अंजनेरीवरील वनोपजांचा अभ्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2018
Total Views |



वास्तविक शाळेत पर्यावरण हा विषय ‘शिकवला’ जाण्यापेक्षा ‘उरकला’ जातो. पण नाशिकमधल्या अंजनेरी पर्वतावरील जैवविविधतेचा शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून शास्त्रीय अभ्यास करवून घेण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम पर्यावरणाभ्यासक जुई पेठे-टिल्लू यांनी राबवला. त्यांचा हा अनुभव...

अंजनेरी पर्वत पश्चिम घाटाच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील महत्त्वाच्या गड-किल्ल्यांपैकी एक आहे. हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणाऱ्या या गडावर अंजनी मातेची मंदिरे आहेत. याच बरोबरीने येथे सुमारे आठ-नऊ शतकांपूर्वीची जैन तीर्थंकरांची मंदिरेदेखील आहेत. महानुभाव पंथाचे चक्रधरस्वामी येथे राहिल्याचे पुरावे आहेत. धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे विविध धर्मांचे व पंथांचे भाविक येथे वर्षभर दर्शनासाठी येत असतात.

जैवविविधता:

‘सिरोपेजिया अंजनेरिका’ या वनस्पतीचा जगभरातील अंजनेरी हा एकमेव अधिवास आहे. या बरोबरीनेच इतर अनेक स्थानबद्ध, दुर्मिळ, अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पतीसुद्धा येथे आढळतात. या पर्वताच्या उंच कड्यांवर भारतीय गिधाडे (जिप्स इंडिकस) मोठ्या संख्येनी घरटी करतात. विविध कारणांमुळे या गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि त्यांची निवासस्थाने सांभाळणे आवश्यक आहे. थोडक्यात, अंजनेरी हे अनेक दुर्मिळ प्रजातींचे वस्तिस्थान आहे आणि म्हणूनच त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. ळ

अंजनेरीवरील जैवविविधतेला काळाच्या ओघात कळत-नकळतपणे अनेक धोके निर्माण झाले आहेत. यामध्ये असंवेदनशील पर्यटन, अनियंत्रित गुरेचराई व प्रजातींची अवैध तोड या प्रमुख समस्या आहेत. या समस्यांमुळे स्थानिक अधिवासांवर अनेक दुष्परिणाम होतात, जसे वनस्पती तुडवल्या जाणे, उपटल्या जाणे, मातीची धूप होणे, दबली जाणे, अजैविक कचरा वाढणे, वणव्यांचे प्रमाण वाढणे, इ.

या सगळ्या समस्यांच्या मुळाशी स्थानिक अनास्था आढळून येते. अंजनेरीच्या कुशीत राहणाऱ्या स्थानिक समाजात या वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधते बाबत मालकीची भावना तयार झाल्याशिवाय वरील समस्यांची व्याप्ती व प्रमाण आवाक्यात येऊ शकत नाही.

मुलांना जैवविविधतेशी जोडणे:

शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंजनेरीच्या वैशिष्ट्यपूर्ण ठेव्याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून २०१६ पासून मी या स्थानिक शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. त्यामध्ये, विविध भाषणे, चर्चासत्रे, सादरीकरणे, निसर्गपट दाखवणे, इ. चा समावेश आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जैवविविधतेच्या नोंदणीचे उपक्रमही हाती घेतले जातात. अंजनेरीवर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. जसे हिरडा, बेहेडा, आवळा, चिचूरटी, इ. येथे अनेक रानभाज्या व सांस्कृतिक महत्त्वाच्या वनस्पतीदेखील आढळतात. यातील बर्याच विक्रीसाठी गडावरून काढल्या जातात आणि अनेक लोकांना यातून रोजगार उपलब्ध होतो. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची क्षमता असणार्याच गडावरील उपयोगी वनस्पतींचा अभ्यास करण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अत्यंत सोपी पण संक्षिप्त प्रश्नावली तयार करण्यात आली. महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ, नाशिक संचालित मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय, अंजनेरीमधील पाचवी ते दहावीच्या तीनशे विद्यार्थ्यांमध्ये ही प्रश्नावली वितरीत करण्यात आली. विद्यार्थ्यांना घर व परिसरातील ज्येष्ठ-अनुभवी लोकांशी संवाद साधून, या प्रश्नावली भरावयास सांगितल्या व यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. सदर प्रश्नावलीमधून वनस्पती, त्यांचे सामान्य नाव, उपयोगी भाग जसे, फळ, फूल, पाने, देठ, कंद, मूळ, इ. माहिती गोळा करण्यात आली. या प्रश्नावलीचा विद्यार्थ्यांनी भरलेला नमुना सोबत जोडलेला आहे.गोळा झालेल्या माहितीला पूर्वी झालेल्या अभ्यासांशी व नोंदींशी तपासून बघण्यात आले. प्रश्नावलीच्या सहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून, सर्वाधिक नोंदवल्या गेलेल्या सात वनस्पतींची निवड करण्यात आली. निवडलेल्या वनस्पतींच्या काढणीवर अधिक तपशील संकलित करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुढील उपक्रम देण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गडावर सापडणाऱ्या निवडक वनोपजांच्या ठिकाणांबद्दल माहिती गोळा केली. ही माहिती गडाच्या नकाशावर सांकेतिक स्वरूपात उतरवली गेली व गडाचा एक अतिशय उपयोगी वनोपज नकाशा साकारला गेला.

विद्यालयातील एकूण तीनशे विद्यार्थ्यांपैकी १७५ विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले. हे विद्यार्थी १२ ते १७ वर्षे या वयोगटातील होते. या मुलांनी वडिलधाऱ्यार्शी संवाद साधून, अंजनेरी वरील ५५ वनोपजांविषयी माहिती गोळा केली. मुलांनी संकलित केलेल्या माहितीची स्थानिक जाणकारांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पूर्वी केलेल्या अंजनेरीबाबत च्या अभ्यासांच्या आधारे वनस्पतींची स्थानिक नावे, शास्त्रीय नावे व उपयोग तपासले गेले. ज्या नोंदींचे काही संदर्भ आढळले नाहीत त्या गाळण्यात आल्या. ५५ पैकी ४७ वनस्पतींची तपशीलवार ओळख पटू शकली व म्हणून या अभ्यासात ४७ प्रजातींची निवड करण्यात आली.

या ४७ वनस्पती २५ कुळांमधील (families) होत्या. कडधान्यवर्गीय, माठवर्गीय, काकडीवर्गीय, बोरवर्गीय व अळूवर्गीय वनस्पतींची संख्या यामध्ये अधिक होती. अभ्यासात निवडलेल्या ४७ वनोपजांची सूची सोबत जोडलेली आहे. या वनोपजांमध्ये १२ वृक्ष, नऊ झुडुपे, सहा वेली व २० लहानखुर्या् (गवताएवढ्या) वनस्पती यांचा समावेश आहे. जैवविविधता संवर्धन व व्यवस्थापनाचा विचार करत असताना केवळ वृक्षांचाच विचार करून भागणार नसून, त्याबरोबरीने खुरट्या वनस्पतींचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

२८ वनस्पतींची फळे उपयुक्त असून, ती काढली जातात. याचप्रमाणे, २३ वनोपजांची पाने व देठे वापरली जातात. १७ वनस्पतींचे कंद व १३ वनस्पतींची फुले उपयोगी असून, ती काढली जातात. वनस्पतीचा काढला जाणारा भाग हा त्या विशिष्ट वनस्पतीचे जीवनचक्र व त्याचे पुनरुत्पादन यावर परिणाम करत असतो. फळे-फुले काढणीमुळे पुनरुत्पादनावर परिणाम होतो तर कंदमुळे काढणीमुळे चालू जीवनचक्रावरच परिणाम होतो. पाने व देठ यांच्या मर्यादित काढणीमुळे वनस्पतीच्या जीवनचक्रावर सरळ-सरळ परिणाम होत नसला, तरी या भागांची अनियंत्रित काढणी झाल्यास, वनस्पतींच्या जीवनचक्र व पुनरुत्पादन दोन्हींवर परिणाम होतो. या शास्त्रीय बाबी लक्षात घेऊन नियोजनबद्ध काढणी केल्यास, जैवविविधता संवर्धनाबरोबरच उपजिविकेच्या संधीदेखील टिकून राहू शकतात, किंबहुना वाढूही शकतात.

अनेक वनस्पतींचे एकाहून अधिक भाग वापरले जातात. जसे ‘चाई’ या वनस्पतीचे चार विविध भाग (फुलोरा, फळे, कोवळे कोंब आणि कंद) वापरात येतात. आशा वनस्पतींना एका हंगामात एकापेक्षा अधिक वेळा काढणीचा धोका संभवतो. या वनस्पती स्थानिक समाजाच्या उपजीविकेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या असल्या, तरीही अतिकाढणीमुळे यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. म्हणून यांचे शास्त्रीय नियोजन होणे गरजेचे आहे. अंजनेरीवरील 36% वनोपजांचे दोन किंवा अधिक भाग वापरले जातात. १५ % वनस्पतीचे तीन व चार भाग वापरले जातात. या वनस्पतींचे स्थानिक समाज जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या पुनरुत्पादनाची पुरेशी काळजी घेणे व काढणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

वनस्पतीला पुनरुत्पादन करण्यासाठी किंवा आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार्याे भागांना या अभ्यासात ‘अनिवार्य भाग’ असे म्हटले गेले आहे. वनस्पतींची पाने व देठ महत्वाचे असले, तरी मर्यादित काढणी झाल्यास वनस्पतींचे जीवनचक्र किंवा पुनरुत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. तसेच कोळू व रानहळदीसारख्या वनस्पतींच्या मुळांपासून अनेक नवीन झाडे तयार होत असतात, म्हणून मुळांची मर्यादित काढणी झाल्यास या वनस्पती तग धरू शकतात. मात्र फळे व फुले हे पुनरुत्पादनासाठी आवश्यक भाग आहेत. तसेच एकच कोंब फुटणार्या कंद वनस्पतींसाठी (जसे खुर्पुडी, पाचणकांदा) जीवनचक्र पूर्ण करायला त्यांचे कंद अनिवार्य असतात. अनिवार्य भागांच्या काढणीमुळे वनस्पतींच्या अस्तित्वाला थेट धोका असतो. म्हणून वनोपजांची विभागणी काढल्या जाणार्या भागाच्या अनिवार्यतेवर करणे गरजेचे आहे. अंजनेरी गडावरील ७७ टक्के वनस्पतींचे हे अनिवार्य भागच काढले जातात ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणूनच ही काढणी नियोजनबद्ध व नियंत्रित असायला हवी.

वनोपजांचे विविध उपयोग असतात. हिरडा, बेहेडा, आवळा यांचे औषधी उपयोग असतात. काहींचा आहारात उपयोग होतो जसे, चाई, कोळू, इ. काही वनस्पतींचे इतर उपयोग असतात जसे, शिळंदीची फुले गौरी-गणपतीच्या पूजेमध्ये वापरली जातात, कारवीच्या कुडाचा वापर घर बांधकामात होतो. काही वनस्पतींना एका पेक्षा अधिक उपयोगही असतात, जसे आंबट एडांगळी (वावडिंग) व कर्टूलांना औषधी उपयोग आहेत तसेच ते रानभाजी म्हणून खाल्लेासुद्धा जातात.

या अभ्यासात असे लक्षात आले की, अंजनेरीवरून काढल्या जाणार्या वनोपजांमधील 49 टक्के वनोपज केवळ आहारात वापरले जातात. २४ टक्के वनोपजांना केवळ औषधी उपयोग आहेत. २१ टक्के वनस्पतींना औषधी उपयोग असून, त्यांचा आहारातही वापर होतो. केवळ सहा टक्के वानोपाजांना इतर उपयोग आहेत. थोडक्यात, अंजनेरीवरून काढून विकल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये रानभाज्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर औषधींचे प्रमाण त्याच्या खालोखाल आहे.

वरील अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष म्हणून अतिकाढणीमुळे धोक्यात येऊ शकतील आशा वनोपजांची एक सूची तयार करण्यात आली आहे.

४७ पैकी १६ वनोपज (३० टक्के) स्थानबद्ध असल्याचे लक्षात आले आहे. या स्थानबद्ध वनस्पती केवळ पश्चिम घाटातच आढळतात. पाच वनस्पती (१२ टक्के) या दुर्मिळ किंवा अस्तित्व धोक्यात आलेल्या गटात मोडतात. या दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार झालेल्या नकाशातून असे लक्षात आले की, गडावरील पठारे व उतारावरील राने महत्त्वाची संसाधन क्षेत्र आहेत व स्वाभाविकच स्थानिक समजाच्या उपजीविकेसाठीही महत्त्वाची आहेत. कुठल्याही प्रकारचा ग्रामविकास आराखडा किंवा गावाचा वनसंवर्धन आराखडा तयार करताना या संसाधन क्षेत्राचे संवर्धन व व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे.

-जुई पेठे

7588109520

@@AUTHORINFO_V1@@