मुंबईतील पर्जन्यजलवाहिन्यांची सद्यस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018   
Total Views |

 


 
दोन दिवसांच्या मान्सूनपूर्व सरींनीच मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात काय परिस्थिती उद्भवेल, याचे ट्रेलर दाखवले. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या, नालेसफाई, धोकादायक स्थळे यांचा या लेखात घेतलेला आढावा...
 

मुंबईतील २६ जुलै २००५च्या मोठ्या पुरानंतर बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील पर्जन्यवाहिनीच्या संरचनेमध्ये (Brimstowad project) दरवर्षी मोठे पूर घडू नये म्हणून मोठे बदल घडवायचे ठरविले आहे. या पर्जन्यवाहिनी प्रकल्पबदलामुळे ८ उदंचन केंद्राची (pumping stations) कामे व १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ५८ पर्जन्यवाहिन्या बदलण्याचे छोटे प्रकल्प २००६ मध्ये संरचित केले गेले आहेत.

या संरचनेत पर्जन्यवाहिनीची क्षमता तासाला २५ ते ३० मिमी ऐवजी तासाला ५० मिमी तीव्रतेचा पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा होण्याच्या म्हणजे दुप्पट क्षमतेची बनविली जाणार आहेत. परंतु, त्याकरिता सर्व पर्जन्यवाहिनी प्रकल्प लवकर पूर्ण होणे जरुरी आहे. या प्रकल्पांकरिता चार हजार कोटी अंदाजे खर्चाकरिता नियोजित केले गेले आहेत.

 

पर्जन्यवाहिनी प्रकल्पांकरिता नियोजन

 

जलनिचर्याच्या कामाकरिता (hydrology) एक समिती नेमली आहे. काही अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यात पुराचे नियंत्रण कसे करावयाचे व जलव्याप्ती पातळीचा (run off levels) नकाशा आराखडा कसा बनवायचा, याचे तंत्रज्ञान शिकविले गेले. पण, पालिकेकडून असा आराखडा बनविला गेला नाही.

२००६ मध्ये पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिक वापरावर बंदी आणली होती. कारण, असा प्लास्टिक घनकचरा पर्जन्यवाहिन्या तुंबवून टाकतात. परंतु, पालिकेने वाहिन्या स्वच्छ करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत तरी वाहिन्यांमध्ये मुंबईकरांकडून प्लास्टिकचा घनकचरा टाकला जातो आणि पर्जन्यवाहिन्या तुंबतात, असे पालिकेचे म्हणणे आहे. आता सरकारने सर्व प्लास्टिक वापरावर बंदी आणली आहे.

 

डॉप्लर रडार बसविला

 

भारतीय हवामान खात्यातर्फे (IMD) रु १५ कोटी खर्च करून कुलाबा भागात एक रडार बसविला आहे. यामुळे मुंबईत नजीकच्या भविष्यात किती तीव्रतेने पाऊस पडणार त्याचा अंदाज येतो. परंतु, हा रडार ऐन पावसाळ्यात योग्य काम करत नसल्याची माहिती मिळाली आहे. दुसरा रडार अंधेरीच्या वेरावळीला अजून बसवायचा आहे. तो कधी बसणार ते माहिती नाही.

 

पर्जन्यवाहिनी बदलण्याचे किती काम झाले?

 

गेल्या १२ वर्षांत पर्जन्यवाहिन्यांच्या संरचित कामापैकी अर्ध्या कामाचे प्रकल्पसुद्धा पालिकेकडून पूर्ण होऊ शकले नाहीत. पालिकेच्या माहितीप्रमाणे, फक्त २८ प्रकल्प पूर्ण झाले व २७ प्रकल्प अर्धवट पूर्ण झाले आहेत. या २७ बाकी कामांपैकी ११ प्रकल्प हे पूर्व उपनगरातील, ९ पश्चिम उपनगरातील व ३ मुंबई बेट विभागातील आहेत, तर काही प्रकल्पांकरिता अजून निविदा सुद्धा मागविण्याचे काम बाकी आहे.

८ संरचित उदंचन केंद्रांपैकी मुंबई मनपाकडून गझदरबंद उदंचन केंद्र सुरू करण्यासाठी दोन वेळेला कालमर्यादा ३१ मे व ९ जून (deadlines) केल्या होत्या. त्या पुढे वाढविण्यात आल्या आहेत. माहुल व मोगरा उदंचन केंद्रे ही फक्त कागदावरच राहिली आहेत. माहुल केंद्र मिठागराच्या जागेवर बांधावयाचे असल्याने अजून त्या केंद्रबांधणीला केंद्र सरकारकडून पर्यावरण अनुमती मिळालेली नाही. मोगरा केंद्राचे काम सुरु करता येत नाही कारण ती जागा न्यायालयाच्या खटल्यात अडकून पडली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाकी काम मान्यता मिळताक्षणी पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतीत पालिका अधिकाऱ्यांनी वाहिनी संरचना वा स्थान बदलून पर्यायी केंद्रे वापरात आणता येतील का, ते बघून प्रकल्पाचे काम लवकर पुरे केले पाहिजे.

सध्याच्या घडीला हाजी अली, लव्हग्रोव्ह, वरळीचे क्लिव्हलँड, जुहुचे इर्ला, आणि रे रोडचे ब्रिटानिया उदंचन केंद्रे सुरू झाली आहेत. पाऊस पडल्यावर ब्रिटानिया उदंचन केंद्र सुरू करण्यास उशीर झाला तर हिंदमाता सखल भागात पाणी तुंबते. असेच इतर ठिकाणी पण घडू शकते. म्हणजेच उदंचन केंद्राची पालिकेकडून योग्य प्रकारे देखभाल ठेवणे अत्यंत जरुरी आहे.

 

पालिका व इतर संस्थांमध्ये पर्जन्यवाहिन्या स्वच्छ नाहीत म्हणून वाद

 

सध्या मुंबईत मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत व त्यांच्यामुळे वाहिन्यातील गाळ स्वच्छ करता येत नाही, असा मुंबई पालिकेचा दावा आहे.

जर परळला पाणी तुंबले तर पालिका रेल्वेला जबाबदार धरणार, कारण तेथे रेल्वेच्या पुलाची कामे सुरू आहेत. शिवाय पश्चिम रेल्वेवर पाणी तुंबणारी सात ठिकाणे आहेत, तेथे नाले स्वच्छ करण्याची कामे रेल्वेकडून सुरू आहेत. ती त्यांची कामे पुरी झाली असे रेल्वेचे म्हणणे आहे.

 

पालिका पर्जन्यवाहिन्या स्वच्छ करण्याकरिता काय कामे करते?

 

ब्रिटिशकालीन पर्जन्यवाहिन्या स्वच्छ करण्याकरिता रोबोचा उपयोग पालिका करणार आहे. ही रोबोची मशिने पालिकेनी इटलीमधून सहा कोटीला खरेदी करण्याचे ठरविले आहे. एल्फिन्स्टन, परळ, हिंदमाता, करी रोड, मुंबई सेंट्रल व भायखळा येथे हे ब्रिटिशकालीन ९० किमी लांबीचे नाले आहेत ते १९४७ सालापासून स्वच्छ केले गेले नाहीत. ते मजुरांकडून स्वच्छ करणे धोक्याचे ठरेल. कारण, त्यातून अनेक प्रकारचे विषारी वायू निर्माण झालेले असतील.

 

मुंबईत एकूण ६०० किमी लांबीच्या नाल्यांच्या जाळ्या आहेत. त्यापैकी २६ किमी लांब नाले बॉबकॅट मशीनने स्वच्छ केले गेले. बाकी ४८४ किमी लांब नाले या मशीननी व कंत्राटदाराच्या मजूरांकडून स्वच्छ केले जातील. परंतु, हे ब्रिटिशकालीन ९० किमी बॉक्स नाले हे खोल जमिनीत रुंद आकारात बांधले गेले आहेत. पालिकेने निर्णय घेतला आहे की, या ९० किमी नाल्यांची न्युमॅटिक प्लग रबर बलून मशीनच्या साहाय्याने सफाई करावयाची. ही स्वच्छता करण्याकरिता नवीन तंत्रज्ञानाची जरुरी पडते. असे काम अमेरिकेत होते. या मशिनरीचा अंदाजे खर्च १५ कोटी रुपये इतका आहे.

 

पालिका प्रशासनानी २० हजार मीटर लांब मिठी नदीतील ७० टक्के गाळ काढून झाला असे घोषित केले आहे.

 

शहरात पूर्व उपनगरात ९० हजार मीटरपैकी ७५ टक्के, पश्चिम उपनगरात १ लाख ४२ हजार मीटरपैकी ६० टक्के व दक्षिण भागात १६ हजार मीटरपैकी ४३ टक्के गाळ मोठ्या नाल्यातील सफाई झाली आहे, असा पालिकेचा दावा आहे.

 

पालिकेने मुंबईतील २२५ ठिकाणे पूरसंभाव्य आहेत, असे निरीक्षणाअंती ठरविले आहे. ही ठिकाणे अशी - वांद्रे पूर्व, भायखळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरिवली पश्चिम. ही ठिकाणे रेल्वे व इतर संस्थांच्या कामाने व्यापली आहेत.

 

मुंबई शहरात २९९ ठिकाणे अशी सापडली आहेत की पावसाळ्यात तेथे भूस्खलन होऊन अपघात घडू शकतील. ती ठिकाणे अशी - भांडूप (१६१), घाटकोपर (३२), कुर्ला (१८), मलबार हिल व ताडदेव (१६), मालाड पश्चिम (११), गोवंडी पूर्व (११), बाकी ठिकाणे (५०). यातील २० ठिकाणे अतिधोकादायक, ४० मध्यम धोकादायक, अजून पूर्ण पाहणी बाकी ४५ ठिकाणी. पालिकेने संबंधित रहिवाशांना धोक्याच्या सूचना पाठविल्या आहेत.

 

ट्रॉम्बे, बोरिवली, विक्रोळी, कांदिवली, घाटकोपर, मालाड, व माहीम येथील सात ठिकाणांची खारफुटी मोकळ्या करण्यासाठी पालिकेने १७६७ अतिक्रमणे नष्ट केली आहेत व खारफुटी मोकळ्या केल्या आहेत.

 

‘वॉचडॉग फाऊंडेशन’तर्फे असे सांगण्यात आले की, जुहू भागातील सहा ठिकाणांची पालिकेने अजून सफाई केली नाही. तेथे पूरपरिस्थिती उद्भवण्याचा संभव आहे.

 

पर्जन्यवाहिनींच्या पाच उदंचन केंद्रावर पंप बिघडू नये म्हणून पालिकेने बॅकरेक जाळ्या बसविण्याचे योजले आहे.

 

नाला रुंदीकरणाचे घाटकोपर येथील काम पुढील वर्षी पूर्ण करण्याचे पालिकेने योजले आहे.

 

दरवर्षी नालेसफाई होऊनसुद्धा पाणी तुंबते म्हणून यावर्षी पालिकेने असे आदेश दिले आहेत की,नाल्यातून यंदा २५ टक्के जादा गाळ उपसावा.

 

वजनकाट्याअभावी नालेसफाई कामांना फटका बसला आहे. वजन करण्यासाठी गाळवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पालिकेकडून खाजगी वजनकाट्याचा शोध सुरू आहे.

 

नदी-नाल्यामधील कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी पातमुखावर मे अखेरपर्यंत जाळ्या बसविण्याचे काम पुरे होणे अपेक्षित होते. जाळ्यात अडकणारा कचरा क्रेन वा पोकलेनच्या मदतीने बाहेर काढला जाईल.

 

गेल्या पावसाळ्यात डॉ. अमरापुरकर मॅनहोलमध्ये पडून मरण पावले. त्याकरिता पालिकेने आता १,४५० धोक्याच्या ठिकाणच्या मॅनहोलवरती जाळ्या बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

 

पालिकेने घोषित केले आहे की, सोमवार. दि ४ जूनपर्यंत नालेसफाईची व रस्ता दुरुस्तीची कामे पुरी होतील. दक्षिण मुंबईतील १०० इमारती अतिधोकादायक अवस्थेत आहेत. त्या इमारतीतील रहिवाशांनी जागा सोडाव्यात व दुसरीकडे राहण्यास जावे, अशा इशारात्मक सूचना संबंधित रहिवाशांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

 

पालिकेने वर्षातील अतिजास्तीच्या भरतीचे दिवस घोषित केले आहेत. ते नागरिकांनी नोंद करून ठेवावे. कारण, अशा दिवशी अतितीव्रतेचा पाऊस पडला तर पूर येऊ शकतो.

@@AUTHORINFO_V1@@