हे पर्यावरणप्रेम नव्हे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

 
 
अनेक वाचकांना असे विपरीत शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल. कारण ’पर्यावरण दिना’ निमित्त काही लिहिताना असा नकारात्मक सूर का? असा प्रश्नट पडू शकतो, परंतु गेली अनेक वर्षे पर्यावरण स्नेह, संवर्धन, संरक्षण अशा स्वरूपाची जी वाढती कामे चालू आहेत, त्यातून ज्या गफलती होत आहेत, त्या लक्षात आणून देणे, यासाठी हा लेख आहे.
 
सुदैवाने गेली दोन दशके पर्यावरणाबद्दल आस्था बाळगणारी, जमले तर काही कृती, मदत करू इच्छिणारी मंडळी वाढत्या संख्येने दिसत आहेत. सर्वांच्या इच्छा अत्यंत प्रामणिक स्वरुपाच्या असल्याने जो तो आपापल्या परीने, विचारांनुसार काही कृती योजताना दिसतो. मात्र ज्या वेळेस यांपैकी काही कृतींंचे किंवा त्यांच्या परिणामांचे आपण पर्यावरणशास्त्रीय कसोट्यांवर मूल्यमापन करतो त्यावेळेस धक्कादायक बाबी आपल्या नजरेसमोर येतात. निसर्गाच्या मदतीऐवजी यातील बऱ्याच गोष्टी निसर्गातल्या अन्य कोणत्या ना कोणत्या घटकाची हानीच करताना आढळून येतात. आणि त्यामुळे प्रयत्न जरी प्रामाणिक असले, तरी त्यांचे परिणाम मात्र विघातक, असे काहीसे विचित्र निष्कर्ष आपल्यासमोर येतात. या लेखात अशाच काही कृतींबद्दल ऊहापोह करायचा आहे आणि म्हणूनच या लेखाला थोडे नकारात्मक किंवा चटकन बोचेल, टोचेल असे नाव द्यावेसे वाटले. यापुढची उदाहरणे अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. त्यांच्या निवडीमागे कोणताही विशिष्ट हेतू नाही. वाचकांना आपापल्या परिसरामध्ये अशा स्वरूपाची अनेक समांतर उदाहरणे आढळून येऊ शकतील.
 
आपण सुरुवात शहरांपासून करू. सध्या बहुसंख्य मोठ्या शहरांमध्ये सर्रास आढळणारे प्राणी कोणते, असा विचार केला, तर दोन नावे ठळकपणे आपल्या नजरेसमोर येतात. एक म्हणजे कबुतरे आणि दुसरे कुत्रे. या दोघांचीही संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चाललेली आपण पाहतो. अर्थात ती वाढण्यामागच्या भावना वेगवेगळ्या आहेत. कबुतरांची संख्या वाढत चालली आहे, कारण त्यामागे धार्मिक भावना आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर धान्याच्या राशी कबुतरांना खाण्यासाठी रोजच्या रोज ओतल्या जात आहेत. निसर्गामध्ये प्रयत्नांशिवाय अन्न मिळायची व्यवस्था कुठेही नाही. सर्व प्राण्यांना, वनस्पतींना अगदी सूक्ष्मजीवांनादेखील प्रयत्नपूर्वकच आपले अन्न मिळवावे लागते. त्यामुळे एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या प्रजातीचे किती प्राणी राहतील यावर आपोआपच नियंत्रण राहते. अन्नाची उपलब्धता हा फार मोठा नियंत्रक घटक निसर्ग प्रभावीपणे वापरत असतो. मात्र शहरांमध्ये अशा सहज प्राप्त होणाऱ्या अन्नामुळे कबुतरांची संख्या मोठ्या वेगाने वाढताना आपल्याला दिसते. किंबहुना या कबुतरांना कसे रोखायचे अशी समस्या शहरातल्या बहुसंख्य नागरिकांपुढे ठाकलेली आपण पाहतो. रहिवासी जनते इतकेच व्यावसायिकदेखील त्रस्त झालेले आपल्याला दिसतात. अनेक ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केलेल्या संशोधनातून आता हे सिद्ध झाले आहे की , या कबुतरंच्या विष्ठेतून, उडणाऱ्या पिसांतून मोठ्या प्रमाणावर जीवाणूंचा प्रादुर्भाव माणसास होत असतो. अशा परिसरांमध्ये श्वासनरोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. निसर्गामध्ये प्रजातींंची संख्या नियंत्रणात ठेवण्याचा आणखी एकमार्ग असतो. तो म्हणजे भक्ष्य-भक्ष्यक नाते. प्रत्येक सजीवाकरिता कोणी ना कोणी भक्ष्यक योजलेला असतो. सामान्यत: आपण त्याला शत्रू म्हणून संबोधित असलोे, तरी प्रत्यक्षात परिसंस्थेमध्ये, निसर्गामध्ये संतुलन राखण्याचे मोठे काम हे भक्ष्य-भक्षक नाते करीत असते. दुर्दैवाने आज अशा शहरी पर्यावरणामध्ये या कबुतरांना कोणी भक्षक उरलेला नाही. त्यामुळे अनिर्बंध संख्यावाढीला चालना मिळालेली आपण शहरांमध्ये पाहतो. आता आपल्या लक्षात आले असेलच की, केवळ विपुल संख्येने सजीव आपल्या परिसरात आहेत म्हणजे निसर्गसंपन्नता आहे किंवा पर्यावरणाचे भले होते आहे, असे नाही. जी गोष्ट कबुतरांच्या बाबतीत आढळते तीच परिस्थिती जवळजवळ सर्व मानवी वस्त्यांमध्ये कुत्र्यांबाबत आपल्याला दिसते. मात्र, कुत्र्यांची संख्या वाढण्याचे एक कारण भूतदया हे आहे, जे धार्मिक समजुतींपेक्षा वेगळे आहे. प्राणिप्रेमाचा अविचारी अतिरेक हे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यामागचे मुख्य कारण आहे. जरी कबुतरांसारखी कुत्र्यांच्या अन्नाची व्यवस्था लावण्यात येत नसली, तरी मुक्तपणे फेकलेला कचरा व त्यातून उघड्यावर उपलब्ध होणारे अन्नपदार्थ त्यांना सहजपणे जगवतात. भटक्या कुत्र्यांच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न जरी बाजूला ठेवले, तरी त्यामुळे निसर्गाचे संवर्धन होते, असे खचितच म्हणता येणार नाही. म्हणून असे अतिरेकी प्राणिप्रेम म्हणजे निसर्गप्रेम आहे का? याचा पुनर्विचार जरूर व्हायला हवा.
 
माणसांच्या वस्त्यांमध्ये जशी एखाद्या प्रजातीची अनिर्बंध वाढ दिसते, तशीच काहीशी परिस्थिती वस्त्यांपासून दूर नैसर्गिक अधिवासांमध्ये झालेली दिसते. अर्थात तिथेही मानवी घटकांचा संबंध आहेच. आपल्यापैकी अनेक जण माथेरानला गेला असाल किंवा वरंदा घाटातून प्रवास केला असेल किंवा औंध, माहूर इथे प्रवास केला असेल. या सर्व ठिकाणी तुम्ही मोकळेपणाने निवांत बसून काही खाल्ले असे झाले का? माथेरानमध्ये कोणत्याही ठिकाणी जेवायची सोय असेल तिथे आजूबाजूला जाळ्या लावून कडेकोट बंदोबस्त केलेला आपण पाहिला असेल. कोणापासून वाचण्यासाठी? तर माकडांपासून. लाल तोंडाची माकडे हा या सर्व ठिकाणांवर आढळणारा प्रमुख प्राणी आहे. या माकडांची दहशत इथे असलेली आपल्याला दिसते. आता त्यांच्यामुळे आपल्या खाण्याची पंचाईत होते. हा त्यातला फारसा महत्त्वाचा भाग नाही. तर त्या माकडांनी तिथल्या परिसंस्थेमध्ये काय उच्छाद केला आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी अनेक जण म्हणतील की, ”ही माकडे आधीपासून तिथे होतीच की आणि तीदेखील निसर्गाचाच एक घटक आहेत. मग आता काय अडचण आली?” आपण जे सूत्र कबुतरांच्या वेळेस वापरले, तेच इथेही लागू होते. या परिसरात निसर्गतः ही लाल तोंडाची माकडे होतीच. ती अन्य सर्व प्राणी पक्ष्यांसोबत गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे वावरत होती. मात्र मुख्य प्रश्ने आहे, तो त्यांच्या संख्येचा. संपूर्णतः नैसर्गिक पर्यावरणामध्ये त्यांची संख्या नक्कीच इतक्या मोठ्या प्रमाणावर नसावी. आज या माकडांमुळे त्याच परिसरात अनेक वर्षे राहणाऱ्या अन्य सजीवांचे स्थान धोक्यात आले आहे. या माकडांच्या झाडांवरील अनिर्बंध वावरामुळे आणि संख्येमुळे परिसरातल्या झाडांवर घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसते. माथेरानमध्ये दिसणारे पक्षीवैविध्य कमी होत असल्याची नोंद अनेक अभ्यासक करतात. स्थानिक लोकांची निरीक्षणेदेखील याच स्वरूपाची आहेत. अन्य कोणतेही शाखारोधी पक्षी किंवा प्राणी अशा परिसरातून दुसरीकडे स्थलांतरित होताना दिसतात. त्यातच अशा अधिवासांमध्ये माणसांचा वावर सुरू झाल्यामुळे या प्राण्यांचे भक्षक दुसरीकडे निघून जातात आणि मग या माकडांना दुसरा कोणी शत्रूच उरत नाही.
 
वरील सर्व उदाहरणांमध्ये समान धागा कोणता आहे, तर या ठिकाणी कोणत्यातरी एकाच प्रजातीची झालेली अनिर्बंध वाढ हा. कोणत्याही नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असे घडणार नाही. याची व्यवस्था अंतर्भूत असते. जणू काही ती एक अंतर्गत यंत्रणा असते, जी सतत लक्ष ठेवून राहाते आणि वेळोवेळी दुरुस्त्या करून समतोल ढळणार नाही, याची काळजी घेते. भक्ष्य-भक्षक संबंध, अन्नपुरवठ्याची मर्यादा, नैसर्गिक आपत्ती अशा विविध प्रकारे एकच प्रजाती बहुसंख्य ठरणार नाही, अशी व्यवस्था होत असते. कारण अशी संख्यावाढ ही परिसंस्थेच्या अन्य घटकांकरिता हानिकारक असते. दुर्दैवाने इतका सखोल पर्यावरण विचार ना समाजात पोहोचत, ना कायदे करणाऱ्यांपर्यंत. त्यामुळे अनेकदा वन्यजीव संरक्षण कायदे देखील असे संतुलन ढळण्याला मदत करतात किंवा किमान ते दुरुस्त करण्याला अटकाव करतात. जगामध्ये अनेक ठिकाणी नियंत्रित हस्तक्षेप करून हा समतोल राखला जातो. म्हणून अशा उदाहरणांकरिता त्या त्या प्रजातीची हत्या ही नियंत्रित पद्धतीने व्हायला हवी किंवा त्यांच्या संख्यावाढीला मदत करणारी कृत्ये बेकायदा म्हणून घोषित व्हायला हवीत. अशा वेळेस पर्यावरण संवर्धन हे भूतदयेपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जायला हवे.
 
जी बाब आपण प्राण्यांच्या बाबतीत पाहिली, तीच गोष्ट वनस्पतींकरिता देखील लागू होते. त्यामुळे वनीकरण आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाचा विचारदेखील अधिक सजगपणे व्हायला हवा. आपल्यापैकी कोणालाही नैसर्गिकदृष्ट्या संपन्न किंवा सुदृढ प्रदेशाचे, परिसराचे चित्र काढायला सांगितले, तर आपण मुबलक हिरव्या रंगाचा वापर करून ते काढू. ‘हिरवे म्हणजे निसर्गस्नेही ‘असा पक्का समज आपल्या डोक्यात घर करून बसलेला असतो. परंतु, आपण जाणीवपूर्वक आपला परिसर पाहिला, तर आपल्या लक्षात येते की, सर्वच नैसर्गिक प्रदेश हिरवे नसतात. किंबहुना ज्या प्रकारच्या हवामानात आपला देश आहे, त्या हंगामी पावसाच्या प्रदेशात परिसराचा रंग किमान वर्षाचा निम्मा काळ तरी पिवळा असतो. अगदी वन्यप्राण्यांनी समृद्ध असा आफ्रिकेचा गवताळ प्रदेश घेतला तरी तो वर्षाचा बराच काळ पिवळ्या रंगानेच रंगलेला असतो. याचा अर्थ गवताळ प्रदेश, ज्यांच्यामध्ये अधूनमधून हिरवी झुडपे आहेत आणि विखुरलेले वृक्ष आहेत, हेदेखील निसर्गसंपन्न आणि स्वाभाविक आहेत. अशा प्रदेशांमध्ये पावसाच्या मागोमाग येणारी हिरवाई अन्ननिर्मिती व बीजनिर्मितीचे महत्त्वाचे काम करते. शिवाय अल्पजीवी प्राण्यांचे आयुष्यक्रम याच काळात पूर्ण होतात. या अल्पजीवी प्राण्यांवर अवलंबून थोड्या मोठ्या भक्षकांना त्यांच्या प्रजनन काळात मुबलक अन्नाचा पुरवठा होतो आणि पाऊस सरला की हळूहळू हिरवाई ओसरते. प्राणी सुप्तावस्थेत जातात आणि पुन्हा पिवळा रंग आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. या काळात अन्नसाखळीतील वरचे प्राणीच कार्यरत राहतात. मानवाच्या अविचारी पर्यावरण प्रेमामुळे अशा संपन्न प्रदेशांमध्ये हिरवाई आणण्यासाठी वृक्षारोपणाचा हस्तक्षेप केला जातो. यातील वृक्षांची निवडदेखील ‘पटकन वाढून प्रदेश हिरवा करणारे’ या निकषावर केली जाते. त्यामुळे जगामध्ये विविध ठिकाणी उपलब्ध असणारे असे वृक्ष एकत्र केले जातात. अशी लागवड अनेकदा स्थिर आणि संपन्न असलेल्या स्थानिक परिसंस्थेला हानिकारक ठरते. त्यांच्या वावरण्यावर बंधने येतात. दूरवरचा टापू न दिसल्यामुळे सहजपणे भक्ष्यस्थानी पडल्याचे प्रमाण वाढते. सोलापूरमधल्या नान्नडा अभयारण्यामध्ये माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी अशी वृक्षलागवड केली आणि त्यातून त्या पक्ष्याची अडचण केली. हे महाराष्ट्रातील उदाहरण फारसे जुने नाही. तेव्हा वृक्षारोपण म्हणजेच निसर्गसंवर्धन नव्हे.
 
बऱ्याच वेळेस अशा अविचारीपणे लावलेल्या परकीय वृक्षांमुळे त्या त्या परिसरातल्या अन्य वृक्षसंपदेवर परिणाम होताना दिसतो. सामाजिक वनीकरणामध्ये लावलेल्या सुरू, अकेशिया, निलगिरी यांसारख्या अनेक झाडांच्या खाली काहीही रुजत नाही. हा अनुभव आपण सर्वांनी घेतला असेलच. यातील बऱ्याच वृक्षांची पाने तीव्र आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असतात व ती मातीचा सामू बदलतात. त्यामुळे पूर्वी त्या परिसरात पावसाळ्यात वाढणारे गवत आणि तळझाडी उगवेनाशी होताना दिसते. नैसर्गिक परिसंस्थेमध्ये गवत आणि तळझाडी यांनाही उपयुक्त भूमिका असते. महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाचा भाग आणि पूर्व विदर्भाचा भाग सोडला तर उर्वरित सर्व भाग गवताळ, झुडपी आणि विखुरलेल्या वनांचा आहे. अशा परिसंस्थांमध्ये बहुसंख्य प्राणी आणि पक्ष्यांची आश्रयस्थाने झुडपांमध्ये दडलेली असतात. विखुरलेल्या मोठ्या वृक्षांच्या प्रजातीदेखील ठराविक कुळांमधल्या असतात. अशा परिसरात एकसुरी वृक्षांची पडद्यासारखी लागवड अनेकदा हानिकारकच ठरण्याची शक्यता असते.
 
तात्पर्य काय, तर निसर्गाचा महत्त्वाचा पैलू वैविध्य हा आहे. किंबहुना त्याचे सर्व संतुलनच या वैविध्यातून साधलेले आहे. कोणा एकाला प्रबळ होऊ न देता सर्वांना समान संधी किंवा महत्त्व देणे ही निसर्गाची कार्यपद्धती आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे, जपली पाहिजे. केवळ भाबड्या, भावनाप्रधान समजुतींपेक्षा वैज्ञानिक तथ्यांवर आधारित उपाययोजनांचा अवलंब निसर्गाशी मैत्री, स्नेह, प्रेम जपताना केला पाहिजे. तरच आपले निसर्गप्रेम जागरूक आणि उपयुक्त केला. खऱ्या अर्थाने संवर्धन करणारे ठरेल. या लेखाच्या निमित्ताने आपण असे अभ्यासू आणि जागरूक संवर्धक होऊया.
 
डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई
९७६६६१५८१६
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भूगोल विषयाचे प्राध्यापक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@