प्रणवदा, तुमचे स्वागत आहे! -डॉ. मनमोहन वैद्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी, मुख्य अतिथी म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. यामुळे देशाच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजलेली दिसून येते. डॉ. मुखर्जी एक अनुभवी आणि परिपक्व राजकीय नेता आहेत. अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर त्यांचे निश्‍चित असे विचार आहेत. संघाने त्यांचा अनुभव आणि परिपक्वता ध्यानात घेऊनच त्यांना आपले विचार स्वयंसेवकांसमक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केले आहे. तिथे ते देखील संघाचे विचार ऐकतील, शिक्षार्थ्यांशी देखील त्यांचे प्रत्यक्ष भेटणे होणार आहे. यामुळे त्यांनाही संघाला थेट समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विचारांचे असे आदानप्रदान ही भारताची प्राचीन परंपराच आहे.
 
 
मग या गोष्टीला एवढा विरोध का म्हणून होत आहे? विरोध करणार्‍यांचे वैचारिक कुळ आणि मूळ बघितले तर या विरोधाचे आश्‍चर्य वाटणार नाही. भारताचे वैचारिक विश्‍व, पूर्णत: अभारतीय असलेल्या कम्युनिस्ट विचारांच्या कुळातील आणि मुळातील लोकांनी प्रभावित आहे. त्यामुळे त्यांच्यात आत्यंतिक असहिष्णुता आणि हिंसेचा मार्ग पत्करण्याची वृत्ती आहे. कम्युनिस्ट विचारांचा जगाला आलेला अनुभव हेच सांगतो. आपल्या विचारांहून वेगळ्या विचारांच्या लोकांचे म्हणणे ऐकण्यासही ही मंडळी तयार नसतात. एवढेच नाही तर असे करणार्‍यांचा ते पूर्ण शक्तिनिशी विरोधही करतात. तुम्ही कम्युनिस्ट म्हणजे डाव्या विचारांचे नाहीत, म्हणजे तुम्ही उजव्या विचारांचेच असले पाहिजे, असा या मंडळींचा ‘निर्णय’ असतो आणि त्यामुळे तुमचा निषेध करणे, तुमचा आवाज दडपणे, तुमची निंदा करणे हीच तुमची लायकी असते. तुम्ही कम्युनिस्ट म्हणजेच डाव्या विचारसरणीचे नाहीत, म्हणून तुमचे म्हणणे ऐकूनही न घेता ते तुमचा हरप्रकारे विरोधच करतील. ही कम्युनिस्ट परंपराच आहे. असे असूनही ही मंडळी उदारता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे दाखले देताना थकत नाहीत. विनाकारण खोटे बोलणे आणि दांभिकता यांच्या रक्तबीजातच (डीएनए) आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी, तृतीय वर्षाच्या अशाच एका समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध समाजसेवक आणि सर्वोदयी विचारवंत डॉ. अभय बंग आले होते. महाराष्ट्रातील सर्व कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारवंतांनी, संघाचे निमंत्रण स्वीकारले म्हणून डॉ. बंग यांचा विरोध केला होता. समाजवादी विचारांच्या पुण्याहून प्रकाशित होणार्‍या ‘साधना’ साप्ताहिकात, डॉ. बंग यांच्या विरोधात बरेच लेखही प्रकाशित झाले होते. डॉ. बंग यांचे म्हणणे होते की, मी तिथे जाऊन माझे स्वत:चेच विचार मांडणार आहे. असे असतानाही हा आक्षेप आणि विरोध का? सर्वोदयाशी माझा असलेला संबंध जाणूनही संघाचे लोक मला बोलवित आहेत, यातून संघाची उदारताच दिसत आहे आणि उदारतेचे दाखले देणार्‍या आमच्या समाजवादी विचारांच्या मित्रांची मात्र वैचारिक संकुचित वृत्ती यातून उघड होत आहे. प्रचंड विरोधानंतरही डॉ. बंग संघाच्या कार्यक्रमाला आले. त्यांनी आपले भाषण लेख स्वरूपात ‘साधना’ साप्ताहिकात प्रकाशित करण्यासाठी पाठविले. कारण, या साप्ताहिकात त्यांच्या विरुद्ध बरेच लेख प्रकाशित झाले होते. परंतु, ‘साधना’च्या संपादकांनी डॉ. अभय बंग यांचा लेख प्रकाशित केला नाही.
 
कम्युनिस्ट आणि त्यांच्या छत्रीखालील मंडळी, विचारांच्या आदानप्रदानावर विश्‍वासच ठेवत नाहीत. कारण आपल्या विचारांशी कुणी असहमत असलेले ते सहनच करू शकत नाहीत. केरळच्या प्रवासात कोल्लम येथे केशवन् नायर नावाच्या कम्युनिस्ट कामगार पुढार्‍याशी २०१० साली माझी भेट झाली. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात ‘वेदांमधील विज्ञान’ या विषयावर दोन लेख लिहिले होते. म्हणून त्यांना कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात कम्युनिस्टांवर अनेक लेख लिहिलेत आणि त्याचे ‘बियॉण्ड रेड’ नावाने पुस्तकही प्रकाशित केले. ते त्यांनी मला भेट दिले. या पुस्तकाच्या आवरणावर त्यांनी एक वाक्य लिहिले आहे- ‘कम्युनिझम तुम्हाला केवळ एक स्वातंत्र्य देतो आणि ते म्हणजे त्यांची प्रशंसा करण्याचे स्वातंत्र्य!’ अशा लोकांकडून, तथाकथित विचारवंतांकडून विचारांच्या आदानप्रदानाची आपण आशा कशी ठेवणार?
 
 
पश्‍चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट सरकार होते तेव्हा संघाचा प्रचार प्रमुख या नात्याने कोलकाता येथे जाणे झाले. तेथील पाच प्रमुख वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत अनौपचारिक गप्पांचा आणि परिचयाचा कार्यक्रम ठेवला होता. स्टेट्‌समन, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, वर्तमान आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या एका वृत्तपत्राच्या संपादकांशी भेटण्याचा प्रयत्न केला. कम्युनिस्ट विचाराचे वृत्तपत्र सोडून इतर सर्व संपादकांनी वेळ दिला आणि चांगली चर्चाही झाली. या सर्वांनी संघाच्या विचारांशी सहमत व्हावे अशी आमची अपेक्षाही नव्हती, परंतु त्यांनी संघाचा विचार जाणून घेण्यास वेळ दिला. केवळ कम्युनिस्ट विचाराच्या वृत्रपत्राच्या संपादकांनी, ‘मला माझा वेळ व्यर्थ खर्च करायचा नाही’ असे म्हणून भेट नाकारली. ही आहे यांची समजदारी, उदारता आणि लोकशाही व्यवहार! मी संघ कार्यकर्त्यांना सांगितले की, ही वृत्ती पूर्णपणे अलोकशाहीची आहे. म्हणून मी ज्या ज्या वेळी कोलकात्याला येईल, त्या प्रत्येक वेळी या संपादकांना भेटीची वेळ मागावी.
 
 
जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये दत्तात्रेय होसबळे आणि मला संघाचे विचार मांडण्यासाठी निमंत्रण मिळाले. आम्ही जाण्याचा निर्णयही घेतला. तिथेही, ज्याचा कार्य, विस्तार आणि प्रभाव भारतीय समाजजीवनात सातत्याने वाढताना दिसत आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपले विचार ठेवण्यालाही कम्युनिस्ट मुळाच्या तथाकथित विचारवंतांनी कडवा विरोध केला. सीताराम येचुरी आणि एम. ए. बेबी सारख्या लोकांनी त्या फेस्टिवलवर बहिष्कार टाकला. कारण काय? तर तिथे संघाला आपले विचार मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे म्हणून! ज्या संघाच्या विचाराला भारताच्या सर्व राज्यांतील लोक स्वीकारत आहोत, समर्थन देत आहेत, सहभागी होत आहेत, त्या विचाराला मांडण्याची, समजून घेण्याची देखील संधी देता कामा नये, ही आहे यांची उदारता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य! या मागे काय मानसिकता असेल? यांना भीती आहे की, संघाचे खरे स्वरूप जर लोकांना समजले तर कम्युनिस्टांनी संघाच्या विरुद्ध जो खोटा प्रचार केला, अज्ञान पसरविले तो पडदा दूर होईल. वास्तविकता काय आहे हे लोकांना कळेल. ही भीती आहे त्यांना. कम्युनिस्टांचे मूळ विचार आणि त्यांची ही फॅसिस्ट मनोवृत्ती पूर्णपणे अभारतीय आहे.
 
 
याच्या विपरीत एक अनुभव असाही आहे. काही वर्षांपूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे प्रतिनिधी मंडळ भारतात आले होते. त्यांनी संघाच्या लोकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी दिल्लीत होतो आणि ते झंडेवाला येथील संघ कार्यालय- केशव कुंज येथे भेटण्यास आले. मला त्यांनी चीनच्या प्रसिद्ध भिंतीचे स्मृतिचिन्ह भेट दिले. माझ्या मनात प्रश्‍न आला की हे एका राजकीय पक्षाचे लोक आहेत. भारतात येऊन विविध राजकीय पक्षांच्या लोकांना त्यांनी भेटणे समजू शकते; पण ते संघाशी का भेटत आहेत? माझ्या या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘‘आमची कार्यकर्ताआधारित पार्टी (कॅडर बेस्ड) आहे आणि आपले संघटन देखील कार्यकर्ताआधारित आहे. म्हणून आम्ही विचारांच्या आदानप्रदानासाठी आलो आहोत.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘हे तर खरेच आहे, परंतु आमच्यात आणि तुमच्यात एक मूलभूत फरक आहे. तुम्ही राज्यसत्तेसाठी आणि राज्यसत्तेच्या माध्यमातून कार्य करता आणि आम्ही ना राज्यसत्तेसाठी आणि ना ही राज्यसत्तेच्या माध्यमातून कार्य करतो. आम्ही थेट समाजासोबत आणि समाजामध्ये कार्य करतो.’’ तरीही आम्ही मोकळेपणाने भेटलो. आम्ही भेटण्यास नकार दिला नाही. ही भारतीय परंपरा आहे.
 
 
भारताच्या वैचारिक जगात कम्युनिस्ट विचारांचे वर्चस्व असल्यामुळे आणि कॉंग्रेससहित व्यक्ती/परिवारावर आधारित, प्रादेशिक तसेच जातींवर आधारित राजकीय पक्षांकडे त्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र वैचारिक चिंतकांचा दुष्काळ असल्यामुळे असेल किंवा त्यांच्या तथाकथित चिंतकांमध्ये कम्युनिस्ट मुळाचेच लोक असल्यामुळे असेल, हे सर्व पक्ष उदारतावाद, मानवता, लोकशाही, सेक्युलॅरिझम यासारखे शब्द फेकून, कम्युनिस्ट वैचारिक असहिष्णुतेचाच परिचय देत असतात. प्रणवदा संघाच्या कार्यक्रमात येण्यामुळे या सर्वांच्या वैचारिक असहिष्णुतेचे पितळ उघडे पडत आहे.
 
 
संघाचे चवथे सरसंघचालक रज्जुभय्या यांचे कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेशातील एका वरिष्ठ नेत्याशी घनिष्ठ संबंध होते. एकदा गुरुजी यांच्या प्रयाग दौर्‍याच्या वेळी प्रतिष्ठित नागरिकांसोबत चहापानाच्या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण देण्यात आले. ते रज्जुभय्या यांना म्हणाले की, मला यावेसे वाटते, पण मी येणार नाही. कारण मी तिथे गेलो तर कॉंग्रेस पक्षात माझ्याबद्दल नको ती चर्चा सुरू होईल. रज्जुभय्यांनी विचारले की, तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्याबाबतदेखील चर्चा होईल? ते म्हणाले की, राजकारण कसे असते तुम्हाला माहीत नाही. तेव्हा रज्जुभय्या म्हणाले, आमच्या संघात एकदम वेगळा विचार असतो. जर कुणा स्वयंसेवकाने मला तुमच्यासोबत बघितले तर तो माझ्याबाबत शंका घेणार नाही. उलट तो समजेल की, रज्जुभय्या तुम्हाला संघ समजावून सांगत असतील.
 
 
कॉंग्रेसच्या लोकांचा प्रणवदासारख्या स्वच्छ आणि तालेवार नेत्यावर असा विश्‍वास का नसावा? स्वत: डागाळलेले चारित्र्याचे आणि प्रणवदांच्या तुलनेत कॉंग्रेसमधील कमी अनुभवी लोक, माजी राष्ट्रपतींसारख्या परिपक्व आणि अनुभवी नेत्याला सल्ले का म्हणून देत आहेत? संघाच्या कुठल्याही स्वयंसेवकाने हे नाही विचारले की, इतक्या जुन्या कॉंग्रेसी नेत्याला आम्ही का म्हणून बोलावले? संघाची वैचारिक उदारता आणि संघाच्या टीकाकारांच्या मनातील वैचारिक संकुचितता, असहिष्णुता आणि अलोकतांत्रिकता याचा हाच फरक आहे. वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी एकत्र बसून विचारविमर्श करणे, ही भारतीय परंपरा आहे आणि अशा प्रकारची वैचारिक अस्पृश्यता बाळगणे तसेच विचारांच्या आदानप्रदानाला विरोध करणे, ही वृत्ती निश्‍चितच अभारतीय आहे.
 
 
प्रणवदांनी संघाचे आमंत्रण स्वीकारल्याने, भारताच्या राजकीय आणि वैचारिक जगतात जो वादविवाद सुरू झाला आहे, त्यामुळे अनेक तथाकथित उदार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बुरखे घातलेल्या लोकांचा खरा चेहरा उघड होत आहे. हा एक चांगला शकून आहे. या सार्‍या विरोधानंतरही प्रणवदांनी कार्यक्रमाला येण्याचे ठरविले आणि एवढेच नाही तर, या सर्वांचे उत्तर मी नागपुरातच देईल, असे ठणकावून सांगितले. प्रणवदा यांचे तसेच त्यांच्या या दृढतेचे आम्ही स्वागत करतो.
... ... ...
    
सह सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
@@AUTHORINFO_V1@@