कसारा मार्गावर ३० मिनिटाने लोकलसेवा सुरू करण्याचा आग्रह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |




 

खासदार कपिल पाटील यांच्याकडून प्रवाशांशी संवाद
 

शहापूर : मुंबईकडे जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच पावणेचार वाजता लोकल सोडण्याबरोबरच कल्याण ते कसारा मार्गावर किमान ३० मिनिटाने लोकल सोडावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली. या मार्गावर फुकट्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढलेली असून, त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह लोकलप्रवाशांनी धरला. या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे खासदार कपिल पाटील यांनी आश्वासन दिले.

 

मध्य रेल्वेवरील वासिंद व आसनगाव स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे स्थानकाला भेट दिली. तसेच प्रवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. कल्याण-कसारा मार्गावर प्रवाशांची संख्या वाढती आहे. त्यातच सध्या लोकल उशीरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या मार्गावर किमान ३० मिनिटाने लोकल सोडण्याबरोबरच वेळेवर गाड्या धावाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. यापूर्वी आसनगाव स्थानकातून पहाटे पावणेचारच्या सुमारास लोकल धावत असे. मात्र, आता पाच वाजता पहिली लोकल आहे. त्यामुळे मुंबईत लवकर पोचता येत नसल्यामुळे पूर्वीप्रमाणेच पावणेचार वाजता लोकल सोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली. फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासनीसांची संख्या वाढविण्याची मागणीही प्रवाशांनी केली. वासिंद येथील महिला स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असल्याची तक्रार महिला प्रवाशांनी केली. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची सुचना खासदार पाटील यांनी स्टेशन व्यवस्थापकांना केली. वासिंदमधील बंद कँटीन, आसनगावमध्ये पार्किंग आदींबाबतही प्रवाशांनी तक्रार केली.

 

कल्याण ते कसारा मार्गावर इंजिन बंद पडल्यामुळे अनेक वेळा लोकलला उशीर होतो. कल्याण ते कसारा तिसरा मार्ग मंजूर झाला असून, त्याचे वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या तिसऱ्या मार्गावरुन गेल्यानंतर लोकलला वेगळा मार्ग उपलब्ध होईल. सध्याच्या परिस्थितीबाबत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा केली जाईल, असे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. वासिंद व आसनगाव स्थानकातील रेल्वेच्या फलाटांची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

 

दगडफेकीची तक्रार

 

वासिंद परिसरातील रेल्वेमार्गावर काही दिवसांपासून समाजकंटकांकडून दगड फेकले जात आहेत. तर काही वेळा प्लास्टिक पिशव्यांमध्ये मूत्र फेकले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली. त्यावेळी खासदार कपिल पाटील यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची विनंती केली.

 

खासदारांचा रेल्वेतून प्रवास

 

खासदार कपिल पाटील यांनी आसनगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आसनगाव ते वासिंदपर्यंत लोकलने प्रवास केला. त्यावेळी त्यांनी लोकलमधील प्रवाशांशीही संवाद साधला.

@@AUTHORINFO_V1@@