वडवली रेल्वे फाटकात डंपर बंद पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018
Total Views |



टिटवाळाः रविवारी बाराच्या सुमारास आंबिवली नजीकच्या वडवली ४७ रेल्वे गेट असलेल्या रेल्वे क्रॉसिंग फाटकात एक डंपर अचानक बंद पडल्यामुळे सुमारे ४५ मिनिटे रेल्वे वाहतुकीचे बारा वाजले होते. दुसर्‍या डंपरच्या मदतीने अडकून पडलेला हा डंपर काढल्यानंतर पुन्हा रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. वडवली आणि टिटवाळा येथे सततच्या होणार्‍या या फाटक बंदच्या घटनांमुळे वडवली आणि टिटवाळा उड्डाणपुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

जागेच्या अडचणी व तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही वडवली उड्डाणपुल रखडलेल्या अवस्थेतच आहे. गेल्या आठ वर्षांपासून वडवली ४७ रेल्वे गेट या फाटकाजवळ पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या वडवली उड्डाण पुलाचे काम अतिशय धीम्या अवस्थेत सुरू असून, रेल्वेने त्यांच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, मात्र कडोंमपा प्रशासनाने उड्डाण पुलाचे बांधकाम आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चघळत ठेवले आहे.

ठेकेदारला आरबीआय इंडेक्स दरवाढीप्रमाणे रेट वाढवून मिळणार असून, सहा महिन्यांत वडवली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे याबाबत कल्याण-डोंबिवली शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले. तर टिटवाळा उड्डाणपुलाच्या जागेसाठीच्या काही बाबी अपूर्ण असून, त्या लवकरच पूर्ण होतील, तसेच पूर्व पश्चिमेला जोडणारा सध्याचा मूळ रस्ता उड्डाणपुलाला जोडण्याबतच्या आराखड्याच्या काही तांत्रिक बाबींवर चर्चा चालू आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या आयुक्तांच्या पाहणी दौर्‍यात हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. लवकरच हे कामदेखील सुरू होणार असल्याची माहिती उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी दिली आहे. पालिका प्रशासनाने हा उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत एखादी रुग्णवाहिका अडकल्यास हृदय विकाराचा झटका आलेला रुग्ण, सर्पदंश यांसारखे अतितातडीचे रुग्ण या वाहतुकीच्या खोळंब्यात अडकून पडल्यास, त्या रुग्णाला नाहक आपला जीव गमवावा लागेल. अशा प्रतिक्रिया येथील समाजिक कार्यकर्ते गजानन यांनी व्यक्त केल्या.

@@AUTHORINFO_V1@@