धरमतर खाडीत डिझेल तस्करी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |

 

 
पेण : गेल्या महिनाभरापासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती रोजच्या रोज वाढत असल्याने समुद्रात तस्करी करणार्‍या समुद्र चाच्यांच्या पथ्यावर पडले आहे. पूर्वी दादर, धरमतर, वशेणी, खाडीमध्ये कोळसा, वाटाणा, साखर यांची तस्करी जोरात होत असे, परंतु मध्यल्या काळात काही प्रमाणात या बाबींना आळा बसला होता. मात्र कोळसा, वाटाणा, साखर बंद होताच समुद्र चाच्यांनी आपली नजर डिझेलकडे वळवली आणि आपला डिझेल व्यवसाय सुरू केला.
 

सध्या डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, काळ्या बाजारातून गाडी व्यावसायिक डिझेल घेताना दिसत आहेत. धरमतर खाडी आणि वडखळ पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, तर दादर खाडी ही दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या दोन्ही पोलीस ठाण्यांचे सागरी मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे. कारण सर्रास धरमतर आणि दादर खाडीच्या परिसरात डिझेलची तस्करी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत याचा ओघ वाढल्याचे दिसत आहे. हे समुद्र चाचे बाहेरून येणार्‍या बार्जेसच्या चालकांकडून हजारो लिटर डिझेल घेत असतात आणि हे डिझेल वशेणी, दादर, घोडाबंदर, तामसी बंदर या परिसरात साठवून ठेवतात. डिझेलच्या किंमती वाढल्याने मोठ्या प्रमाणात या डिझेलला मागणी आहे. उरण, पनवेल, वडखळ, नागोठणे या भागातील ट्रान्सपोर्टचा धंदा करणरे या समुद्र चाच्यांशी संपर्क करून, डिझेल खरेदी करत असतात.

 

डिझेलच्या किंमती वाढल्याने समुद्र चाच्यांचा डिझेल तस्करीचा धंदा जोरात सुरु आहे. परंतु, वेळीच समुद्र चाच्यांवर बंधने घातली नाहीत, तर या मार्गाचा वापर अतिरेकी कारवाई करण्यासाठी भविष्यात झाल्यास नवल वाटू नये, कारण २६/११ चा हल्ला झाल्यानंतर दादर सागरी पोलीस ठाण्याची तातडीने यावेळी निर्मिती केली. परंतु, आज पोलीस ठाण्याच्या नाकाखालीच समुद्र चाच्यांनी धुमाकूळ घातलेला असल्याने दादर सागरी पोलीस ठाणे काय करत आहे? असा सवाल सर्वसामान्य करत आहेत.

 

पोलिसांचे दुर्लक्ष

 

पोलीस खात्याचे सपशेल या बाबीकडे दुर्लक्ष आहे. असेच म्हणावे लागेल. पोलीस खात्याला २६/११ च्या हल्ल्याचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. २६/११ च्या हल्ल्यासाठी उरण, (करंजा) जेट्टीचा वापर केल्याचे त्यावेळी उघड झाले होते.

@@AUTHORINFO_V1@@