महापालिकेच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |
 
 
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रजाकालावधीत प्रभारी आयुक्त म्हणुन कार्यरत असणाऱ्या नाशिकच्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सहा बड्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कामकाजाचा धडाका लावला. आयुक्त मुंढे यांच्या कार्यशैलीस साजेसे असे काम प्रभारी आयुक्तांनी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
 
महापालिकेच्या इ-कनेक्ट अॅप्लिकेशनवर आलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने या सहा बड्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिस बजाविण्यात आली आहे. मुंढे यांच्या सूचनेनुसार अॅपचा आढावा घेतल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर आहेत. रजेच्या काळात प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे आहे. रजेच्या काळात मुंढे यांनी राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क साधून इ-कनेक्टरवर प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार सहा विभागांकडून तक्रारींची दखल न घेतल्याने सोमवारी दि. ४ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या. याशिवाय सात दिवस उलटूनही तक्रारी प्रलंबित असल्याने सातपूर, सिडको, पश्चिम व पूर्व नाशिकरोड, पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावली जाणार आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने सोडवणूक होण्यासाठी स्मार्ट नाशिक अॅप्लिकेशनमध्ये बदल करत एनएमसी इ-कनेक्ट अॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यावर नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन केले जात आहे. तक्रारी सोडविण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला आहे. आलेल्या तक्रारींची सोडवणुक न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते.
 
आयुक्त सध्या रजेवर असल्याने तक्रारींचा निपटारा होण्यात ढिलेपणा आल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर विभागप्रमुखांच्या बैठकीत प्रभारी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तसेच सहा विभागप्रमुख व सहा विभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या.
 
हे आहेत सहा अधिकारी
 
* नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागूल
* शहर अभियंता संजय घुगे
* मालमत्ता व्यवस्थापक तथा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर
* अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम
* आरोग्य व वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. जयराम कोठारी,
* घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन हिरे.
@@AUTHORINFO_V1@@