परंपरेने घालावूया प्लास्टिकला....

    05-Jun-2018
Total Views |



 

आपल्या भारतीय संस्कृतीत केळ, रानकेळ, कर्दळ, चामूळ, भुईउंबर, वड, मुचकुंद, कुडा, कमळ, चांदा, करमळ अशा अनेक पानांमध्ये वा त्यांच्या पत्रावळ्यांमध्ये जेवण वाढून घ्यायची परंपरा असताना आपण हल्ली प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्रदूषणकारी प्लेट्स का वापरतो...?

Beat plastic pollution हे यावर्षीच्या पर्यावरण दिनाचे ब्रीदवाक्य आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्लास्टिकचा वापर कमी करावा, त्याला शाश्‍वत पर्याय निवडावा, हा संदेश सगळीकडे पोहोचविण्याचा त्यामागचा उद्देश आहे. प्लास्टिक कचर्‍यामुळे जमीन तर प्रदूषित झालीच पण आता जलाशय, समुद्रदेखील धोक्यात आले आहेत. म्हणूनच हा विषय निवडण्यात आला आहे.

पर्यावरण दिवसाचे यंदाचे यजमानपद स्वीकारताना भारताचे पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि जीवनशैली पर्यावरणस्नेही असल्याची ग्वाही दिली. “भारत स्वच्छ, सुंदर, हरित पृथ्वीबद्दल कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. पण आपल्याकडे असलेला प्लास्टिकचा कचरा बघून हे असत्य वाटेल. पूर्वी फक्त प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. आता आणखी भर पडत चालली आहे, ती वापरा आणि फेकाप्रकारच्या न कुजणार्‍या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या ताटल्यांची. शहरातच नव्हे, तर लहानसहान गावांमध्ये-पाड्यांमध्येही यांचा खच पडलेला असतो.

मध्यंतरी एका जर्मन कंपनीबद्दल वाचण्यात आलं. Leaf Republic’, ही स्टार्टअप कंपनी भारतीय पत्रावळ्या-द्रोणांपासून प्रेरित झाली. पर्यावरपूरक(Ecofriendly), शाश्‍वत Tableware म्हणजेच ताट-वाट्या, ट्रे ही कंपनी बनवते. भारतातून आणि दक्षिण अमेरिकेतून पानांचा कच्चा माल आणून त्यांच्या सुबक वस्तू बनवल्या जातात. आता युरोपभर त्यांना चांगली मागणी आहे.

 

भारतातून पत्रावळ्या नेण्याचे प्रयोजन काय?

आपल्याकडे पत्रावळ्यांची परंपरा आहे आणि वनस्पतींची प्रचंड मोठी जैवविविधतादेखील आहे. म्हणाल तशा पानांच्या वनस्पती आपल्याकडे आढळतात. मोठी पानं, जाड-चिवट, चकचकीत आणि टिकाऊ असे पानांचे गुणधर्म जाणून आपल्याकडे पत्रावळ्यांसाठी ती निवडली गेली. दुर्दैवाने सामान्य माणूस सोयीच्या नादाने अनैसर्गिक पर्याय निवडू लागला. परंतु सुदैवाने उच्चभ्रू खाद्य संस्कृतीत ‘Ethnic’ या नावाने ही परंपरा परत येत आहे. अलीकडे बंगळुरू येथे एका छानशा हॉटेलात जेवायला गेलो, तर चक्क केळीच्या पानात व द्रोणात बिर्याणी होती. बराच वेळ अन्नापेक्षा पॅकिंगचं कौतुक झालं. दक्षिण भारतात अजूनही काही ठिकाणी केळीच्या पानांत नियमितपणे अन्न वाढलं जातं. आपल्याकडे सणासुदीला नैवैद्य वाढायला किंवा श्रावण सोमवारी केळीच्या पानात जेवण्याची पद्धत अजूनतरी टिकली आहे. केळीची पानं जेव्हा सर्रास वापरली जायची तेव्हा त्याचे बरेच अलिखित नियम असायचे. घरच्या घरी जेवायचं असेल तर परसातली, मोठा सोहळा असेल तर चारचौघांच्या घरची पानं गोळा केली जात. बाजारातून पानांची वळकटी आणली की, पानं स्वच्छ पुसून, कापून, दोन पाटांच्या मध्ये दडपून ठेवली जात, जेणेकरून ती ताठ राहत. पान मांडताना खालचा भाग जमिनीवर, निमुळता टोकाकडचा भाग डावीकडे अशी विशिष्ट रचना असे. (आमच्याकडे आणखी एक नियम होता. टोकाकडचं अखंड पान पाहुण्यांना आणि देठाकडचं घरच्यांना. त्यातून उरलेले तोकडे लहानसहान तुकडे संध्याकाळी सत्यनारायणाचा प्रसाद द्यायच्या कामी किंवा दुसर्‍या दिवशीच्या नाश्त्याच्या कामी यायचे. श्रावणात केळीच्या पानासारखी पानं येतात. ती रानकेळीची असतात. त्यांना ‘चेवणी’ किंवा ‘कवदर’ असेही म्हणतात. ‘Ensete Superbum’ हे त्यांचे शास्त्रीय नाव. पावसाळ्यात रानात, कड्याकपारींवर याची कळीसारखी पण बुटकी, गच्च पानांची झाडं दिसू लागतात. क्‍वचित यांना फळंही लागतात. छोटी छोटी केळी, त्यात टपोर्‍या बिया असतात. याची पानं केळीच्या पानांपेक्षा जाड, चिवट असल्याने ती सहज फाटत नाही. त्यांचे दुमडून द्रोणही करता येतात. पावसाळ्यात वनवासी, धनगर समाजातले लोक ही पानं बाजारात विकायला आणतात.

केळीच्या पानावर जेवण्याची लज्जत औरच. पानावर गरम अन्न वाढलं की, पानातले ‘polyphenols’ हे द्रव्य त्यात मिसळते. हळदीच्या पानावर वाफवलेल्या पाटवड्यांना जशी पानांची चव असते तसं. तसेच या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे अन्नपचन चांगलं होतं. केळीच्या पानासारखीच पण लहान अशी कर्दळीची पानंदेखील वापरली जातात.

पत्रावळी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती पळसाची पानं जोडलेली थाळी आणि त्यासोबत तशाच पानांचा द्रोण. पूर्वापार आपल्याकडे बांबूच्या बारीकशा काडीने शिवलेल्या या पत्रावळ्या वापरल्या जात आहेत. त्याचं रूप थोडं फार बदलत गेलं. काड्या निखळतात म्हणून पानं चक्क शिवली गेली. मग त्यांची मजबुती वाढावी म्हणून त्यांना प्लास्टिकचं वेष्टन देण्यात आलं. मशीनद्वारे प्रेस करून आकार देण्यात आला, पण प्लास्टिक थर्माकोलच्या रेडिमेड प्लेट्ससमोर या पत्रावळ्या मागे पडल्या. या पत्रावळ्या वनवासी लोकांना एक चांगला व्यवसाय देतात. त्यांना आर्थिक पाठबळ मिळतं. आपल्याकडे जशा पळसाच्या पत्रावळ्या आहेत, तशा ओडिशा राज्यात साल आणि चामुळच्या पानांचा वापर होतो. आपट्याचा कुळातल्या चामूळ’(bauhinia vahlii) चा मोठा वेल असतो. याची आपट्यासारखीच पण मोठाली पानं असतात. अगदी दुर्गम आणि आर्थिक दृष्टीने वंचित भागातल्या वनवासी लोकांसाठी चार पैसे कमवायचं साधन म्हणजे या पत्रावळ्या बनवणे. एकीकडे या लोकांना आर्थिक पाळबळ मिळावे आणि चामूळचे वेलदेखील टिकून राहावे, यासाठी एक प्रथा आहे. जगन्नाथाच्या स्नान उत्सवाच्यादिवशी चामूळच्या मातीच्या गोळात साठवून ठेवलेल्या बिया काढून पेरल्या जातात.

वडाच्या पानांच्याही पत्रावळ्या लावतात. त्या व्यावसायिक स्तरावर विकल्या जात नाहीत, पण तात्पुरत्या लावल्या जातात. वडाची पानं खालून जरी लवयुक्त असली तरी वरून चकचकीत आणि घट्ट असतात, तसंच सगळीकडे सहज आढळतात. शिवाय औषधी गुणधर्म असतातच. तुम्ही कधी फेरीवाल्याकडे खरवस खाल्ला आहे? ज्या पानात तो खरवस आपल्याला देतो, ती वडाच्या कुळातल्या बोकेडाकिंवा भुईउंबराची असतात. वडाच्या कुळातलं भुईउंबर, (Ficus Hispida) हे झुडूपवजा झाड शहरात अगदी लहानशा जागेतही वाढतं. फेरीवाले अशाच पानांच्या शोधात असतात. क्वचित आपण ज्याला शोभेचं रबर प्लान्टम्हणतो त्याच्या चकचकीत, ताठ पानांचाही वापर केला जातो. जिथे ज्या वनस्पती उगवतात, योग्य असतात, तिथे त्यांचा वापर होतो. आम्ही आसाममध्ये असताना बर्‍याचदा वडाच्या कुळातल्या एका मोठ्या पानाचा वापर करायचो. Ficus Auriculata’याचे शास्त्रीय नावापेक्षा इंग्रजी नाव, Elephant ear fig जास्त समर्पक आहे. ताज्या पानांच्या पत्रावळ्यांचे गुणधर्म अन्नात उतरतात, हे सिद्ध झाले आहे. कोकणात अजूनही लहान मुलांना भात भरवायला कुडाच्या पत्रावळ्या लावतात. ‘hollarhena antidysentrica’ हे कुड्याचं नाव. कुड्याचं पाळ पूर्वी घरोघरी असायचं. ‘Amebiosis’ वर जालीम उपाय. पानांवर गरम भात, मीठ-तूप कालवून भरवलं की, मुलाला प्रत्येक घासातून सूक्ष्म प्रमाणात औषधयुक्त अन्न पोटात जायचं. वैद्य भाग्यश्री टिळकांना परवा अशीच एक परंपरा सांगितली- पिंपळाच्या पानावर तोतर्‍या मुलांना भात भरवला जातो!

काही पानं एवढी मोठी असतात की, एक पान घेतलं की, एक ताट झालं. बिहारमध्ये कमळाची लागवड केली जाते. तिथे याच्या पानांचा खूप वापर होतो. अन्न वाढायला, ते बांधून न्यायलादेखील. मुचकुंद नावाचा एक अप्रतिम सुवासिक फुलांचा वृक्ष आहे. त्याचे इंग्रजी नावच ‘dinner plate tree’ असं आहे, एवढी मोठाली पानं की, त्यावर एक मनुष्य सहज जेऊ शकतो, त्याच्या पानाची रचना अशी की, अन्न उरलं तर गुंडाळून घेऊन जाता येईल. आमच्याकडे शेतावर ठाकर गडी आहेत, त्यांच्याकडे करमळची पानं अगदी सहज वापरली जातात. खरंतर हे पान अत्यंत देखणं, नक्षीदार, कातरलेली कड असलेलं आणि चकचकीत हिरवं. चार माणसं जमली की चार पान तोडून आणायची, झालं काम. त्यानेच मला आणखी काही पानांची ओळख करून दिली. चांदा (Macaranga Peltata) नावाचा एक वृक्ष आपल्याकडे आढळतो. याचं पान काहीसं कमळासारखं दिसतं. देठ पानाखालून निघतं. त्यामुळे पान अखंड गोल असतं. पितृपक्षात याची पानं नैवेद्य वाढायला घेतात. लालबागच्या बाजारात पितृपक्षात चेराची मोठी पानं विकायला येतात, ती याच्यासाठीच.एक गंमतशीर पान आहे. आपल्याकडे पत्रावळी म्हणून नाही, पण लहानशी वाटी म्हणून याचा उपयोग होऊ शकेल असं. त्याचं नाव माखन कटोरी’, शास्त्रीय नाव ‘Ficus Krishnae’. कृष्ण म्हणे याच्या पानात लोणी लपवत असे.

आपल्याकडे एवढी विविधता एवढी संपदा असताना आपण प्लास्टिक थर्माकोलच्या आरोग्याला, पर्यावरणाला घातक प्लेट्सचा वापर करतो. किती नतद्रष्टपणा!

अंजना देवस्थळे

9082333633

लेखिका उद्यानविद्या‘ (Horticulture) विषयातल्या तज्ज्ञ सल्लागार आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.