माती : कच्चं बांधकाम? की वास्तुशिल्पे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |
 
 
‘मातीच्या वास्तूच पर्यावरणस्नेही आहेत’ हे ठासून सांगण्याचा हेतू इथे नाही. तर आपला वास्तुविषयक दृष्टिकोनच थोडा साफसूफ करावा म्हणून हा लेख.
 
मुळात मातीच्या वास्तुरचना ही कुठली नवीन, पर्यावरणवाद्यांची प्रायोगिक लाट नाही. मातीच्या वास्तूंचा इतिहास सिमेंट अथवा अन्य कुठल्याही बांधकाम सामग्रीपेक्षा प्रदीर्घ आहे. किंबहुना मातीचा निवाऱ्यासाठी वापर ही माणसांची मक्तेदारी मुळीच नाही! वाळवी अन् इतर मुंगीवर्गीय कीटकांची वारुळे, कुंभारमाशी अन भुंगेवर्गीय कीटक यांची मातीने बांधलेली पोळी ही ऊन, पाऊस तसेच भक्षकापासून संरक्षित वास्तुरचनेचे उत्तम धडे असतात. पाकोळ्या अन् काही प्रकारचे पक्षीदेखील मातीपासून अत्यंत सुबक, सुरक्षित अन् उबदार घरटी बांधतात.
 
जगभरातील मानवी संस्कृतींमध्ये मातीच्या इतक्या वैविध्यपूर्ण वास्तुरचना गेली हजारो वर्षे वापरात आहेत की, इथे उल्लेख केलेल्या रचना केवळ उदाहरणार्थ समजाव्यात.
 
मध्य पूर्वेत ‘शिबाम’ वसाहती या दाट लोकवस्तीच्या मातीत बांधलेल्या बहुमजली (होय बहुमजली!) वास्तू आहेत. परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी शिबाम वसाहतींचा खास विकास झाला. आफ्रिकेतील ‘दोगान’ जमातीची घरे हे सामूहिक वास्तूंचे दुसरे उदाहरण आहे. ‘जिन ची मॉस्क’ हा आफ्रिकेतील मातीच्या वास्तूचा अजून एक नमुना. उन्हात सुकविलेल्या (कच्च्या) मातीच्या विटा (adobe) वापरून बांधलेली ही जगातील सगळ्यात प्रशस्त वास्तू ! लॅटिन अमेरिकेतील ‘ताओस दे पुएब्लो’ या वसाहतीमध्ये एका घराचे छत हे त्यावरील घराचे अंगण म्हणून वापरले जाते. अन त्यातून मोठे गमतीशीर सामूहिक अवकाश तयार होते! चीनमधील ‘हाका’ समुदायाची प्रचंड मोठी, बहुमजली घरे बाहेरून पाहताना छाती दडपवतात तर आतून मंदिरे, बाजार अन् स्त्रिया-मुलांच्या वावराने रंगीत अन् जिवंत भासतात. तिबेटमधील दलाई लामांचा ‘पोटाला प्रासाद’ ही जिथून त्यांना चिनी आक्रमणापासून वाचवून भारतात सुरक्षित आणले गेले, ती जगातील सगळ्यात मोठी मातीची वास्तू मानली जाते. या सर्व वास्तूंचे उल्लेख केवळ मातीच्या बांधकामाचे पुरावे म्हणून नाही तर त्या वास्तूंच्या सामाजिक मूल्यांसाठी अन् शिल्पमूल्यासाठीदेखील अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
भारतीय उपखंडातदेखील मातीच्या वास्तूंचा ज्ञात इतिहास सिंधू संस्कृतीपासून गेल्या ७ हजार वर्षांचा अन् भलताच सुंदर आहे. आजही वापरात असलेल्या हिमाचल प्रदेशातील कांगडा, गुजरातमध्ये भूज, राजस्थान, ओरिसा तसेच छत्तीसगड येथील मातीच्या वास्तूरचना अनेक वर्षांच्या उपहासानंतर आता कुठे आधुनिक भारतीय रचनाकारांचे लक्ष वेधून घेत आहेत.
एक काळ असा जरूर होता, जेव्हा वास्तुरचनेचा वापर सामान्य लोकांच्या मनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी होत होता, मग भले ती राजसत्ता असो वा धर्मसत्ता. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाच्या बहुतेक वास्तू या अत्यंत खर्चिक, नैसर्गिक संसाधनांचा यथेच्छ वापर करून, अनेक लोकांच्या सश्रम गुलामगिरीतून बांधल्या जात. या वास्तू आकाराने प्रचंड, एकट्या माणसाला दिपवणाऱ्या असत. मात्र तो मानवी संस्कृतीचा एकांगी इतिहास झाला. याच इतिहासाचं दुसरं अंग असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या मोकळ्या, सुटसुटीत, स्वस्त अन् स्वतंत्र वास्तुरचना मात्र दुर्लक्षित राहिल्या. अन आपण इतिहासातून शिकायला विसरून गेलो पुन्हा एकदा!
 
बांधकामाचा आधुनिक इतिहास
 
यांत्रिकीकरण-पश्चात काळात राजसत्ता, धर्मसत्ता अन् त्यातून उद्भवलेल्या वास्तू बऱ्याच अंशी कालबाह्य झाल्या. आधुनिक जगाच्या इतिहासात जसा सामाजिक पोत बदलत गेला तशी वास्तुरचनेची भाषादेखील बदलून गेली. बहुतेक वास्तुरचनाकारांनी यंत्रनिर्मित बांधकाम साहित्याचा वापर करून नवीन वास्तुशैली निर्माण केली. मात्र, तिथून पुढे नवीन अर्थसत्ता उदयाला आल्या. आधुनिक वास्तुरचना अजूनही सामान्य माणसाला अचंबायुक्त भीती वाटावी, श्रीमंतीचा हेवा वाटावा याच हेतूने पुढे जाते. मूठभर सत्ताधीश जी संसाधने पूर्वी लुटत होते, ती आता सगळ्यांनाच लुटावीशी वाटतात. ‘चला, सगळेच बेजबाबदार वागूया’, अशी समानता फारच लवकर आली. तिचे परिणाम मात्र आपल्या हुशार अर्थ-सत्ताधीशांनी आपल्यापासून बेमालूम लपवले. संसाधनांचा अमर्याद वापर अधिक वाढलाच आहे पण त्याबरोबर तो अधिकाधिक असमान होताना देखील दिसतो आहे.
 
त्यातही काळाशी सुसंगत रचना करत आपल्या सामाजिक अन् पर्यावरणाशी निगडित जबाबदाऱ्या संवेदनशीलपणे पेलणारे वास्तुकार सतत उदयाला येत राहिले.
 
इजिप्तमधील हसन फाथी यांचे नाव अशा रचनाकारांच्या श्रेयनामावलीत अत्यंत आदराने सुरुवातीलाच घेतले पाहिजे. स्थानिक कारागिरांचा, कौशल्यांचा, हवामान, उष्मा इत्यादींचा सखोल विचार करून, लोकांच्या सामाजिक, मानसिक गरजा, आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी मातीच्या वास्तुरचना केल्या. भग्न वास्तू अवषेशांचा अभ्यास करून त्यांनी मृतवत बांधकाम कौशल्यांना पुन्हा जिवंत केले. त्यांना जगात सन्मान मिळवून दिला. फाथी यांच्या वास्तूंमधील अवकाश आधुनिक असूनही इजिप्तच्या सांस्कृतिक अस्तित्वात आपली मुळे घट्ट रोवून उलगडत जाते. निव्वळ तांत्रिकदृष्ट्या परावलंबित्व त्यांनी नाकारले नाही, तर वैचारिक गुलामगिरीला देखील आव्हान दिले, तेही केवळ वास्तुरचनेतून!
 
ब्रिटनमधून भारतात रुजलेले लॉरी बेकर हे दुसरे अचाट वास्तुकार, ज्यांनी भारतीय वास्तुकलेला स्वतःचा न्यूनगंड उतरवून फेकून द्यायला शिकवले. गांधीजींच्या एका भेटीने आपले संपूर्ण आयुष्य सेवाव्रती होऊन व्यतीत केलेले बेकर अनेकानेक भारतीय वास्तुकारांचे दिशादर्शक गुरू मानले जातात. मातीच्या बांधकामाच्या पायाभूत चार पद्धतींवर त्यांनी लिहिलेल्या हस्तपुस्तिका कदाचित सगळ्यात सोपे अन् सर्वांकरिता वाचनीय दस्तावेज आहेत!
 
हिमाचल प्रदेशात गेली तीसहून अधिक वर्षे आधुनिक ‘कांगडा’ पद्धतीच्या मातीच्या वास्तू रचणाऱ्या ‘डीडी कॉन्ट्रॅक्टर’ मातीच्या वास्तुरचनेकडे संवेदनशील शिल्पकलेच्या दृष्टीने पाहायला शिकवतात. 'कुठलीही वास्तू बांधताना पर्यावरणाची काही ना काही हानी ही होणारच. मात्र वास्तुकाराची जबाबदारी आहे की त्याने होणाऱ्या नुकसानाचा अंदाज बांधून त्याची योग्य ती भरपाई करावी,' असं त्या आग्रहाने मांडतात.
 
मातीची शास्त्रीय माहिती
 
वेगवेगळ्या भौगोलिक प्रक्रियांमधून दगडापासून माती तयार व्हायला शेकडो वर्षे लागतात. ज्या मूळ दगडापासून तिची उत्पत्ती झाली, त्या दगडाच्या रासायनिक संरचनेवर, त्यात मिसळत गेलेल्या इतर घटकांवर मातीचा पोत अन् तिचा स्वभाव अवलंबून असतो. अतिरिक्त धूप न झालेल्या कुठल्याही जमिनीचा उभा छेद लक्षपूर्वक पाहिल्यास त्यात तळातील खडकापासून सगळ्यात वरच्या उर्वरक मृदेपर्यंत मातीच्या विविध अवस्था पाहता येतात. वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात या स्तरांची जाडी अन् इतर गुणधर्म बदलताना दिसतात. यातील सगळ्यात वरचा उर्वरक मृदेचा थर (humus soil layer) हा सगळ्यात अमूल्य खजिना असतो. त्यात सर्वाधिक जैविक घडामोडी घडत असतात, ज्यातून वनस्पतींना पोषण मिळते. आपले अन्नोत्पादन या उर्वरक मृदेवरच अवलंबून आहे. हा थर अलगद बाजूला सारल्यापासून तळाशी मुरूम किंवा तत्सदृष्य ठिसूळ दगड अन् त्याच्याही खाली टणक खडक लागेपर्यंत जी भुसभुशीत माती लागते, ती शक्यतो बांधकामासाठी योग्य असते.
 
तिचा रंग, चिकण अथवा कणीदार पोत अशा अनेक गुणधर्मांच्या काही सोप्या चाचण्या जागेवरच करून पाहता येतात. अधिक सविस्तर अभ्यास करताना गोटे, मोठे खडे (stones), बारीक खडी (pebbles), वाळू (sand), लोम (silt) अन् या साऱ्यांना बांधून घालणारी चिकणमाती (clay) या ढोबळ घटकांचे प्रतिशत प्रमाण लक्षात घेऊन मातीचा प्रकार अन् पर्यायाने बांधकाम पद्धती ठरते.
 
मातीच्या बांधकामाच्या चार मूळ पद्धती अन् अनेक स्थानिक उपपद्धती आहेत. या सर्व पद्धती मुळात माती भिजवणे, मुरवणे अन् तिला भिंतींचा आकार दिल्यावर उन्हात सुकविणे याच प्रकारात मोडतात. अशा पद्धतीने बनलेली मातीची वास्तू तिचे जीवनमान संपल्यावर कदाचित शेतीयोग्य जमीन होऊ शकते!
 
मातीला आकार देऊन, भट्टीत भाजून विटा तयार होतात. मातीचा (अथवा खनिजाचा) एक प्रकार, चुनखडी (limestone), भट्टीत भाजून बांधकामाचा चुना तर त्याहीपेक्षा वरच्या तापमानाला भाजून सिमेंट तयार होते. या तीनही पद्धती अन् त्यांचे अनेक उपप्रकार मातीच्या रासायनिक गुणधर्मात बदल करतात. चुना वगळता अन्य दोन रासायनिक बदल पुन्हा कधीच मागे फिरवता येत नाहीत. विटा भाजणे अथवा चुनखडीचे सिमेंट बनवणे, या चक्रीय प्रक्रिया नाहीत. अशी सामग्री त्यांच्या पर्यावरणमूल्याचा विचार करून गरजेपुरती अन् कमीत कमी वापरणेच इष्ट. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली मातीचे नमुने तपासून मातीच्या संरचना शक्तीविषयी प्रयोगशाळेतील शास्त्रीय संशोधनदेखील बरेच पुढे गेले आहे. मातीतील वेगवेगळे कण, पाण्याचा अंश आणि या सगळ्यांचे परस्परबंध हा अत्यंत कुतूहलाने स्वतंत्रपणे अभ्यासण्याचा विषय आहे. मातीच्या भिंती जिवंत आहेत. त्या केवळ काव्यार्थाने नव्हे तर त्या खरोखर श्वासोच्छ्वास करतात, हे शास्त्रीय सत्य आहे.
 
मातीच्या वास्तूंची कालसुसंगती
 
विविध प्रदेशांमधील पारंपरिक ज्ञान, आधुनिक शास्त्रीय संशोधन यांचा योग्य मेळ घालून आधुनिक- स्थानिक (Neo-Vernacular) शैलीत मातीच्या वास्तुरचना करता येतात. जिथे गरज असेल तिथे आणि तितकेच सिमेंट अथवा अन्य यंत्रनिर्मित सामग्री वापरून अधिकाधिक नैसर्गिक सामग्रीचा वापर या शैलीत केला जातो. नैसर्गिक सामग्रीदेखील शक्य तितक्या जवळूनच जमा केली जाते. उदाहरणार्थ, जुने मातीचे घर उतरवून त्याच जागी आधुनिक-स्थानिक शैलीतील मातीचे घर बांधले तर या घराचा पर्यावरणावरील भार लक्षणीय प्रमाणात कमी होतो. स्थानिक हवामान, पर्जन्यमान, पावसाच्या दिशा अन् मारा यांचा विचार करून छपराची रचना ठरवली तर मातीच्या भिंतींना पावसापासून उत्तम संरक्षण देता येते. या बदल्यात मातीच्या भिंती आपल्याला कडक उन्हाळ्यात किंवा थंडीत १३ अंश सेल्शियस इतका उष्मावरोध अगदी सहज देतात.
 
स्थानिक शेतीमधून निर्माण होणारी सहउत्पादने, जसे की भाताचे काड, गव्हाचे तूस, कडू तेलाच्या पेंडी, गुरांचे शेण इत्यादी वापरून मातीच्या लेपनाचा गुळगुळीतपणा, टिकाऊपणा हवा तसा बदलता येतो. चांगली रचना, योग्य मिश्रण आणि लक्षपूर्वक शिकून मिळवलेले हस्तकौशल्य यांच्या जोरावर सिमेंट-विटेहून सरस दर्जाच्या मातीच्या भिंती बांधता येतात, यात काडीमात्र शंका नाही.
 
खूपवेळा आपण जितका आदर्शवादी विचार करतो तितकं प्रत्यक्षात जगू शकत नाही. विचारपूर्वक रचलेली मातीची वास्तू आपल्याला आपले आदर्श आचरणात आणण्याची उर्मी देते. आरामदायक, रुचीपूर्ण परंतु संयत जीवनशैलीचा अनुभव देते. वास्तूत वावरणारे लोक, त्यांचे स्वभाव, विचारपद्धती, त्यांची जीवनशैली, व्यक्तिगत अन् सामूहिक सवयी या सगळ्याचा खूप घट्ट संबंध असतो त्या वास्तूशी. इतर मृत सामग्रीपेक्षा मातीच्या वास्तू त्यांच्या जिवंतपणामुळे अधिक प्रतिसाद देतात अन आपल्या आंतरिक विरोधाभासांना आरसाच दाखवतात. मातीच्या वास्तू त्यांच्या निर्माण प्रक्रियेपासूनच अनेक आंतरिक बदल, जीवनशैलीतील बदल घडवून आणतात. आपली बदलण्याची तयारी मात्र पाहिजे. मातीच्या आधुनिक वास्तूत राहताना आपल्याला आपल्याच वागण्यातले विरोधाभास कमी होताना जाणवतील. इतरांशी अन् स्वत:शी सतत होत असलेलं घर्षण कमी होताना जाणवेल. त्यातूनच आपण आपल्या भोवतीच्या लोकांना, आपल्या पर्यावरणाला अधिक अर्थपूर्ण योगदान देऊ शकू.
 
बाहेरच्या जगातील वाढती स्पर्धा, असूया, मानसिक ताण अन् बेजबाबदार जीवनशैलीमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणारे मोजके लोक मातीच्या वास्तूंची जीवनशैली डोळसपणे आत्मसात करतात. यात अव्यावहारिक, आदर्शवादी काहीही नाही. हा वैचारिक स्वप्नाविलास नसून अनेक सहविचारी लोकांसह माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
 
मातीच्या वास्तूंची स्थानसुसंगती
 
भारतीय उपखंडातील प्रत्येक प्रदेशात, भौगोलिक विभागात घरांची शैली वेगवेगळी होती. हळूहळू विकासाच्या नावाखाली आसेतुहिमाचल सिमेंट-काँक्रिटचा एकसाची ठोकळा पाहायला मिळू लागला आहे. नैसर्गिक संसाधने आपण आपल्या पुढच्या पिढ्यांकडून तसेच मनुष्येतर जीवांकडून उसनी घेत असतो. ती जर जबाबदारपणे वापरायची असतील तर आपल्या संतुलित विकासाची दिशा आपणच ठरवली पाहिजे. आधुनिकतेला स्वीकारताना स्थानिक जैविक तसेच सांस्कृतिक विविधता गमावलीच पाहिजे का? ग्रामीण समुदायांनी शहरातील एकांगी विकासाकडे आशाळभूत नजरेने पाहण्याची खरंच गरज आहे का? या प्रश्नातून विकासाच्या आधुनिक-स्थानिक शैलीची विचारधारा सुरू होते. भले शिक्षित शहरी माणसाला मातीच्या वास्तू कालबाह्य वाटोत, पण मातीच्या वास्तुकलेचा प्रवास इतिहासातल्या उलथापालथींमधून होतच राहिला आहे. चंद्रमौळी झोपडीपासून ते अभिरुचीसंपन्न वास्तुशिल्प झालेल्या या अवकाशामध्ये कमालीचा गारवा आहे, मायेची ऊब आहे. बांधणाऱ्या अन् वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातांचे ठसे आहेत. वावरणाऱ्या माणसांच्या व्यक्तिमत्वाला पूरक असं व्यक्तिमत्व आहे. यात स्वावलंबनाचा धडा आहे पण परस्परावलंबी व्यवस्थापन देखील आहे. अभ्यासपूर्ण, विचारपूर्वक केलेली रचना आहे पण श्रमाला तितकीच प्रतिष्ठा आहे. नेटक्या कामाची शिस्त आहे. पण मानवी कष्टांचा संवेदनशील विचार आहे. वय, लिंग, जात, वंश इत्यादी मर्यादांना खडे आव्हान न देता हलकेच पुसून टाकण्याची क्षमता आहे. मानवेतर जीवांकडे प्रेमाने पाहण्याची, मातीच्या पृथ्वीकडे एका मोठ्या परिवाराचे मोठे घर म्हणून पाहण्याची आध्यात्मिक दृष्टी आहे. मात्र या अनुभवासाठी चिखलात बिनदिक्कत उडी घेण्याची तयारी पाहिजे...
 
अनुज्ञा ज्ञानेश्वर
९६६५५३९९७६
(लेखिका आर्किटेक्ट असून पर्यावरणपूरक बांधकाम तज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@