बेडूक बाहेर पडू लागले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018
Total Views |



 

 
 
१९७७ ला जे घडले ते इंदिरा गांधींच्या कर्माने. २०१९ हे नरेंद्र मोदींचेच आहे, हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र, सत्तेसाठी हे सगळे बेडूक कसे सरसावले आहेत आणि हे एकत्र कसे नांदणार हे पाहाणे रंजक ठरेल.
 
 

मुंबईत मान्सून आल्याची वर्दी कालच्या पावसाने दिलीच आहे. मूळ मान्सून येण्यापूर्वी असा थोडासा शिडकावा होतच असतो. मात्र, या पावसालाच खरा मान्सून मानून डराँव डराँव करणार्‍या बेडकांच्या काही जाती असतातच. देशातल्याराजकीय मान्सूनविषयी बोलायचे तर तो खरे तर २०१९ ला येणार आहे. कर्नाटकातली जुळवाजुळवी म्हणजेच, मोदींचाच संपूर्ण पराजय असे वाटून अनेक बेडूक खुश झाले आहेत. देशभरातील राजकीय बेरोजगारांना कर्नाटकनंतर रोजगाराच्या संधी दिसू लागल्या आहेत. २०१४ ला केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते. लालू वगैरे सारख्यांचे तर दाणा- पाणी सोडाच, पण घरात राहाणेही अशक्य झाले होते. आजघडीला देशातील काही तुरळक राज्ये सोडली, तर संपूर्ण देशातच अशा असंतुष्टांच्या फौजा तयार झाल्या आहेत. गंमत म्हणजे, महाराष्ट्रातून या सगळ्यांना म्होरक्या मिळावा यापेक्षा मजेशीर काय असणार?

 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण, कृषी मंत्री शरद पवार यांना या सगळ्या असंतुष्टांचे नेतृत्व करण्याची संधी हवी आहे. संधी हवी आहे म्हणजे तसे सूतोवाच खुद्द पवार साहेबांनीच केले आहे. तसे तेच करणार, यात काही शंका नाही. कारण, कुणीही पवारांना स्वत:हून आवताण देणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे, इतक्या मोठ्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी जे काही केले, त्यात त्यांनी सर्वकाही कमावले. त्यांचे आश्रित त्यांनाजाणता राजाम्हणतात. काही उपकृत त्यांनासर्वाधिक समज असलेला राजकीय पुढारीम्हणतात. कुणी त्यांना शेतीत काय काय कळते, याच्या गोष्टी सांगतात. केंद्रात युपीएचे सरकार असताना त्यांचा दबदबाही मोठा होता. किमान पवार साहेबांचे भाट तसे दर्शवायचे तरी. त्यांच्या पंच्याहत्तरीला तर राजकीय तारांगणातले सगळेच तारे अवतरले होते. सारे सारे पवार साहेबांच्या पदरात पडले आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पवार साहेबांना कमावता आली नाही आणि ती म्हणजे, विश्वासहर्ता. आजही पवार साहेबांच्या नावाने खर्‍या खोट्या गोष्टी महाराष्ट्रात सांगितल्या जातात. मग ते जेजे हत्याकांड असो, लवासा असो किंवा अन्य काही, यात खरे काय, खोटे काय पवारच सांगू शकतात. मात्र, तसे करण्याच्या ते भानगडीत पडत नाही. पवारांना विश्वासहर्ता कमावता आली नाही, त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी सतत बदललेल्या भूमिका. आजही पवार तेच करीत आहे.
 

निमित्त आहे ते नरेंद्र मोदींच्या सरकारचे. युपीए-१च्या आधी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा ज्यांनी तापविला होता त्यात शरद पवार आघाडीवर होते. इतके की त्यांनी काँग्रेस सोडून नव्या पक्षाची स्थापना केली होती. पण, जसे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळाले, तसे पवार सरळ उठले आणि युपीएत सहभागी झाले. तेव्हा त्यांना सोनिया जाचत होत्या. मधल्या काळात जेव्हा राहुल गांधींचा अवाका उघडा पडायला लागला, तेव्हा काँग्रेसचे वाईट दिवस आले होते. विरोधकांच्या पोटनिवडणुकांमधल्या विजयांनी या सगळ्यांना वेगळे दिवस येतील असे वाटायला लागले आहे. ज्या राहुल गांधींनी आता थोडे समंजस व्हायला हवे, असे पवार सांगत आहेत, त्याच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसलाअच्छे दिनयेणार असल्याची भविष्यवाणी पवार करू लागले आहेत. भाजपविरोधी सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण त्यांचे नेते होऊ शकतो, हे पवार सांगत आहेत. कारण, त्यांची पंतप्रधान होण्याची आकांक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही, मात्र त्यासाठी उत्तम अधिष्ठानही असावे लागते. केवळ राजकीय जोड-तोड करून कुणालाही त्या पदापर्यंत पोहोचता आलेली नाही. देवेगौडा, गुजराल वगैरे जी मंडळी अशा लॉटर्यांचे धनी ठरले, त्यांना देशातील जनता कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी स्मरत नाही.

 
१९७७ सालचे दाखले पुन्हा पुन्हा काढून देण्याची सध्या स्पर्धाच लागली आहे. लोकांनी इंदिरा गांधींनी पदच्युत केले होते आणि त्यांचे सर्वच विरोधक एकवटल्याने त्यांना राजकीयद़ृष्ट्या पराभूत करता आले होते. बुडत्याला काडीचा आधार वाटतो, तसा या राजकीय बेरोजगारांना कुठे ना कुठे या प्रसंगाची पुनरावृत्ती होईल असे वाटते. आता ही शक्यता खरी मानायची ठरविली तरी त्याच अनेक किंतु-परंतु आहेत. एक तर जनता सरकारचे नंतर काय झाले हे सार्‍या देशाने पाहिले आणि दुसरे म्हणजे, इंदिरा गांधींचे सरकार गेले होते, ते त्यांच्या कर्मांमुळे. विरोधकांच्या एकवटण्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता. विरोधक त्यापूर्वीही संदर्भहीन होते आणि नंतरही संदर्भहीनच झाले. पवार साहेबांसारख्या माणसाला हे सारे काही कळत नाही असे नाही. पण, या वयातही नेतृत्व करण्याची खुमखुमी इतकी जबरदस्त आहे की, त्यापुढे त्यांना काहीही दिसत नाही. इंदिरा गांधींना चढलेली सत्तेची नशा इतकी जबरदस्त होती की, त्यांना स्वत:च्या पलीकडे काहीच दिसत नव्हते. या सगळ्यात संजय गांधींनी स्वत:ची म्हणून अजून काही वेगळी भर घातली. या सार्‍याचा मिळून जो काही परिणाम होता तो सार्‍या देशाने पाहिला, अनुभवला आणि सोसला देखील. म्हणूनच जनतेने इंदिरा गांधींना त्यांची जागा दाखविली.

इथे खरे तर परिस्थिती उलटी आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात जे एकवटले होते त्यात थोडे फार बरे तरी लोक होते. इथे या सगळ्यांचे शिरोमणी असलेले राहुल गांधी आहेत, त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या सोनिया गांधी आहेत. गावरान लालूंचा मुलगा ‘यशस्वी’ यादव आहे. पराभूत माया-मुलायम आहेत, लहरी ममता बॅनर्जी आहेत, सगळीकडूनच पाया उखडत चाललेले डावे आहेत. आता या सगळ्यांचे नेतृत्व पवार करणार आणि त्यांना भारताची जनता आपला कौल देणार, ही कल्पनाच मुळी हास्यास्पद आहे. २०१९ हे नरेंद्र मोदींचेच आहे हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र, सत्तेसाठी हे सगळे बेडूक कसे सरसावले आहेत आणि हे एकत्र कसे नांदणार, हे पाहाणे रंजक ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@