भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत समर्थ : निर्मला सीतारामन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून पाकिस्तानला समज 




नवी दिल्ली :
'सैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची पूर्ण मोकळीक भारत सरकारने सैनिकांना दिलेली आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की, भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे, असे प्रतिपादन भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. 

पाकिस्तानकडून वारंवारपणे करण्यात येत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून सीतारामन यांनी पाकिस्तानला यावेळी चांगलीच समज दिली. 'भारत हा शस्त्रसंधीचा मान राखत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही कि, कोणी विनाकारण भारतावर हल्ला केल्यास तो शांतपणे सहन केला जाईल. भारत जरी कोणावरही स्वतःहून हल्ला करत नसला तरी विनाकारण आपल्यावर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे. हल्ला करणाऱ्या शत्रूविरोधात कारवाई करण्यासाठी सैनिकांना पूर्ण मोकळीक दिली गेलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, असे सीतारामन यांनी म्हटले.

रमजान महिन्याच्या सुरुवातीला भारत सरकारने काश्मीरमध्ये एकतर्फी युद्धबंदी घोषित केली आहे. भारत सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तान सैनिकांकडून सीमेवर वारंवारपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यावर भारताने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या एका ठोस कारवाईनंतर पाकिस्तान सेनाधिकाऱ्यांनी भारतासमोर गुडघे टेकत, पाकिस्तान शस्त्रसंधी करार पाळण्यास तयार असल्याचे कबुल केले होते. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतीय जवानांवर गोळीबार केला होता. यामध्ये दोन भारतीय जवान शहीद झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@