माणूस आणि बिबट्या : समज आणि गैरसमज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |


 
 

माणूस आणि बिबट्या यांच्यातील परसपर संबंधांमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी बिबट्या या प्राण्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा माणसावरच जास्त लक्ष देणे, ही काळाची गरज आहे...

 
 

बिबट्या! सोनेरी रंगावर गुलाबाच्या पाकळ्यांसारखे (Rosette) दिसणारे काळे पोकळ ठिपके असणारा एक सुंदर निशाचर मांसभक्षीय प्राणी! परिस्थितीशी खूप जुळवून घेणारा आणि वर्षानुवर्षे मानवी वस्तीच्या जवळ राहणारा असा हा मांजर कुळातील प्राणी Panthera pardus! इतर वन्यप्राण्यांप्रमाणेच बिबट्यासुद्धा माणसाला घाबरणारा प्राणी आहे. अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, बिबट्या हा उंदीर, बेडूक ते त्याच्या आवाक्यात बसणारे हरीण, सांबर असे प्राणी खाऊ शकतो. ‘International Union for conservation of Nature’ यादीनुसार बिबट्या हा vulnerable म्हणजेच असुरक्षित गटात मोडतो. अवैध शिकार आणि अधिवासाचा नाश अशा कारणांमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे, पण त्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या जीवशास्त्रामुळे तो त्याचे अस्तित्व टिकवून आहे.

 
 

पश्चिम घाटातील जुन्नर, अहमदनगर, संगमनेर, नाशिक, अकोले, औरंगाबाद यांच्या चहूबाजूने पर्वतरांगा नटलेल्या आहेत. जुन्नर, संगमनेर आणि नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक घेतले जाते आणि त्याचप्रमाणे फळभाज्यांची लागवड केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनही केले जाते. आपल्याकडे एक समज आहे की, वन्यप्राणी हे फक्त जंगलातच राहतात पण शेतीप्रधान असलेल्या आणि माणसांची घनदाट वस्ती असलेल्या या भागात लांडगे, कोल्हे, रानमांजर, उद मांजर, वाघोटी आणि बिबट्या या प्राण्यांचा वावरसुद्धा आढळतो. संरक्षित जंगलाच्या हद्दी या लोकांनी स्वतःसाठी बनविलेल्या आहेत पण प्राण्यांना या हद्दी कशा कळणार? ६०-७० वर्षांपूर्वी असणारी खडकाळ जमीन, ही जेव्हा या भागात धरणे, कालवे बांधले तेव्हापासून सुपीक बनायला सुरुवात झाली. लांबच लांब वसलेले उसाचे फड आणि शेतीचे मळे हे लपायला जागा, पाणी आणि खायला खाद्य पुरवित असल्याने या प्राण्यांचा अधिवास बनले आहेत. बिबट्याकडून पशुधनाची हानी आणि काही वेळा शेतात काम करत असताना संध्याकाळच्या वेळी अथवा रात्री त्याचं दर्शन होणं अशा घटना सहसा घडतात. बिबट्याकडून मनुष्यहानी झाल्याच्या घटनांच्या खूप कमी नोंदीसुद्धा आहेत. माणसाला घाबरणारा असूनसुद्धा आणि माणसाला टाळण्याची प्रवृत्ती असूनसुद्धा वरील काही कारणांमुळे त्याची प्रतिमा ही नकारात्मक झाली आहे.

या भागातील लोकांचा या मांजर कुळातील मोठ्या मांजरासोबत पिढ्यान्‍पिढ्या सहवास नसल्यामुळे त्यांना बिबट्याच्या सवयींबद्दल फारशी माहिती नसते. अशा अज्ञानाचे रूपांतर काही प्रश्नांमध्ये होते. जसे की, ‘हे बिबटे शेतात का राहतात? एवढे बिबटे आले कुठून, कोणी सोडले आहेत का या भागात? या प्रश्नांची नीट उत्तरे मिळाली नसल्यामुळे यातूनच काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. जसे की, बिबट्यांची जागा जंगलातच आहे म्हणून त्यांना जंगलात परत सोडून दिले पाहिजे. आपल्या भागात बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे, (पण प्रत्यक्षात यावर संशोधन झालेले नाही) माणूस हे त्याचे अन्न आहे,’ इ.

 
 

या लाजाळू असलेल्या प्राण्याबद्दलची अपुरी असलेली माहिती लोकांच्या मनात भीती निर्माण करते. या भीतीमुळे या प्राण्याला पकडा आणि दूर सोडून द्या,’ असे गार्‍हाणे लोकांकडून शासकीय खात्यांकडे मांडले जाते पण प्रत्यक्षात संशोधनानुसार पुढील गोष्टी दिसून येतात:

१. प्रत्येक बिबट्याचे स्वतःचे एक क्षेत्र (Territory) असते. एखाद्या भागातून एक बिबट्या काढला तरी ती जागा रिकामी राहत नाही. ती जागा दुसर्‍या बिबट्याकडून घेतली जाते. त्या भागात खायला मुबलक खाद्य, पाणी आणि लपायला जागा हे पुरेसे उपलब्ध असल्यास एकापेक्षा जास्त बिबटे तिथे राहू शकतात. त्यामुळे बिबटे पकडून दुसरीकडे सोडल्यास त्यांची संख्या कमी तर होत नाहीच पण वाढते.

. एखाद्या बिबट्याला दूर जरी सोडले तरी आपल्या घरातील मांजराप्रमाणेच बिबट्यासुद्धा त्या जागी परत येण्याचा प्रयत्न करतात.

. एखादा बिबट्या एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे सोडल्यास परिस्थितीला गांगरून गेल्यामुळे माणसासाठी हानिकारक ठरू शकतो. पण तरीही आपल्याला या प्राण्याबद्दल खूप कमी माहिती आहे. या प्राण्याच्या सवयींबद्दल आणि जीवशास्त्राबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवून घेण्यासाठी संशोधनाची खूप गरज आहे. ग्रामीण भागात जिथे या प्राण्यांचा वावर आहे, अशा भागात संशोधनाचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येतो.

 
 

बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्पर संबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी जाणता वाघोबानावाचा एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. जानेवारी २०१६ साली हा प्रकल्प जुन्नर आणि संगमनेर येथे सुरू करण्यात आला आणि ऑगस्ट २०१७ साली नाशिकमध्ये हे काम सुरू करण्यात आले. जाणता वाघोबाहा प्रकल्प महाराष्ट्र वनविभाग, रफर्ड फाऊंडेशन, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी- इंडिया आणि इडल फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला आहे. वनविभागातील अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, कलाकार, शिक्षक या सगळ्यांनी एकत्र येऊन ही मोहीम सुरू केली.

 
 

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काही साधने बनविण्यात आली, ज्यात बिबट्याचे जीवशास्त्र आणि सुरक्षिततेचे उपाय रेखाटण्यात आले आहेत. लोकांशी आणि मुलांशी प्रभावीपणे संपर्क साधण्यासाठी कला या माध्यमाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने ही साधने बनविण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या भागात स्वतःची आणि स्वतःच्या पशुधनाची काळजी घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत अशा स्वरूपात ही माहिती मांडली आहे. ही सर्व माहिती संशोधन आणि जे समूह या मार्जार कुळातील प्राण्यांसोबत एकाच अधिवासात राहतात त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्रामध्ये वारली, गौंड, महादेव कोळी आणि ठाकर असे काही समूह आहेत जे बिबट्या या प्राण्यासोबत पिढ्यान्‍पिढ्या पारंपरिकरित्या राहतात. त्यामुळे त्यांना बिबट्याच्या सवयी आणि आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, यावर सखोल ज्ञान असते. हे समूह वाघाला अथवा बिबट्याला ‘वाघोबाच्या रूपात पूजतातसुद्धा! ज्याप्रमाणे गावाच्या वेशीवर गावदेवीची मूर्ती असते, त्याचप्रमाणे काही ठिकाणी गावदेवीच्या बाजूला वाघोबाला देखील पूजले जाते. वाघोबा ही एखादी मूर्तीही असू शकते अथवा दगडाच्या स्वरूपातही असू शकते. लोकांची श्रद्धा अशी आहे की, गावदेवी गावाची रक्षा करते त्याचप्रमाणे वाघोबा जंगलाचे रक्षण करतो आणि वाघ किंवा बिबट्या आमच्या पशुधनावर हल्ला करत नाही. या वाघोबाची पूजा वाघबारशीला केली जाते आणि त्याला नैवैद्य दाखविला जातो. एखाद्या पाळीव प्राण्यावर हल्ला झाला अथवा माणसाला त्याने काही त्रास दिला तर लोकांचे म्हणणे असते की, आमच्या जंगलातील हा वाघ नव्हता, हा बाहेरचा वाघ असू शकतो. या भागातील लोकांना बिबट्याबद्दल इत्यंभूत माहिती असल्यामुळे तोही आपल्या सभोवतालच्या सृष्टीचा भाग आहे, याची जाणीव या लोकांमध्ये असते.

 
 

नाशिकमधील निफाड तालुका हा गोदावरी नदीच्या काठावर वसलेला असून सुपीक म्हणून ओळखला जातो. जनजागृतीसाठी बिबट्याचा वावर असलेल्या गावातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मानव-बिबट्या परस्पर संबंध यांवर व्याख्यान आयोजित करण्यात येते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या समजण्याच्या पात्रतेनुसार माहिती देण्यात येते. या व्याख्यानानंतर मुलांशी चर्चा करण्यात येते आणि मुलांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात येते. व्याख्याने आयोजित करण्याच्या अगोदर गावाच्या सरपंचाशी चर्चा करण्यात येते. मुख्याध्यापकांची भेट घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. ११ वी ते १७ वी च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव अभ्यासकांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते. या व्याख्यानामध्ये संशोधनाचे महत्त्व सांगितले जाते. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये संशोधन करण्यासाठीदेखील संधी उपलब्ध असतात, अशा बाबी खूप कमी प्रमाणात माहीत असतात. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास कदाचित याच भागातील हे विद्यार्थी मोठे होऊन संशोधन करण्यास सुरू करतील!

 
 

ज्या मुलांना प्रबोधन करण्यात गोडी आहे, अशा मुलांना निवडले जाते आणि असे विद्यार्थी ‘बिबट्यादूतम्हणून ओळखले जातात. या मुलांची ही जबाबदारी असते की, आपल्याच गावातील लोकांना बिबट्याच्या सवयी, स्वतःची आणि आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती देणे. या मुलांना लोकांना माहिती देण्यासाठी पत्रके, बिबट्यादूत असल्याचे ओळखपत्र आणि एक कापडी पिशवी अशी साधने पुरवली जातात. एका शाळेतील मुलांनी एक छोटासा उपक्रम गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये राबविला, जिथे या मुलांनी गावकर्‍यांना ही माहिती दिली. गावाचे सरपंच आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागरूकताया विद्यापीठाच्या आवश्यक असलेल्या विषयांतर्गत २५ गुणांसाठी प्रकल्प सादर केले. निफाडमधील दोन महाविद्यालयांतील ६७ बिबट्यादूतांनी कमीत कमी पाच कुटुंबांना ही माहिती पुरवली. हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा खूप मोठा आधार होता.

 
 

जेव्हा या तरुण पिढीतील मुलांनी लोकांना माहिती देण्यास सुरुवात केली, तेव्हा असे दिसून आले की, लोक आपल्याच गावातील मुलांकडून ही माहिती ऐकून घेण्यास उत्सुक होते. जरी मानव आणि बिबट्या यांबाबतीत नकारात्मक घटना घडत असल्या तरी लोकांनी बिबट्याबद्दल जाणून घ्यायची तयारी दर्शवली. या बिबट्यादूतांना लोकांकडून काही प्रतिक्रिया मिळाल्या, त्या पुढीलप्रमाणे, “तुम्ही मुलांनी ही माहिती गावातील प्रत्येक माणसाला दिली पाहिजे, कारण ही माहिती आमच्या दैनंदिन कामात उपयोगी पडणारी आहे. प्रत्येक कुटुंबात ही माहिती देण्यापेक्षा अशी माहिती गावात सार्वजनिक ठिकाणी दिली तर जास्त योग्य ठरेल. ही माहिती लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचली तर बिबट्याबद्दलची भीती कमी होण्यास मदत होईल.लोकांना ही कल्पना खूप आवडली की, स्थानिक महाविद्यालयांकडून असे प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचबरोबर ज्या व्याख्यानांचे नियोजन शाळेत करण्यात आले होते, त्यासंबंधी शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी माहिती दिली होती.

 
 

‘बिबट्यादूतांनी सुद्धा आपल्या काही कल्पना आणि प्रतिक्रिया आपापल्या प्रकल्पामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. जसे की, प्रत्येक गावात एक बिबट्यादूत असावा जेणेकरून तो लोकांना अद्ययावत माहिती देत राहील. ही माहिती मोठ्या फलकांवरून छापून गावात वर्दळीच्या ठिकाणी लावावी, जेणेकरून ती जास्तीत जास्त लोकांना कळेल. आम्हाला पण आमच्याच गावात आपल्याच लोकांना माहिती देऊन समाजसेवा करण्याची संधी मिळाली. आम्हाला पण बिबट्याबद्दल खूप कमी आणि चुकीची माहिती होती. त्यामुळे लोकांना आणि घरच्यांना योग्य माहिती दिल्यामुळे हे काम करण्यात खूप मजा आली. असे आणखी प्रकल्प वनविभाग आणि महाविद्यालयांनी राबविले पाहिजेत.काही ठिकाणी बिबट्याकडून माणसाला हानी होत आहे तर काही ठिकाणी माणसाकडून बिबट्यांचा अकारण मृत्यू होत आहे.

 
 

या सर्व प्रकल्पांमुळे सगळ्याच घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, जसे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, महसूल विभाग, प्रसारमाध्यमे, गावकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुण पिढी! हीच तरुण पिढी या भागातील बिबट्यांचे अस्तित्व लोकांच्या मदतीने टिकवून ठेवू शकते. या भागातील लोकच हा प्रश्न नीट समजू शकतात, जर योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर! या परिस्थितीत प्रसारमाध्यमे खूप महत्त्वाची भूमिका दर्शवितात. प्रसारमाध्यमांची पोहोच समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत असते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की, प्रसारमाध्यमे हा विषय कसा मांडतात?

 
 

जाणता वाघोबाया प्रकल्पांतर्गत लोकांकडून आलेल्या प्रतिक्रियांमुळे असे दिसून येते की, जरी माणूस आणि बिबट्या यांच्यातील संबंध काही ठिकाणी नकारात्मक असले तरी लोकांनी बिबट्याबद्दल जाणून घ्यायची तयारी दाखवून या प्राण्यांसोबत सहजीवन कसे करू शकतो, हे शिकण्याची जिज्ञासा दाखविली. एवढ्या कमी वेळात या जनजागृतीचे सकारात्मक परिणाम जरी दिसू शकत नसले तरी ही तरुण पिढी या माहितीचा वापर भविष्यात नक्कीच करेल. वनविभागातील स्थानिक कर्मचार्‍यांनी योग्य ती माहिती लोकांना देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक कर्मचारी म्हणजेच असे कर्मचारी, ज्यांच्याशी गावकरी जास्तीत जास्त बोलू शकतात आणि आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. वन्यप्राण्यांनी आधीच माणसासोबत राहण्याची कला अवगत केलेली आहे, आता आपली जबाबदारी या प्राण्यांसोबत सहजीवन साधण्याची!

 
 

जाणता वाघोबाया प्रकल्पामध्ये काम करताना असे वाटले की, संवर्धक असे स्वतःला म्हणण्यापेक्षा या सगळ्याच घटकांमधील व्यवस्थापक म्हणून काम करणे हे उचित ठरेल. जाणता वाघोबाहा प्रकल्प माणूस आणि बिबट्या दोघांसाठी उपयोगी ठरू शकतो. माणूस आणि बिबट्या यांच्यातील परसपर संबंधांमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी या प्राण्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा माणसावरच जास्त लक्ष देणे, ही काळाची गरज आहे. एखाद्या भागातील पर्यावरणासंबंधी जे संशोधन केले असेल ते तिकडच्या स्थानिक लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचले तर पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग असणे अनिवार्य आहे. एखाद्या संवर्धनामध्ये माणूस आणि प्राणी यांना समान प्राधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे.

 

- मृणाल घोसाळकर

9960825055

(लेखिका मानव आणि बिबट्या संघर्ष निवारणावर काम करतात.)

@@AUTHORINFO_V1@@