्या कार्याचे कौतुक करू लागले. डॉ. अभिजीत येथेच थांबले नाहीत, तर या भीक मागणाऱ्या स्नेह्यांना त्यांनी स्वावलंबनाची मूलमंत्र दिला. वयाने ज्येष्ठ असलेल्या भिक्षा मागणाऱ्या ३७ व्यक्तींना डॉ. अभिजित यांनी उद्योजक बनवले. भिकारी ते उद्योजक असा या ३७ व्यक्तींचा जीवनप्रवास खूप काही सांगून जातो. स्वतःचे जीवनमूल्य ठरवून, सगळ्याच बाबतीत वंचित असलेल्या लोकांसाठी जगायचे या ध्येयाने प्रत्येक क्षण जगणाऱ्या डॉ. अभिजीत यांचे माणूसपण महत्त्वपूर्ण आहे. कारण स्वतःपुरता ठरलेले जगणे स्वतःच्या हातातच असते, पण आपले ध्येय दुसऱ्याच्या आयुष्याचेही ध्येय बनवणे ही किमया हे मोठेपण सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. डॉ. अभिजित याबाबत श्रीमंत आहेत. कारण डॉ. अभिजीत यांच्या कामाने प्रेरित होऊन, पाच हजार व्यक्तींनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले आहे की आयुष्यात एका तरी भिक्षुकाला उद्योजक बनवायचेच.

 

डॉ. अभिजीत यांचे स्वप्न आहे की निदान ते जिथे राहतात तिथे भिकारी वाढू नयेत, किंबहूना ती प्रवृत्तीच नाहीशी व्हावी. स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी ‘सोहम ट्रस्ट’ निर्माण केली. ‘सोहम ट्रस्ट’ची वेबसाईटही आहे. त्या साईटवरचा मजूकर वाचला की संवेदनशील व्यक्ती प्रेरित झाल्याशिवाय राहत नाही आणि अंसवेदनशील व्यक्ती संवेदनशील झाल्याशिवाय राहणार नाही. तनमनधनाने भिकाऱ्याच्या आयुष्याला सर्वार्थाने समृद्ध करणार्‍या अभिजीतच्या माणुसकीचे कंगोरे त्यांच्या प्रतिभासंपन्न लेखांतूनही जाणवते. अर्थात मनात आणि जगण्यात उमटलेलेच लिहिण्यात आले आहे म्हणूनही असेल.

 

डॉ. अभिजित त्यांच्या कार्याला समर्थन देणाऱ्या, साथ देणार्‍या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार मानून, म्हणतात मी काहीच करत नाही. समाजाने मला दिले मी थोडेफार परत करतो इतकेच. डॉक्टर हा पेशा नाही, तर प्रवृत्ती आहे. एखाद्याच्या शरीराचा उपचार करण्यासोबतच त्याच्या मनाचा आणि जमेल तितका आयुष्याचा उपचार करणे हे ध्येय आहे. डॉ. अभिजीत सोनावणे यांचे जगणे म्हणजे अनंत आमुची ध्येयासक्ती किनारा तुला पामराला..

@@AUTHORINFO_V1@@