महापालिका करणार १० हजार रोपटयांची लागवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




मुंबई : मुंबई महापालिकेने सोसायटींच्या आवारात, शाळा - महाविद्यालये - व्यवसायिक आस्थापना इत्यादी खाजगी परिसरात झाडे लावण्यासाठी जुलै महिन्यात २५ हजार देशी झाडांची रोपटी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या २५ हजार रोपट्यांव्यतिरिक्त महापालिकेच्या अखत्यारितील जागेत १० हजार रोपटयांची लागवड करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाला पूरक अशा देशी झाडांची लागवड अधिकाधिक संख्येने व्हावी, ती झाडे जगावी-वाढावी, पर्यायाने मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

 

महापालिका क्षेत्रातील सोसायटींच्या परिसरात, शाळा-महाविद्यालयांच्या आवारात, मॉल्स-कारखाने-कंपन्यांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे १ ते ३१ जुलै २०१८ या एक महिन्याच्या कालावधी दरम्यान वेगवेगळ्या देशी प्रजातींच्या झाडांची २५ हजार झाडे विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, या प्रकारे विनामूल्य रोपटी प्राप्त करताना ती झाडे जगविण्याची हमी संबंधित अर्जदारांना घ्यावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी १ हजार याप्रमाणे एकूण २४ हजार रोपटयांची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. तर १ हजार रोपटी ही 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' अर्थात राणीच्या बागेतील मुख्य 'नर्सरी' मध्ये आहेत. यानुसार एकूण २५ हजार रोपटी विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याबाबत सुयोग्य समन्वय साधला जावा, यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या उद्यान अधिका-यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक देखील करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@