कारगील शहिदांना पाटील परिवाराचा सलाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018
Total Views |

भारत परिक्रमेचा १२ हजार ५०० कि.मी.चा पल्ला पूर्ण; सिक्कीमच्या राज्यपालांची भेट

 
जळगाव :
शहरातील डीजे व्यवसायिक किशोर पाटील, संध्या पाटील व १४ वर्षीय वास्तव यांनी कारगील येथे जावून युध्दात शहीद झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. श्रध्दांजली वाहतांना पाटील परिवार भावुक झाले होते. ३२ वर्षानंतर बागडोंगराच्या केंद्रीय विद्यालय आणि सिक्कीमच्या राज्यपालांची या प्रवासादरम्यान भेट घेतली. पाटील कुटुंबाच्या परिक्रमेने १२ हजार ५०० कि.मी प्रवासाचा पल्ला पूर्ण केला आहे.
 
 
१३ मेपासून झाडे जगवा झाडे वाचवा, जल है तो कल है, आम्ही भारतीय एक आहोत ही संकल्पना घेऊन सुरू झालेली परिक्रमा २३ राज्यांची बॉर्डर, ६५ हून अधिक दिवस आणि १८ हजार कि.मी.च्या प्रवासापैकी १२ हजार ५०० कि.मी प्रवास संपला आहे. २३ राज्यातून प्रवास करणार्‍या पाटील कुटुंबाला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. आपल्या प्रवासात भारतीय संस्कृतीची ओळख तर होत आहेच पण याचबरोबर फेसबुक व सोशल मिडीयातही कुटुंबाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
 
 
लेहला जातांना सर्चूच्या पुढे पांगजवळ स्नो फॉलमध्ये विरळ ऑक्सिजनमुळे पाटील परिवारास त्रास सहन करावा लागला. यात संध्या पाटील तर बेशुध्द झाल्या होत्या. पण जवळच १२० कि.मी.वर असलेल्या सैनिकी कॅम्पमधील सैनिकांनी ऑक्सिजन मार्क्स लावून त्यांच्यावर उपचार केले. असे अनेक चित्तथरारक प्रसंगाचा सामना परिवाराला करावा लागत आहे. त्यांच्या या मोहिमेचे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी वेळेवर भेट देत दखल घेऊन कौतुक केले. टाटा समूहाने त्यांच्या उपक्रमाची दखल घेत प्रत्येक राज्यातील त्यांच्या सर्व्हिस सेंटरला भेट देण्याचे निमंत्रण तर दिलेच शिवाय ट्विटरव्दारे टाटा नेक्सान गाडीची निवड केल्याबददल अभिनंदनही केले आहे. समूहाने ही मोहीम आता पाटील कुटुंबाची नसून टाटा समूहाची असल्याचे म्हटले आहे. मोहिमेत आतापर्यंतच्या राज्यात जागोजागी या कुटुंबाने पर्यावरण रक्षणासाठी जल व वृक्ष सर्ंवंधनाबददल जनजागृती तर केलीच शिवाय भारत माझा देश आहे, आम्ही भारतीय एक आहोत एकात्मता राखण्याचे आवाहन केले आहे. पाटील कुटुंब ज्या हॉटेलमध्ये विश्राम करण्यासाठी उतरत त्या हॉटेल मालकांनी त्यांच्या या उपक्रमाची माहिती घेऊन अभिनंदन केले.
 
 
मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादाने भारावलो
सैनिकाने पत्नीवर केलेले उपचार तसेच कारगिल शहिदांना श्रध्दांजली वाहतांना भावना उचंबळून आल्या. देशप्रेमाची भावना निर्माण करणारे प्रेरणास्थान असल्याने प्रत्येक भारतीयाने एकदा तरी येथे यावे, असे त्यांनी सांगितले. मोहिम सुरू केल्यानंतर गाडी पाहून अनेकांनी थांबवून आस्थेवाईकपणे केलेली चौकशी तसेच जनजागृती करतांना स्थानिकांचा मिळणारा प्रतिसाद, लोकांचे प्रेम व ३२ वर्षानंतर प्राथमिक शाळेत मिळालेले प्रेम, भारतीय संस्कृती, रस्ते व विकास पाहून भारावून गेलो असल्याचे पाटील परिवाराने सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@