जलसंपदा विभागाकडून नदीजोड प्रकल्पांसाठी ४१ कोटी रुपये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतर्गत नाशिक येथील दमणगंगा-एकदरे आणि अप्पर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदर दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास १२ टीएमसी अतिरिक्त पाणी नाशिक जिल्ह्यास उपलब्ध होईल. यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. तसेच अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यातील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे.

दोन्ही नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात साकारले जावेत याकरिता दोन वर्षांपासून जलचिंतनसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात होते. त्यांस या निमित्ताने यश मिळाले. तसेच, ’राष्ट्रीय जलविकास अभिकरणने तयार केलेल्या पूर्व व्यवहार्यतेनुसार या योजनेचे लाभव्यय गुणोत्तर १.४४ टक्के इतके आहे. जलसंपदा विभागाने या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षण, अन्वेषणचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी १७ कोटी ७४ लाख १८ हजार रुपये मंजूर केले आहेत.

अप्पर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील गोदावरी खोर्‍यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेचे दोन पर्याय दिले गेले असून, त्याचे लाभव्यय गुणोत्तर एकासाठी १.६५ आणि पर्याय दोनसाठी १.६४ येते. या योजनेतून २८.३२० हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळू शकतो. तसेच १३७.०१ दशलक्ष घनमीटर पाणी बिगर सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते.या प्रकल्पाचा सविस्तर सर्वेक्षण, अन्वेषण अहवाल तयार करून २३ कोटी १४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. प्रकल्पामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरसाठी लागणार्‍या पाण्याची पूर्तता करता येणार आहे. त्यामुळे औद्योगिक सिन्नर औद्योगिक क्षेत्र (माळेगांव), नाशिकमधील अंबड, सातपूर आदी औद्योगिक क्षेत्रास चालना मिळेल. अनेकविध उद्योग आजमितीस केवळ पाण्याची असणारी कमी उपलब्धता यामुळे नाशिककडे आकर्षिले जात नाहीत. त्यास या प्रकल्पामुळे गती येण्याची संभावना आहे. या प्रकल्पांमुळे शिर्डी, जायकवाडीला पाणी मिळणार आहे.

असा असेल प्रकल्प

शंभर दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी, तर १४३ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोर्‍यात वळविण्यात येईल.

या योजनेंतर्गत पाच धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

पाचही धरणे परस्परांशी जोडण्यात येणार असून, २०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपसा पद्धतीने उचलून, गोदावरी खोर्‍यातील देव नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे.

दमणगंगा-एकदरे या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोर्‍यात वळविण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@